लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसचे शेलक्या शब्दांमध्ये वाभाडे काढण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुळीच सोडली नाही. अगदी पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांचे संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. यानंतर मोदी सरकारविरोधात कृष्णपत्रिका काढण्यात आली आणि निषेध वगैरे झाला. …तरीही मोदींच्या एका वाक्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ते वाक्य होतं, “काँग्रेसचं अधःपतन पाहून वाईट वाटतं.” इतकंच नाही तर ममता बॅनर्जींनी काँग्रेसला दिलेल्या आव्हानाचा संदर्भ देत मोदी म्हणाले “तुम्हाला पश्चिम बंगालमधून आव्हान दिलं गेलं आहे की, तुम्ही (काँग्रेस) ४० जागाही जिंकणार नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की, तुम्ही किमान ४० जागा तरी जिंका.” पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही दोन्ही वाक्य विचारात घेण्यासारखी आहेत. खरंच काँग्रेस हा रसातळाला गेलेला पक्ष ठरला आहे?, खरंच काँग्रेसचं अधःपतन होतंय?
महाभारतात कौरवांची महासत्ता होती. पांडवांना संघर्ष करावा लागला. त्यांच्या साथीला कृष्ण होता त्यामुळे अखेरीस कौरवांची सत्ता उलथवून टाकण्यात त्यांना यश आलं. भीष्म पितामाह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन असे सगळे दिग्गज कौरवांच्या बाजूने होते. तरीही पांडवांना कृष्णाच्या मदतीने संघर्ष करुन सत्ता मिळवता आली. राजकारणाची तुलना ही कायम महाभारताशी करण्यात येते म्हणून हा संदर्भ लक्षात घेतला तर एकेकाळी लोकसभेत दोन जागा मिळवणारा भाजपा हा पक्ष नंतर ३०३ जागा मिळवणारा आणि आता ४०० पारचा नारा देणारा पक्ष ठरला आहे. तर एकेकाळी लोकसभेत ४५० जागा मिळवणाऱ्या पक्षाची अवस्था २०१९ मध्ये अवघ्या ५२ जागांवर आली. हे सगळं का घडलं यावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न
दोन महिन्यांपूर्वीच झाली लिटमस टेस्ट
दोन महिन्यांपूर्वी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगण. या चार राज्यांच्या निवडणुकांकडे लोकसभेची `’लिटमस टेस्’ट म्हणून पाहिलं गेलं. निकालाच्या दिवसापर्यंत राजस्थान आणि मध्यप्रदेशात आपलीच सत्ता येणार असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. मात्र निकालात बाजी मारली ती, भाजपाने. चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाचं सरकार आलं. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश ही तीन राज्यं भाजपाने काबीज केली. या निकालांचं सविस्तर विश्लेषण राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलं आहे.
सुहास पळशीकर यांचं म्हणणं नेमकं काय?
सगळे ट्रेण्ड, एक्झिट पोल यांना मागे सारत भाजपाची तीन राज्यांमध्ये सरशी झाली. हा टप्पा लोकसभा निवडणुकीच्या आधीचा महत्त्वाचा आहे. कर्नाटकमध्ये अपयश आणि तीन राज्यांमधलं यश यांची तुलना केली तर भाजपाची वाटचाल विजयाकडे चालली आहे. मोदींनी मिळवलेलं एकहाती यश आहे असं मला वाटतं, असं पळशीकर सांगतात. कारण प्रचाराचा चेहरा पंतप्रधान मोदीच होते. काँग्रेसला पुढे जायचं असेल तर सातत्य फार आवश्यक आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, त्या यात्रेची चर्चा झाली. त्या यात्रेला प्रतिसादही चांगला मिळाला. पण पुढे काय? लगेच दुसरी भारत जोडो यात्रा का काढली गेली नाही? काँग्रेसला असा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे जो कार्यक्रम फक्त नेत्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांनाही जोडेल, असंही सुहास पळशीकर सांगतात.
