Donald Trump on Apple India Manufacturing: अ‍ॅपलने आपल्या स्मार्टफोनचे भारतातील उत्पादन थांबवून ते अमेरिकेत सुरू करावे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना केल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांचं हे विधान खरं ठरेल की कंपनी यासाठी नकार देईल हे अद्याप स्पष्ट नसलं तरी अ‍ॅपलने भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची हमी दिल्याचा दावा केंद्र सरकारच्या सूत्रांनी केला आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे कंपनीच्या देशातील विस्ताराच्या योजनांवर फरक पडण्याची शक्यता कमी आहे. कंपनीने भारतावर खूप मोठी पैज लावली आहे; तेव्हा या एका विधानामुळे कंपनीच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतात उत्पादन केंद्र बनवण्याच्या निर्णयावर आम्ही इतर सर्व भागीदारांशी बोललो आहोत आणि सर्व योजना योग्य दिशेने जात आहेत असं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

“कंपनीच्या गुंतवणूक योजना पूर्वीप्रमाणेच आहेत आणि हा देश अ‍ॅपलसाठी एक प्रमुख उत्पादन केंद्र असेल असं आश्वासन अ‍ॅपलच्या अधिकाऱ्यांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना दिलं आहे. ट्रम्प यांनी काल असे सांगितले की, त्यांनी टिम कूक यांच्याशी बोलून त्यांना सांगितले की, अ‍ॅपलने भारतात त्यांची उत्पादने बनवावीत असं वाटत नाही, त्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावे.

ट्रम्प काय म्हणाले?

“आपल्याकडे अ‍ॅपल आहे. कूक यांच्यासोबत काही मतभेद झाले. कूक तुम्ही माझे चांगले मित्र आहात, तुम्ही ५०० अब्ज डॉलर्स घेऊन येत आहात, पण आता मी ऐकले की तुम्ही संपूर्ण भारतात कंपनीचा विस्तार करत आहात. जर तुम्हाला भारताची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही तिथे विस्तार करू शकता”, असे ट्रम्प यांनी कुक यांना म्हटले आहे.

अ‍ॅपल अमेरिकेत उत्पादन वाढवू शकते का?

अमेरिकेत अ‍ॅपलचे उत्पादन परत आणण्यासाठी ट्रम्प यांनी अ‍ॅपलवर दबाव आणला असला तरी हे एक खूप खर्चिक पाऊल आहे. उद्योग तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने भारताच्या तुलनेत अमेरिकेत आयफोनचे उत्पादन सुरू केले तर त्याची किंमत ३००० डॉलर्स होईल. सध्या प्रति आयफोन १००० डॉलर्सच्या किमतीच्या जवळपास तिप्पट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला उत्तर देताना मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी म्हटले आहे की, “अ‍ॅपल कंपनी आणि अमेरिकी प्रशासन दोघांमध्येही चांगला विचार प्रचलित होईल. त्यांना काही तथ्य लक्षात येतील. जर त्यांनी चीन, भारत किंवा व्हिएतनामच्या तुलनेत अमेरिकेत उत्पादन करण्याचा निर्णय घेतला तर १००० अमेरिकन डॉलर्सच्या आयफोनची किंमत ३००० डॉलर्स असेल. तेव्हा प्रश्न असा आहे की, अमेरिकन ग्राहक आयफोनसाठी ३००० डॉलर्स देण्यासाठी तयार आहेत का?”


सध्या अ‍ॅपलचे ८० टक्के उत्पादन चीनमध्ये होते, त्यामुळे तिथे सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होतात. जेव्हा अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी भारतात उत्पादन करण्याची योजना जाहीर केली, तेव्हा सप्लाय चेनमध्ये विविधता आणण्यासाठी काही उत्पादन चीनमधून भारतात हलवण्यात आले.
“उत्पादन आणि नोकऱ्या अमेरिकेतून भारतात जात नाहीत, तर ते चीनहून भारतात जात आहेत; जेणेकरून त्यांची सप्लाय चेन वैविध्यपूर्ण असेल आणि अमेरिकन कंपन्या तसंच ग्राहकांना व्यापाराच्या बाबतीत त्यांच्याशी फारसे मैत्रीपूर्ण संबंध नसलेल्या एका देशाच्या वर्चस्वापासून संरक्षण मिळेल”, असेही गिरबाने पुढे म्हणाले.

अ‍ॅपल त्यांच्या विविध भागीदारांमार्फत भारतात विस्तार वाढवत आहे. सरकारी सूत्रांनुसार, आयफोनच्या जागतिक उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन भारतातून येते. तैवानमधील सर्वात मोठ्या पुरवठादारांपैकी एक असलेली फॉक्सकॉन उत्पादनात विविधता आणण्याच्या अ‍ॅपलच्या योजनांना पूर्ण करण्यासाठी भारतातील कामात दुपटीने वाढ करत आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्ससारख्या इतर पुरवठादारांनीही देशात मोठ्या प्रमाणात कामकाज वाढवले आहे. तसंच कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो इथली एक कंपनी देशातील स्थानिकीकरणाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनेक भारतीय कंपन्यांशी पुरवठादार म्हणून सहभागी होण्यासाठी चर्चा करत आहे. “कंपन्या अशा ठिकाणी जातात, जिथे त्या खर्च कमी करू शकतात आणि अधिक स्पर्धात्मकरित्या काम करू शकतात. व्यवसाय खर्च महसूल आणि नफा तत्त्वांवर आधारित असतो. भारताने मेक इन इंडियाचे मूल्य काय आहे ते दाखवले आहे. संरक्षणवाद असला तरी भारत अशा कंपन्यांना मेक इन इंडियासाठी आकर्षित करत राहील”, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इकॉनॉमिक्स टाइम्सला सांगितले.

ट्रम्प यांच्या विधानानंतर भारतात अ‍ॅपलचं वाढतं उत्पादन कधीही ऑफट्रॅक जाण्याची शक्यता कमीच आहे. पुरवठादारांना अ‍ॅपल किंवा इतर कोणत्याही कंपन्यांकडून भारतात त्यांचा विस्तार थांबवण्यासाठी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे घडामोडींबद्दल माहिती असलेल्या एका उद्योग सूत्राने ईटीला सांगितले. वर्षाच्या अखेरीस नवीन लाँचसाठी सर्व काही योजनेनुसार चालू आहे असेही त्यांनी सांगितले. कुकने आधीच जाहीर केले आहे की, जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतातून जागतिक दिग्गज कंपनी खरेदी करेल, तर कर शुल्काबाबत अनिश्चिततेमुळे चीन इतर बाजारपेठांसाठी बहुतेक डिव्हाइसेसचे उत्पादन करेल. फॉक्सकॉनने निर्यातीसाठी तेलंगणामध्ये अ‍ॅपल एअरपॉड्सचे उत्पादनदेखील सुरू केले आहे.

एस अँड पी ग्लोबलच्या विश्लेषणानुसार, २०२४ मध्ये अमेरिकेत आयफोनची विक्री ७५.९ दशलक्ष युनिट्स एवढी होती. मार्चमध्ये भारतातून निर्यात ३.१ दशलक्ष युनिट्स होती. त्यामुळे नवीन क्षमतेद्वारे किंवा देशांतर्गत बाजारपेठेसाठी शिपमेंट वाढवण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिलमध्ये घोषणा केली होती की, २०२५ च्या आर्थिक वर्षात भारतातून १.५ लाख कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले. भारतातील अ‍ॅपल इकोसिस्टम ही देशातील सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी संस्था आहे. देशातील विविध विक्रेत्यांमध्ये सुमारे दोन लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा अंदाज आहे.