गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली. फ्लाइट एआय-१७१ म्हणून कार्यरत असलेले बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात असताना टेकऑफ झाल्यानंतर लगेचच एका निवासी वसतिगृहावर कोसळले. या घटनेत २४२ प्रवासी आणि केबिन क्रू तसेच कोसळलेल्या ठिकाणचे सामान्य नागरिक अशा एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पक्ष्यांच्या धडकेमुळे विमान कोसळल्याचा संशय वर्तविण्यात आला होता.

परंतु, ‘सीएनएन-न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तात असे दिसून आले आहे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पक्षांच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याची शक्यता नाकारली आहे. याचे कारण म्हणजे तपासणी दरम्यान कोणतेही मृत पक्षी आढळून आलेले नाही. या शक्यतेनंतर सोशल मिडियावर एका विषयाची चर्चा आहे. तो विषय म्हणजे चाचणीदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये टाकल्या जाणाऱ्या मृत कोंबड्या. विमानाच्या इंजिनमध्ये मृत कोंबड्या का टाकल्या जातात? त्याविषयी जाणून घेऊयात.

विमानाच्या इंजिनमध्ये कोंबड्या टाकण्याचे कारण काय?

  • पक्ष्यांच्या धडकेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी टेकऑफ, लँडिंग किंवा कमी उंचीच्या उड्डाणादरम्यान पक्षी आणि विमानांमधील टक्कर यांसारख्या धोक्यांसाठी कडक सुरक्षा प्रोटोकॉल विकसित करण्यात आले आहेत.
  • विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी आणि विमान कंपन्यांनी हे प्रोटोकॉल विकसित केले आहेत.
  • ताशी ३५० किलोमीटर्सच्या वेगाने जाणाऱ्या विमानाकडे येणारी एखादी लहान वस्तूदेखील गंभीर धोका निर्माण करू शकते.
  • अनेक प्रकरणांमध्ये, कॉकपिट क्षेत्रात पक्षी आदळल्याने विंडशील्ड फुटू शकते किंवा तुटू शकते आणि ज्यामुळे वैमानिकाला दुखापत होण्याची दाट शक्यता असते.
  • जर एखादा पक्षी इंजिनमध्ये गेला तर त्यामुळे टर्बाइन ब्लेडला नुकसान पोहोचू शकते, आग लागू शकते किंवा इंजिन पूर्णपणे खराब होऊ शकते आणि त्यामुळे काही सेकंदातच अपघात होण्याचा धोका वाढतो.
जगभरातील विमान कंपन्या पक्ष्यांच्या धडकेच्या बाबतीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी चाचणीदरम्यान विमानाची ताकद तपासतात. (छायाचित्र-एक्स)

जगभरातील विमान कंपन्या पक्ष्यांच्या धडकेच्या बाबतीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी चाचणीदरम्यान विमानाची ताकद तपासतात. या चाचण्यांचाच एक भाग म्हणून, पक्ष्यांची टक्कर झाल्यास काय घडू शकते आणि विमानावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी इंजिनमध्ये मृत कोंबड्या टाकल्या जातात.

काय असते चिकन गन?

विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यापूर्वी अभियंते चाचणी दरम्यान पक्ष्यांची टक्कर झाल्यास विमानाला काही होऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी इंजिन, विंडशील्ड आणि पंख यासारख्या महत्त्वाच्या घटकांमध्ये मृत कोंबड्या टाकून त्याची चाचणी करतात. ही चाचणी पद्धत ऐकायला जरी विचित्र वाटत असली तरी ही एक वैज्ञानिकदृष्ट्या मान्यताप्राप्त पद्धत आहे. त्यासाठी ‘चिकन गन’ म्हणून ओळखले जाणारे एक विशेष उपकरण वापरले जातात. हे उपकरण एक शक्तिशाली एअर गन सारखे उपकरण आहे. चिकन गनच्या मदतीने पक्ष्यांच्या हल्ल्यासारखी स्थिती तयार केली जाते . त्यामुळे विमान प्रत्यक्ष उड्डाणादरम्यान अशा टक्करींना तोंड देऊ शकते की नाही याची खात्री करण्यास मदत होते.

ही चाचणी विमानाच्या विंडशील्ड आणि इंजिनचा टिकाऊपणा तपासण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. या चाचणीत हाय-स्पीड कॅमेऱ्यांचा वापर करून ही प्रक्रिया रेकॉर्ड केली जाते. त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या फुटेजचा अभ्यास करून नुकसान किती प्रमाणात झाले आहे , हे पाहिले जाते. या चाचणीत खऱ्या कोंबड्यांचा वापर केला जातो कारण त्यांचे वजन आणि आकार उड्डाणादरम्यान आढळणाऱ्या पक्ष्यांशी जुळणारे असते. आज, जगभरातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांकडून ही पद्धत मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाते. या चाचणीला ‘बर्ड स्ट्राइक टेस्ट’देखील म्हटले जाते.

विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यापूर्वी ही विशेष चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये, इंजिन, कॉकपिट विंडशील्ड आणि पंख यासारखे प्रमुख घटक एका फ्रेमवर बसवले जातात. आघाताचे अनुकरण करता यावे यासाठी मृत पक्षी निवडले जातात. या चाचणीसाठी मृत कोंबडी व्यतिरिक्त कृत्रिम पक्षी किंवा जिलेटिन बॉल वापरला जातो. चाचणीसाठी चिकन गन सुमारे ३०० ते ५०० किलोमीटर प्रति तासांच्या वेगाने सेट केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष्यांच्या धडकेदरम्यान होणारे नुकसान

विमानाच्या एखाद्या महत्त्वाच्या भागात कोंबडी टाकल्यानंतर प्रत्येक क्षण हाय-स्पीड कॅमेरा वापरून रेकॉर्ड केला जातो. इंजिनचे ब्लेड तुटलेले आहेत का, विंडशील्डला तडे गेले आहेत का किंवा पंखांचे नुकसान झाले आहे का, हे तपासले जाते. नुकसान झाल्यास ते किती प्रमाणात आणि किती ठिकाणी झाले आहे हे पाहण्यासाठी अभियंते आणि तंत्रज्ञ फुटेजचे बारकाईने परीक्षण करतात. जर कोणतेही मोठे नुकसान आढळले नाही, तर विमान उडण्यासाठी योग्य असल्याचे मानले जाते. सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी इंजिन चाचणी विविध सिम्युलेटेड परिस्थितीतही केली जाते. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार, कोंबडी टाकल्यानंतरही इंजिन किमान दोन मिनिटांसाठी ७५ थ्रस्टवर चालले पाहिजे. हा आपत्कालीन लँडिंगसाठी पुरेसा वेळ असतो. ही चाचणी उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणतेही विमान उडण्यास पात्र ठरत नाही.