आजपासून अमूल दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ करण्यात आली आहे. प्रति लीटर दुधामागे दोन रुपये दर वाढण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. मागील काही काळापासून एकीकडे पट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. गॅस सिलेंडर, तेल, तसेच भाज्यांचे दरही अलिकडच्या काळात वाढलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. मात्र, अमूलने दुधाच्या दरात वाढ का केली? आणि यापुढेही दुधाच्या दरात वाढ होणार का? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील, तर हा लेख नक्की वाचा.

अमूलने दूधाच्या दरात वाढ केल्याची माहिती देणारी प्रेस नोट जाहीर केली आहे. त्यात आजपासून म्हणजे १७ ऑगस्टपासून दूधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दुहेरी टोन्ड दुधाची अमूल ताजा म्हणून विक्री केली जाते, आता त्याची किंमत ४२होती आता ती ४४ रुपये प्रती लिटर झाली आहे. अमूल गोल्ड, फुल क्रीम दूध, पूर्वीच्या ६० रुपयांच्या तुलनेत ६२ रुपये लिटर दराने विकले जात आहे. अमूल शक्ती ५६ रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर ५० रुपये प्रति लिटर झाला आहे. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड ३१ रुपये आणि अमूल ताजा २५ रुपयांना तर अमूल शक्तीचा दर २८ रुपये करण्यात आला आहे.

देशभरातील डेअरी कंपन्यांनी अमूलचे उदाहरण घेऊन लवकरच त्यांच्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. मदर डेअरीने यापूर्वीच दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या किंमतीत अमूल प्रमाणेच वाढ केली आहे.

हेही वाचा- विश्लेषण: पोलिओ पुन्हा एकदा चर्चेत का? सांडपाण्यातून त्याचा फैलाव कसा होत आहे? कितपत धोका?

दुधाचा दर वाढवण्याचं कारण काय?

कंपनीचा एकूण खर्च आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्यानं कंपनीने दुधाच्या दरात वाढ केल्याचं अमूल कंपनीनं सांगितलं आहे. गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या खर्चात दरवर्षी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीला या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागणार आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यातही आठ ते नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी अमूल कंपनीने दुधाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमूलने प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे की एमआरपीमध्ये किंमत वाढ ४ टक्के आहे – जी चलनवाढीच्या प्रचलित दरापेक्षा कमी आहे. “एकूण कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ गुरांच्या चारा खर्चात अंदाजे २०% वाढ झाली आहे. निविष्ठा खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, आमच्या सदस्य संघटनांनी मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मोबदल्यातही ८-९% वाढ केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मार्चमध्येही करण्यात आली होती वाढ

अमूलने याआधी मार्च महिन्यामध्ये पॅकेज आणि ताज्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यामागे कंपनीने वाढत्या इंधन दराचं कारण देत वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे दरवाढ केल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा- विश्लेषण: मृत प्राण्यांचे अवयव पुनरुज्जीवित करण्यात यश?

सध्या दुधाचा खरेदी दर किती आहे?

सध्या, ३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के SNF (घन-नॉट-फॅट) असलेल्या दुधाची खरेदी किंमत सुमारे ३३ ते ३६ रुपये प्रती लिटर आहे. पुण्यातील खाजगी डेअरी इंदापूर डेअरी अँड डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेड, जी ‘सोनई’ या ब्रँडखाली दुधाची किरकोळ विक्री करते. या कंपनीने ५ ऑगस्ट रोजी शेतकर्‍यांना ३२ रुपयांवरून २ रुपये प्रती लिटर किंमत दिली होती.

दुधाचा तुटवडाच दरवाढीसाठी मुख्य कारण

या डेअरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दशरथ माने यांनी दरवाढीसाठी दूध संकलनातील तुटवडा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. “आमची डेअरी आता दररोज २० लाख लिटर दुधाचे संकलन करत आहे. गेल्या ऑगस्टमध्ये दररोज सुमारे २३ लाख लिटर संकलन होते. दूधाची ही कमतरताच दरवाढीसाठी मुख्य कारण असल्याचे माने यांनी म्हणले आहे.

देशभरातील दुग्धशाळा दूध संकलन ८ ते १० टक्के कमी असल्याचे सांगत आहेत. पावसाळा जोरात सुरू असतानाही ही घट झाली आहे. साधारण पावसाळ्यात गाई-म्हशींना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मात्र, देशाच्या बहुतांश भागात सतत आणि मुसळधार पावसामुळे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन कमी झाले आहे. प्रथिने आणि खनिज मिश्रणाच्या किंमतीतही वाढ झाली आहे, ज्यामुळे पशुखाद्याची किंमत वाढली आहे. या दरवाढीचा एकंदरीत परिणाम दुग्धव्यवसायातील दूध उत्पादन आणि संकलन कमी होण्यावर झाला आहे.

मागणी आणि पुरवठ्यात साम्य नाही

सततचा पाऊस पाहता, गुजरातसारख्या काही प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये गुरांमध्ये रोगांचे प्रमाण वाढले आहे. गुजरातमध्ये ढेकूळ त्वचारोग ही एक मोठी समस्या म्हणून उदयास आली आहे. ज्यामुळे राज्यातील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. “मागणी आणि पुरवठा यामध्ये साम्य जुळत नसल्यामुळे डेअरींनी त्यांच्या किरकोळ किंमती वाढवल्या असल्याचे माने म्हणाले.

हेही वाचा- विश्लेषण : एका जहाजाच्या निमित्ताने भारत-चीन मधील संबंध आणखी का ताणले जाऊ शकतात?

दूध खरेदीच्या दरात वाढ

फ्रेंच डेअरी कंपनी लॅक्टालिस प्रभातचे सीईओ राजीव मित्रा म्हणाले की, महाराष्ट्रात त्यांच्या दैनंदिन दूध संकलनात १० टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या डेअरी दररोज १० लाख लिटर दूध संकलन करत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. केवळ गुरांच्या चारा खर्चात २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच, ऑपरेशन्सचा खर्च वाढला आहे. वाहतूक, रसद, मनुष्यबळ आणि ऊर्जा खर्चात वाढ होत आहे. निविष्ठा खर्चात वाढ झाल्यामुळे, दूध खरेदीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढले असल्याचे मित्रा म्हणाले.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची किरकोळ मागणी कशी आहे?

करोनामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या काळात दुधाच्या मागणीचे प्रमाण कमी जाले होते. आता सर्व गोष्टी पुन्हा पूर्वपदावर येत असल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग (HORECA) व्यवसायातील दूधाची मागणी गेल्या वर्षीच्या मागणीपेक्षा जास्त आहे.

ऑक्टोबरमध्ये दूधाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्टोबरमध्ये बहुतेक दुग्धव्यवसायिक दुधाच्या दरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. दुग्धव्यवसायात, हिरवा चारा आणि पाण्याची सहज उपलब्धता झाल्यामुळे जनावरे नैसर्गिकरीत्या अधिक स्तनपान करतात तेव्हा फ्लश सीझन सुरु होतो. फ्लश सीझन सुरू होईपर्यंत दूधाच्या किरकोळ आणि खरेदी बाजारात किंमतीत वाढ होण्याची शक्यता महाराष्ट्रातील एका खाजगी दूध विक्रेत्याने व्यक्त केली आहे.