Who Was Mohammed Nizamuddin Shot Dead By US Cops : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय वंशाच्या तरुणाचा मृत्यू झाला. मोहम्मद निजामुद्दीन (वय ३०) असे या तरुणाचे नाव असून तो तेलंगणातील महबूबनगर परिसरातील रहिवासी होता. काही आठवड्यापूर्वी निजामुद्दीनने त्याला छळ व वांशिक भेदभावाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली होती. कामाच्या ठिकाणी आणि राहत्या घरातही आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले होते. इतकेच नाही तर त्याच्या अन्नामध्ये कुणीतरी विष मिसळल्याचा आरोपही निजामुद्दीनने केला होता. यादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान, कोण होता मोहम्मद निजामुद्दीन? अमेरिकन पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार का केला? त्या संदर्भातील हा आढावा…
मोहम्मद निजामुद्दीन कोण होता?
मूळ तेलंगणातील महबूबनगर परिसरात राहणारा मोहम्मद निजामुद्दीन हा व्यवसायाने अभियंता होता. निजामुद्दीन याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये तो अमेरिकेला गेला. तिथे त्याने फ्लोरिडा येथील एका महाविद्यालयातून मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर सायन्स ही पदवी मिळवली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर निजामुद्दीनने एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरू केली आणि पदोन्नती मिळाल्यानंतर तो कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे स्थलांतरित झाला. निजामुद्दीनच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो ईपीएएम सिस्टिम्स (EPAM Systems) या आयटी कन्सल्टिंग फर्मद्वारे गूगलमध्ये काम करत होता. मात्र, नंतर त्यानेच आपली नोकरी गेल्याची कबुली दिली होती. निजामुद्दीन हा अतिशय शांत आणि धार्मिक स्वभावाचा होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
पोलिसांनी मोहम्मद निजामुद्दीनवर गोळीबार का केला?
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, काही आठवड्यापूर्वी मोहम्मद निजामुद्दीनने त्याला सार्वजनिक ठिकाणी मानसिक छळ आणि वांशिक भेदभावाचा सामना करावा लागल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. कामाच्या ठिकाणी आणि राहत्या घरातही आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले होते. पगारातील फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने नोकरीतून काढून टाकण्यात आल्याचा मुद्दाही त्याने तक्रारीत मांडला होता. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना ९११ या हेल्पलाइनवर एका निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची तक्रार प्राप्त झाली.
आणखी वाचा : सौदी अरेबिया-पाकिस्तान संरक्षण करार भारतासाठी कितपत डोकेदुखीचा? पुन्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ झाल्यास…?
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना मोहम्मद निजामुद्दीन हा त्याच्या रूममधील सहकाऱ्यावर चाकू हल्ला करताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण त्याने आक्रमक भूमिका घेतल्याने नाईलाजास्तव केलेल्या गोळीबारात निजामुद्दीनचा मृत्यू झाला. “जेव्हा पोलिसांनी मोहम्मद निजामुद्दीनला पीडितावर चाकू हल्ला करताना पाहिले, तेव्हा त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी निजामुद्दीनला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता”, असे मृत मोहम्मद निजामुद्दीनच्या रूममालकाने माध्यमांना सांगितले.
निजामुद्दीनने मृत्यूपूर्वीच्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
मृत्यूपूर्वी मोहम्मद निजामुद्दीनने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये त्याला वंशिक द्वेष, भेदभाव, छळ, शारीरिक अत्याचार, वेतन फसवणूक, चुकीच्या पद्धतीने नोकरीतून काढणे आणि न्याय मिळण्यास अडथळा आणणे असे आरोप केले होते. “माझ्याबरोबर घडत असलेल्या सर्व गोष्टींविरोधात आज मी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुरे झाले! गोऱ्यांचे वर्चस्व आणि वर्णद्वेषी अमेरिकन मानसिकता आता संपायला हवी. कॉर्पोरेट हुकूमशहांचे अत्याचार थांबायला हवेत आणि यात सामील सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी,” असे निजामुद्दीनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते. निजामुद्दीनने आपल्या पोस्टमध्ये गूगलसाठी ईपॅम सिस्टिम्स या आयटी कन्सल्टिंग फर्ममार्फत काम केले असल्याचे नमूद केले. त्याने कंपनीवर तसेच त्याच्या सहकाऱ्यांवर शत्रूत्वपूर्ण वर्तन आणि कमी वेतन दिल्याचा आरोप केला.
“कंपनीने माझी पगारातही फसवणूक केली आणि सर्वांनी एकत्रित येऊन मला चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढले. नोकरी गेल्यानंतरही माझा छळ सुरूच राहिला. एका वर्णद्वेषी गुप्तहेर आणि त्याच्या टोळीमार्फत मला धमक्या दिल्या गेल्या. त्यांची क्रूरता एवढी वाढली की शेवटी मला राहत्या घरातूनही बाहेर काढण्यात आले,” असा दावा त्याने आपल्या पोस्टमध्ये केला होता. “माझे कंपनीतील सहकारी, मालक, क्लायंट, गुप्तहेर आणि त्यांचे समुदाय हे या घटनेतील मुख्य आरोपी आहेत. आज माझ्याबरोबर जे घडत आहे ते उद्या कोणाबरोबरही घडू शकते,” असा इशारा देत त्याने अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
हेही वाचा : ‘ट्रम्प टॅरिफ’नंतर अमेरिकेचा आणखी एक फटका; भारताची कोंडी, चाबहार बंदरही आता हातातून जाणार?
पोलिसांनी घटनेबाबत काय सांगितले?
कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद निजामुद्दीन आणि त्याच्या रूममधील सहकाऱ्यामध्ये वाद झाला होता. ३ सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मोहम्मद निजामुद्दीन हा त्याच्या सहकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी केलेल्या गोळीबारात निजामुद्दीन जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. चाकूहल्ला झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन पोलिस अधिकारी मॉर्गन यांनी माध्यमांना सांगितले की, अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे पुढील हानी टळली आणि किमान एका व्यक्तीचा जीव वाचला. घटनास्थळावरून दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत.
निजामुद्दीनच्या कुटुंबीयांनी काय सांगितले?
निजामुद्दीनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वांशिक भेदभाव आणि छळाची तक्रार केल्यानंतर निजामुद्दीनने आपली नोकरी सोडली होती. काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. त्याच्याबरोबर काय घडले याची आम्हाला माहिती नाही, पण अमेरिकन पोलिसांनी आम्हाला सांगितले की तुमचा मुलगा आरोपी असून तो गोळीबारात ठार झाला आहे. भारत सरकारने या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी निजामुद्दीनच्या वडिलांनी केली आहे. त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना आपल्या मुलाचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. “माझा मुलगा २०१६ मध्ये फ्लोरिडा कॉलेजमध्ये शिकण्यासाठी अमेरिकेला गेला होता. पदोन्नती मिळाल्यानंतर तो कॅलिफोर्नियाला गेला, जिथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मी परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना आवाहन करतो की, त्यांनी या घटनेची चौकशी करून माझ्या मुलाचे पार्थिव शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी मदत करावी,” असे निजामुद्दीनच्या वडिलांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.