पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या तीन दिवसांपासून बलुची बंडखोर आणि अतिरेक्यांकडून सामान्य नागरिक, सुरक्षा जवान लक्ष्य करण्यात येत आहे. तीन दिवसांत अतिरेक्यांच्या हल्ल्यात ७५ पेक्षा जास्त नागरिकांना प्राण गमवावे लागले. अतिरेक्यांकडून रक्तरंजित हल्ले का केले जात आहेत, त्यांच्या मागण्या काय, पाकिस्तान सरकार या हल्ल्यांपुढे वारंवार हतबल कसे ठरते, याचा आढावा…
बलुचिस्तान प्रांतात नेमके काय घडले आहे?
पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतामध्ये पोलीस ठाणे, रेल्वेमार्ग आणि महामार्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणी अतिरेक्यांनी केलेले हल्ले आणि सुरक्षा दलांनी दिलेले उत्तर यामध्ये ७५ पेक्षा जास्त बळी गेले. बलुचिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला असल्याचे बोलले जात आहे. अतिरेक्यांनी इतर प्रांतातील म्हणजे पंजाब, खैबर पख्तुनवा प्रांतातील नागरिकांना लक्ष्य केले. मुसाखेल महामार्गावरील अनेक वाहने थांबवून त्यातील प्रवाशांना बंदुकीने गोळ्या झाडल्या. हत्याकांडाबरोबर अतिरेक्यांनी दळणवळणाच्या सुविधांनाही लक्ष्य केले. महामार्गावरील अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टाला उर्वरित पाकिस्तानला जोडणाऱ्या रेल्वेमार्गावरील एक पूल स्फोटाद्वारे उडवून देण्यात आला. बलुचिस्तान आणि इराण या दरम्यान असलेला रेल्वेमार्गावरही हल्ला करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री सुरू झालेले हल्ल्याचे हे सत्र तीन दिवसांपासून सुरू आहे. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) या अतिरेकी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या हल्ल्यांमागे पार्श्वभूमी काय आहे?
बलुचिस्तान हा पाकिस्तानातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रांत आहे. मात्र डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या या प्रांताची लोकसंख्या कमी आहे. या प्रांतात बलुच जमाती राहतात आणि त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात. उंच पर्वतांनी बनलेल्या या प्रदेशातील बलुच हे अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. पाकिस्तानच्या केंद्र सरकारांकडून आतापर्यंत बलुचिस्तानला हीन वागणून मिळाली, असे तेथील सामान्य नागरिकांचे मत आहे. पाकिस्तान सरकारकडून भेदभाव आणि शोषणाचा सामना करावा लागतो, असा मतप्रवाह तयार झाल्यानंतर तिथे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली. अशी मागणी करणाऱ्या फुटीरतावादी बंडखोरीला खतपाणी मिळाले आणि स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट तिथे तयार झाले आहेत. सध्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’, ‘बलोच यक-जेहती कमिटी’ या संघटनांनी पाकिस्तानी सरकारला आव्हान दिले असून बलुची नसलेल्या नागरिकांना या संघटना लक्ष्य करत आहेत.
या हल्ल्यामागे कोण आहे?
बलुचिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हत्याकांडांमागे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही संघटना आहे. या संघटनेला पाकिस्तान आणि अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. ही संघटना पाकिस्तानी सरकारला विरोध करते आणि पाकिस्तान, इराण व अफगाणिस्तानातील बलुच नागरिक असलेल्या प्रदेशांचा समावेश असलेल्या सार्वभौम राष्ट्राची मागणी करते. बलुचिस्तानमधील सुरक्षा दलांना ही संघटना नेहमीच लक्ष्य करते. पाकिस्तानचे सर्वात मोठे आर्थिक केंद्र असलेल्या शेजारच्या सिंध प्रांतातील कराची शहरातही या संघटनेने हल्ले केले आहेत. पाकिस्तानी तालिबानने नोव्हेंबर २०२२ मध्ये सरकारसोबत युद्धविराम संपवून त्यांच्या सैनिकांना लष्करावर हल्ले पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्याने या गटाला प्रोत्साहन मिळाले. इराण-पाकिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूंना बलुची बंडखोर कार्यरत असल्याने दोन्ही देश हैराण आहेत. मोठ्या प्रमाणावर चिनी नेतृत्वाखालील पायाभूत सुविधा प्रकल्पही अशांतता आणत आहेत. या प्रकल्पांमध्ये अनेक चिनी कामगार काम करत आहेत. त्यामुळे बलुचिस्तानमधील रहिवाशांचे म्हणणे आहे की स्थानिकांना काम न देता त्यांच्याच साधनसंपत्तीचा फायदा घेत त्यांच्यावर अन्याय केला जात आहे.
