अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर अचूक हल्लाबोल केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण अक्षरश: हादरला. अमेरिकेची हवाई ताकद असलेल्या B2 बॉम्बर विमानामुळेच हे शक्य झालं आहे. अमेरिकेने B2 बॉम्बरच्या माध्यमातून जगाला आपली हवाई ताकद दाखवली. मात्र, B2 स्टेल्थ बॉम्बरच्या निर्मितीत मुंबईकर असलेल्या अजिनिअर नोशीर गोवाडिया यांचंही महत्त्वाचं योगदान आहे. B2 स्पिरिट हा एक अत्याधुनिक स्टेल्थ बॉम्बर आहे, तो रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शनला चकवा देण्यास सक्षम आहे. गोवाडिया यांनी B2 च्या संपूर्ण प्रोपल्शन सिस्टिमचे संकल्पनात्मक डिझाइन केले. ही यंत्रणा विमानाची कार्यक्षमता वाढवते. या प्रणालीमुळे विमान कमी उष्णता उत्सर्जित करते, त्यामुळे इन्फ्रारेड सेन्सर्सना त्याचा मागोवा घेणे कठीण होते. गोवाडिया यांनी B2 च्या स्टेल्थ इन्फ्रारेड सप्रेशन तंत्रज्ञानावर काम केले, त्यामुळे विमान रडार आणि इन्फ्रारेड सिस्टिमद्वारे शोधले जाण्यापासून सुरक्षित राहते. विमानाच्या एक्झॉस्ट सिस्टिमचे डिझाइन अशाप्रकारे केलेले आहे की, त्यामुळे उष्णता कमी करून ते विमानाला रडारवर एक प्रकारे अदृश्य बनवते. गोवाडिया हे B2च्या प्रमुख डिझायनरपैकी एक आहेत.

कोण आहे नोशी गोवाडिया?

नोशीर गोवाडिया यांचा जन्म ११ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार असल्याने त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी पीएचडीच्या समतुल्य पदवी मिळवल्या असे वृत्त आहे. १९ व्या वर्षी ते वैमानिक अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला गेले आणि नंतर १९६९ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.

चीनला तंत्रज्ञान विकल्याचा गोवाडियांवर आरोप

अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीनंतर गोवाडिया सध्या फ्लॉरेन्स इथल्या तुरुंगात आहेत. २००५ मध्ये गुप्तचर आणि गोपनीय माहिती इतर देशांना विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गोवाडिया यांनी १९९९ मध्ये नॉर्थरॉप सोडल्यानंतर न्यू मॅक्सिकोमध्ये एक संरक्षण सल्लागार कंपनी स्थापन केली होती. २००३ ते २००५ या काळात त्यांनी चीन, इस्त्रायल, जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांना B2 स्टेल्थ तंत्रज्ञानाशी संबंधित गोपनीय माहिती विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रामुख्याने त्यांनी चीनला स्टेल्थ क्रूझ मिसाइलसाठी नोझल डिझाइन करण्यात मदत केली, त्यामुळे मिसाइल रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शनपासून वाचू शकते.

तुरुंगवासाची शिक्षा

गोवाडिया यांनी पुरवलेल्या माहितीमुळे चीनच्या स्टेल्थ तंत्रज्ञानात प्रगती झाल्याचा दावा केला जात आहे. चीनच्या जे-२० स्टेल्थ फायटर आणि एच-२० स्टेल्थ बॉम्बरच्या विकासात त्यांच्या माहितीचा उपयोग झाला असावा असेही मानले जाते, त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला. या आरोपांखाली गोवाडिया यांना २००५ मध्ये अटक करण्यात आली. २०१० मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर २०११ रोजी त्यांना ३२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

महत्त्वाचे मुद्दे:

  • मुंबईत जन्मलेला नोशीर गोवाडिया याची अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
  • B-2 बॉम्बर हे आतापर्यंत बनवलेल्या सर्वात अत्याधुनिक विमानांपैकी एक आहे
  • B-2 बॉम्बरसंदर्भातील गोपनीय माहिती इतर देशांना विकल्याचा आरोप
  • चीनल स्टेल्थ क्रूझ मिसाइलसाठी नोझल डिझाइन करण्यात मदत केली
  • चेंगडू आणि शेन्झेन सारख्या शहरांना सहा वेळा भेट दिली

B-2 बॉम्बर्सचे चीनचे कनेक्शन

२००३ मध्ये गोवाडिया यांनी चिनी अधिकाऱ्यांसोबत गुप्त भागीदारी सुरू केली. कॅच अ मंकी अशा गुप्त नावांचा वापर करून त्यांनी चेंगडू आणि शेन्झेनसारख्या शहरांना सहा वेळा भेट दिली. त्यांनी पुरवलेल्या माहितीच्या बदल्यात त्यांना जवळपास १ लाख १० हजार डॉलर्स देण्यात आले होते. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी या पैशांचा वापर त्यांचे गृहकर्ज फेडण्यासाठी केला. कस्टम अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ती एका अँटिक डेस्कसाठी असल्याचे गोवाडिया यांनी सांगितले. पुढील चौकशीत २००४ मध्ये चीनला नोझलची चाचणी करण्यात मदत केल्याचे आणि अमेरिकेच्या क्षेपणास्त्राच्या शोधापासून कसे वाचायचे याबद्दल तपशीलवार माहिती पुरवल्याचे सिद्ध झाले. गोवाडिया यांनी केलेल्या विश्वासघातामुळे चीनला तांत्रिकदृष्ट्या बळकटी मिळाली. २००४ मध्ये गोवाडियाशी संबंधित कागदपत्रे पाठवताना एफबीआयने चौकशी सुरू केली.

B-2 बॉम्बर : अमेरिकेचे अदृश्य शस्त्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पिरिट असे नाव असलेले B-2 बॉम्बर हे आतापर्यंत बनवलेल्या सर्वात अत्याधुनिक विमानांपैकी एक आहे. ते फक्त उडण्यासाठीच नाही तर अदृश्य होणासाठीदेखील डिझाइन केलेले आहे. एकाच वेळी इंधन भरल्यानंतर ते १० हजार नॉटिकल् मैल उडू शकते, ५० हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर क्रूझ करू शकते आणि अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. हे सर्व शत्रूच्या संरक्षणापासून जवळजवळ अदृश्य राहून केले जाऊ शकते. त्याच्या सर्वात नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये विमानाच्या मागच्या भागाचा वापर न करता फ्लाइंग-विंग कॉन्फिगरेशन, इन्फ्रारेड सप्रेसिंग एक्झॉस्ट सिस्टिम आणि अंतर्गत शस्त्रास्त्रे यांचा समावेश आहे.
जून २०२५ मध्ये ही अदृश्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
इराण इस्त्रायलमधील संघर्षादरम्यान अमेरिकेने मिडनाईट हॅमर या कोडनेमचे ऑपरेशन सुरू केले. अमेरिकेतून सात B-2 बॉम्बर्सनी न थांबता उड्डाण केले. इराणी हवाई हद्दीत प्रवेश करून अचूक हल्ला करत इराणला हादरवून टाकलं आहे