Thailand PM Paetongtarn Shinawatra Government : २०२४ मध्ये निर्माण झालेल्या राजकीय गदारोळानंतर थायलंडच्या तत्कालीन पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काही दिवसांनीच पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ३८ वर्षीय तरुण महिलेने थायलंडच्या राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा रंगली. मात्र, पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून अवघे काही महिने उलटले असतानाच पायतोंगटार्न अडचणीत सापडल्या आहेत. एका १७ मिनिटांच्या लीक झालेल्या फोन कॉलमुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? पायतोंगटार्न अडचणीत कशामुळे सापडल्या? ते जाणून घेऊ…
मागील काही महिन्यांपासून थायलंड आणि कंबोडियन या दोन देशांमध्ये सीमावादावरून संघर्ष निर्माण झाला आहे. परिस्थितीत आणखीच चिघळू नये म्हणून यासंदर्भात थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान पायतोंगटार्न यांनी कंबोडियनचे नेते हुन सेन यांच्याबरोबर रविवारी (तारीख १५ जून) फोनवरून चर्चा केली. हुन सेन यांनी २०२३ मध्ये कंबोडियनचं नेतेपद सोडलं होतं; परंतु तरीही त्यांचा देशात मोठा प्रभाव आहे. दरम्यान, पायतोंगटार्न यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हुन सेन यांनी ते १७ मिनिटांचे संपूर्ण संभाषण स्वतः सोशल मीडियावर शेअर केलं. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर थायलंडच्या जनतेनं पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्यावरील आरोप काय?
पायतोंगटार्न या उच्च पदावर असूनही त्यांनी कंबोडिया नेत्याबरोबर संवाद साधताना देशाची बाजू ठामपणे मांडली नाही, असे आरोप अनेकांकडून करण्यात आले. सर्वांत वादग्रस्त बाब म्हणजे, त्यांनी त्याच्याच देशातील लष्कराच्या कमांडरला ‘विरोधक’ म्हटल्याचं कॉल रेकॉर्डिंगमधून ऐकू येत आहे. त्यांच्या या विधानामुळे थायलंडच्या लष्करी समर्थक गटांनी संताप व्यक्त केला आहे. थायलंडच्या राजकारणात दीर्षकाळापासून सशस्त्र दलांचा हस्तक्षेप राहिलेला आहे.
आणखी वाचा : न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणातील चौकशी अहवाल समोर; समितीने नेमकं काय म्हटलंय?
या कॉलमुळे पायतोंगटार्न यांच्या नव्या सरकारचे भवितव्य धोक्यात आले असून, त्यांच्यावर पुन्हा एकदा लष्कर आणि राजसत्ता समर्थक शक्तींकडून संशयाची व तीव्र टीकेची झोड उठवली जात आहे. पातोंगटर्न यांच्यावर आता निष्काळजीपणा आणि राष्ट्रीय हिताला धोका दिल्याचे आरोप होत आहेत. याच गोष्टीची संधी हेरत विरोधकांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठपका ठेवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे पायतोंगटार्न यांचं पंतप्रधानपद धोक्यात आलं आहे.
पायतोंगटार्न शिनावात्रा यांची राजकीय कारकीर्द
- पायतोंगटार्न शिनावात्रा या सामान्य राजकारणी नाहीत, तर त्या थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत.
- पायतोंगटार्न यांच्या काकू यिंगलक शिनावात्रा यांनीही थायलंडच्या महिला पंतप्रधान राहिलेल्या आहेत.
- २१ ऑगस्ट १९८६ रोजी जन्मलेल्या पायतोंगटार्न यांनी ‘Chulalongkorn University’मधून राज्यशास्त्राच्या विषयात पदवी घेतलेली आहे.
- त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सुरे येथून आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
- त्यांनी सुरुवातीला व्यावसायिक क्षेत्रात आणि कुटुंबाच्या रिअल इस्टेट तसेच विमानवाहतूक व्यवसायाचं काम केलं.
- २०२१ मध्ये पायतोंगटार्न यांची औपचारिक राजकारणात एन्ट्री झाली आणि त्यांना फ्यू थाय पक्षाच्या ‘समावेश आणि नवप्रवर्तन सल्लागार समिती’चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं.
- थायलंडमधील २०२४ मध्ये झालेल्या राजकीय गदारोळानंतर पायतोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली.
- ३८ वर्षीय पायतोंगटार्न यांनी थायलंडच्या इतिहासातील सर्वांत तरुण पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळविला.
- त्यावेळी त्यांना मध्यममार्गी आणि पुरोगामी गटांचा पाठिंबा लाभला होता. पायतोंगटार्न यांच्या समर्थकांच्या मते, त्या थायलंडमधील बदलाचं प्रतीक होत्या.