आणखी वाचा-विश्लेषण : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम भारतीय आरोग्यसेवेवर का होतोय?
पाकिस्तानसाठी बलुचिस्तान का महत्त्वाचा?
पर्वतरांगा असलेला बलुचिस्तान हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. या प्रदेशात अनेक खाणी आहेत. नैसर्गिक वायू, कोळसा, सोने आणि तांब्याच्या खाणी या प्रदेशात असल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी हा प्रदेश महत्त्वाचा आहे. या प्रदेशातील मोठ्या प्रमाणात खाणी असल्या तरी स्थानिकांना त्याचा उपयोग होत नसल्याची वेदना अनेक बलुची नागरिक बोलून दाखवतात. जरी हा प्रांत मोठ्या प्रमाणावर अविकसित राहिला असला तरी, सध्या बलुचिस्तानमध्ये अनेक मोठे विकास प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ग्वादार शहरात बंदर बाधण्यात येत आहे. हे बंदर चीन आणि पश्चिम आशियातील देशांसाठी ऊर्जा आणि व्यापार कॉरिडॉरचे केंद्र असेल, असा अंदाज आहे. पश्चिम बलुचिस्तानमध्ये मकरान विभागात दश्त नदीवर मिराणी धरण बांधण्यात येत आहे. शेतीच्या विकासासाठी हे धरण महत्त्वाचे असून अनेक हेक्टर जमीन शेतीयोग्य होण्याचा अंदाज आहे. येथील सोने आणि तांबे खाण प्रकल्पातही चिनी गुंतवणूक आहे. त्यामुळे हा प्रदेश पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे.
सध्याचे हल्ले हे वेगळे कसे?
बलुची फुटीरतावादी बहुतेक सुरक्षा दल किंवा सरकारी प्रतिष्ठानांवर हल्ले करतात. ज्यामध्ये मृतांची संख्या एकच अंकी असते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बलुचिस्तानातील रक्तरंजित हल्ले हे क्रुरतेची उच्च पातळी प्रकट करतात. बीएलए संघटनेने हल्ल्यांपूर्वी सामान्य नागरिकांना महामार्गांपासून दूर राहण्याचा इशारा दिला, ते सहसा सूचना देत नाहीत. मुसाखेल जिल्ह्यामध्ये बीएलएच्या बंदूकधाऱ्यांनी प्रवशांना बसमधून खाली उतरविले आणि त्यांचे परिचय तपासले. त्यानंतर बलुची नसलेल्या नागरिकांना ठार मारले. बलुचिस्तानच्या अनेक भागांतील बंडखोर, अतिरेकी गट यांना एकत्रित करण्यात बीएलए संघटनेला यश आले असून त्यांची कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. बीएलएमध्ये सुमारे ३.००० अतिरेकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा-विश्लेषण: जर्मनीतील चाकू हल्ल्यामागे ‘इस्लामिक स्टेट’चा हात? ही संघटना युरोपात हातपाय पसरतेय का?
परिणाम काय होणार?
इस्लामाबादस्थित सुरक्षा विश्लेषक सय्यद मुहम्मद अली यांच्या म्हणण्यानुसार बलुचिस्तान प्रांताचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न अतिरेकी संघटनांकडून केला जात आहे. कारण बलुचिस्तान कमकुवत होणे म्हणजे पाकिस्तान कमकुवत होणे. अतिरेक्यांचे हल्ल्यांचे उद्दिष्ट बाहेरील प्रदेशातील लोकांना प्रवास, व्यापार किंवा प्रांतात काम करण्यापासून परावृत्त करणे हा आहे, परंतु ते गुंतवणूक, मदत आणि वस्तू व सेवांच्या प्रवाहात व्यत्यय आणून बलुच लोकांचे जीवन कठीण करतात. दशकभरापासून अतिरेक्यांसाठी लढा देण्यासाठी चाललेले लष्करीकरण आणि त्यामुळे स्थानिकांवर होत असलेला आघात त्यामुळे येथील जनजीवनावर परिणाम झालेला आहे. गेल्या महिन्यात हजारो लोकांनी पोलीस हिंसाचार, इंटरनेट बंद आणि महामार्ग बंद केल्याच्या विरोधात निदर्शने केली. त्यामुळे स्थानिकांचेच बळी गेले आहेत.
sandeep.nalawade@expressindia.com