पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणारा गोळीबार वाढला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, एका तरुण सैनिकाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (एलओसी) विनाकारण केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर २५ वर्षीय जवान एम. मुरली नाईक यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. कोण होते एम. मुरली नाईक? जाणून घेऊ…
पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यू
घाटकोपरमधील कामराज नगर येथे वास्तव्याला असलेले जवान मुरली नाईक जम्मू परिसरातील उरी येथे कर्तव्य बजावत होते. नाईक हे मूळ आंध्र प्रदेशातील सत्य साई जिल्ह्यातील एका आदिवासी वस्तीतील गरीब शेतकरी कुटुंबातील होते. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवर विनाकारण जोरदार तोफगोळ्यांचा मारा केला. त्यावेळी मुरली नाईक तणावग्रस्त भागात तैनात होते. पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुरली नाईक यांना उपचारासाठी नवी दिल्लीला नेण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण प्रदेशात पसरताच गावातील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन, त्यांचे सांत्वन केले. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने ‘द न्यूज मिनिट’ला सांगितले, “आम्ही मुरली नाईकच्या शौर्य आणि समर्पणाला सलाम करतो. त्यांचे बलिदान विसरले जाणार नाही.”

कोण होते मुरली नाईक?
मुरली नाईक हे मुदावथ श्रीराम नाईक आणि मुदावथ ज्योतीबाई यांचे एकुलता एक पुत्र होते. त्यांचे आई-वडील दोघेही गोरंटला मंडलात शेतमजूर म्हणून काम करीत होते, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. त्यांच्या वडिलांच्या मते, मुरली नाईक यांचे फार पूर्वीपासून सैन्यात सामील होण्याचे स्वप्न होते. “त्याला लष्कराचा गणवेश खूप आवडायचा. तो मैत्रीपूर्ण स्वभावाचा होता. लष्करी जवान म्हणून तो खूप प्रेरित होता आणि देशाची सेवा करण्याचा त्याला अभिमान होता,” असे त्यांच्या वडिलांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. डिसेंबर २०२२ मध्ये नाईक सैन्यात भरती झाले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
ते जम्मू आणि काश्मीरमध्ये ८५१ लाईट रेजिमेंटमध्ये तैनात होते. त्यांचे चुलतभाऊ रणजित यांनी सांगितले की, मुरली नाईक यांनी ६ मे रोजी रात्री सीमेपलीकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती देण्यासाठी कुटुंबाला फोन केला होता. ते म्हणाले, “त्याने काल (गुरुवारी) रात्री पुन्हा फोन केला आणि सांगितले की, आणखी जोरदार गोळीबार होत आहे. त्याला त्याच्या पालकांची काळजी होती. मी त्याला स्वतःची काळजी घेण्यास आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आणि आम्ही नातेवाईक त्याच्या पालकांची काळजी घेऊ, असे आश्वासन दिले.” त्यांनी पुढे सांगितले, “तो काळजीत होता. यापूर्वी त्याला असे कधीही पाहिले नव्हते. त्याने सीमेपलीकडून सतत होणाऱ्या गोळीबाराविषयी सांगितले.”
शुक्रवारी सकाळी त्यांच्या कुटुंबाला मुरली नाईक हुतात्मा झाल्याची बातमी देण्यात आली. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने पहाटे ३ ते ३:३० च्या दरम्यान नाईक यांच्याआईशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की, त्यांचा मुलगा गोळीबारात प्रतिकार करताना जखमी झाला आणि त्याचे निधन झाले. ही दुःखद बातमी लगेच सर्वत्र पसरली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “देशाच्या संरक्षणात श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनुकोंडा विधानसभा मतदारसंघातील गोरंटला मंडल येथील मुरली नाईक नावाच्या सैनिकाच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. राष्ट्रासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या हुतात्मा मुरली नाईक यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो,” असे त्यांनी लिहिले. मुख्यमंत्री त्यांच्या गावाला भेट देतील आणि शोकाकुल कुटुंबासाठी अनुदान जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यपाल एस. अब्दुल नजीर, माजी मुख्यमंत्री व वायएसआरसीपी अध्यक्ष वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनीदेखील मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली.
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार
जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार सुरूच असल्याने नियंत्रण रेषेवर तणाव वाढत आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या निवेदनात संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, उरी व अखनूरसह नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात पूंछ भागात सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. सीमेपलीकडून झालेल्या तीव्र गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि ५९ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात हरियाणातील पलवल जिल्ह्यातील ३२ वर्षीय जवान लान्स नायक दिनेश कुमार तोफांच्या गोळीबारात हुतात्मा झाले आहेत.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या तळांवर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांचे कार्यकर्ते राहत होते, असे म्हटले जाते. भारताचे हे हल्ले २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होते. सीमेपलीकडून गोळीबार सुरू असल्याने नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अस्थिर आहे.