कॉल लीक झाल्यामुळे सरकार अडचणीत
थायलंडच्या सर्वांत तरुण पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांचा उदय ऐतिहासिक ठरला असला, तरी त्याचवेळी त्यांच्यावर त्यांच्या घराण्याच्या राजकीय वारशाचं जड ओझं देखील आहे. त्यांचे वडील थाक्सिन शिनावात्रा हे एके काळचे दूरसंचार क्षेत्रातील अब्जाधीश उद्योजक आणि लोकप्रिय पंतप्रधान होते. मात्र, २००६ मध्ये लष्करी उठावामधून त्यांची सत्ता उलथवण्यात आली आणि नंतर गैरव्यवहारप्रकरणी गैरहजर असतानाच दोषी ठरवण्यात आलं. त्याचप्रमाणे पायतोंगटार्न यांच्या मावशी यिंगलक शिनावात्रा यादेखील २०११ मध्ये ग्रामीण मतदारांमधील प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर सत्तेत आल्या होत्या; पण २०१४ मध्ये लष्कर समर्थित घटनात्मक न्यायालयाने त्यांना पदावरून हटवलं.
पायतोंगटार्न यांच्या भाषेवर आक्षेप
शिनावात्रा कुटुंबियांची ईशान्य थायलंडमधील ग्रामीण भागात अजूनही लोकप्रियता आहे. मात्र, शहरी बँकॉकमधील राजघराण्याशी आणि लष्कराशी निष्ठा असलेले लोक त्यांना विरोधक मानतात. या पार्श्वभूमीमुळे पायतोंगटार्न यांचा राजकीय वारसा हा त्यांची ताकद आणि कमकुवत बाजू ठरताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात १७ मिनिटांच्या एका लीक झालेल्या फोन कॉलमुळे पायटोंगटर्न यांच्या सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे, या कॉलवर पायतोंगटार्न यांनी वापरलेली भाषा अधिक वादग्रस्त ठरली आहे. ज्यामध्ये त्यांनी हुन सेन यांना मामा आणि थायलंडच्या लष्करी अधिकाऱ्याला विरोधक म्हटलं आहे.
पायतोंगटार्न यांच्या सरकारचं बहुमत कमी
थायलंडमध्ये लष्कराचा प्रचंड आदर केला जातो आणि त्यांना एक प्रमुख राजकीय घटक मानलं जातं. त्यामुळे अशा भाषेचा वापर लष्कराचा अपमान तसेच शेजारी राष्ट्राप्रती अतिरिक्त आदर दाखवणारा मानला गेला आहे. विशेष म्हणजे, हुन सेन यांनी हा कॉल तब्बल ८० हून अधिक कंबोडियन अधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर तो त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. ज्यामुळे पायतोंगटार्न यांची राजकीय अपरिपक्वता आणि अस्थिरता अधोरेखित झाली आहे. गुरुवारी पायतोंगटार्न यांच्यासमोरील संकट अधिकच गडद झालं आहे. कारण, त्यांच्या सत्ताधारी आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्षाने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे त्यांचं संख्याबळ ५०० वरून थेट २५५ जागांवर आलं आहे, जे अत्यंत नाजूक बहुमत आहे. काही सेनेट सदस्यांनी पायतोंगटार्न यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे.
हेही वाचा : Swiss Bank Money : देशातली श्रीमंत माणसं स्विस बँकेतच का पैसे ठेवतात? काय आहेत यामागची कारणं?
पंतप्रधान पायतोंगटार्न यांनी मागितली माफी
पंतप्रधान पायतोंगटार्न यांनी जाहीर माफी मागत आपले वक्तव्य मागे घेतलं असलं तरीही, त्यांचा लीक झालेला कॉल थायलंडच्या राष्ट्रीय अस्मितेला धक्का देणारा ठरला आहे. त्यांनी कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी असलेले खासगी संवाद बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हुन सेन यांनी अंतर्गत राजकारणासाठी मुद्दाम हा कॉल लीक केल्याचा आरोप पंतप्रधान पायतोंगटार्न केला आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने वाद शमण्याऐवजी अधिकच भडकला आहे.
थायलंडमध्ये पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती?
थायलंडमध्ये १९३२ पासून आतापर्यंत तब्बल १३ वेळा यशस्वी लष्करी उठाव झाले आहेत. त्यामुळे थायलंडचं लष्कर हे केवळ सुरक्षादल नाही, तर एक महत्त्वाचा राजकीय घटक मानलं जातं. सध्या लष्कर उघडपणे हस्तक्षेप करत नसले तरी गुरुवारी रॉयल थाई आर्मीने दिलेल्या निवेदनाने खळबळ उडवली. या निवेदनात कायदेशीर चौकटीत राहून राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची वचनबद्धता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे निवेदन लष्कराकडून अप्रत्यक्ष इशारा म्हणून पाहिलं जात आहे. सत्ताधारी आघाडीचं संख्याबळ फक्त २५५ जागांवर आल्यामुळे पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभं आहे. त्यामुळे सरकार कोसळणार की, हा वाद शमणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.