इंडिया आघाडीतले पक्ष हे काँग्रेसला त्यांच्याप्रमाणेच लहान पक्ष झाल्याचं पाहून सुखावले आहेत. मात्र ही त्या पक्षांसाठीही धोक्याची घंटा आहे. कारण काँग्रेसला मध्यवर्ती भूमिकेत ठेवायचं नाही असं इतर पक्षांनी ठरवलं आहे, त्यामुळे त्यांचं राजकारण पुढे कसं जाणार? देशातल्या इंडिया आघाडीने ‘टेक ऑफ’च्या वेळीच शांत बसायचं ठरवलेलं आपण पाहिलं. त्यांना लोकांमध्ये जावं लागेल, असंही मत सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं होतं.
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली तुलना
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करताना पळशीकर म्हणाले, “राहुल गांधी हे अद्याप उत्तरेच्या पट्ट्यातील लोकांना नेतृत्व म्हणून आकर्षित करू शकलेले नाहीत. मतपरिवर्तन करु शकत नाहीत तसंच त्यांचं मनपरिवर्तनही करु शकत नाहीत. इथे राहुल गांधींची मर्यादा लक्षात येते. कारण पंतप्रधान मोदी यांनी एकप्रकारे आपली पूर्ण छाप पाडून या लोकांचा, मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. अशा प्रकारे विश्वास संपादन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे मोदी मी फकिर आहे असंही भाषणांमध्ये सांगतात आणि ते लोकांना पटतं. त्यांनी त्यांचा करीश्मा काय हे सातत्याने दाखवून दिलं आहे. राहुल गांधी यामध्ये कमी पडले आहेत. ज्याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार हे उघड आहे. उत्तरेच्या पट्ट्याचा विचार केला तर त्या परिस्थितीसाठी फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधींना मर्यादा आहेत पण काँग्रेसने मागच्या तीस वर्षात एक पोकळी आपोआप तिथे निर्माण केली आहे. राजीव गांधी यांच्यानंतर तिथे त्यांच्याइतका बडा नेता कुणी झाला नाही हे वास्तव आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र उत्तर भारत पट्टा सोडून राहुल गांधींना बरा प्रतिसाद मिळाला हे नाकारता येणार नाही.” सुहास पळशीकर यांनी मांडलेली ही मतं काँग्रेसला देशभरात असलेल्या मर्यादा सांगणारीच आहेत. द वायरला दिलेल्या मुलाखतीत सुहास पळळशीकर यांनी हे भाष्य केलं आहे.
१९८४ ते २०१९ या कालावधीत काँग्रेसची मतांची टक्केवारी कशी राहिली?
१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर काँग्रेसला मिळालेली मतं ही छप्पर फाडके होती. कारण लोकसभेत काँग्रेसला ४५० जागा जिंकता आल्या. काँग्रेस १९८४ मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यावेळी भाजपाला फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं. १९८४ मध्ये काँग्रेसला मिळालेली मतं ही एकूण मतांच्या ४९ टक्के होती. तर भाजपा तेव्हा टक्केवारीच्याही खाली होता. १९८४ ते २०१९ या कालावधीत १० वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यामध्ये १९९६ ते १९९९ या काळात एनडीएचं सरकार होतं. अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. २००४ ची निवडणूक ही इंडिया शायनिंगच्या मुद्द्यावर पार पडली होती. त्यावेळी काँग्रेसची मतं घटली होती भाजपाने त्यांच्याशी जवळपास बरोबरी केली होती. मात्र सत्तेत काँग्रेस आणि यूपीएच आलं. २००९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला निर्विवाद यश मिळालं. मात्र काँग्रेसची मतं ५२ जागांवर येऊन ठेपणं आणि भाजपाने ३०० पार जाणं यासाठी २०१९ हे वर्ष उजाडलं. २०१४ मध्ये भाजपाला ३०३ मतं मिळाली ही मतांची टक्केवारी होती एकूण मतांच्या ३८ टक्के. या जोरावर भाजपाने दुसऱ्यांदा लोकसभा जिंकली.
भाजपाला मिळालेलं हे यश आणि काँग्रेसला मिळालेलं अपयश याची प्रमुख कारणं यांचा विचार केला तर लक्षात येतं की भाजपाने राम मंदिराचा मुद्दा, हिंदुत्व हे सातत्याने लावून धरलं. त्या अनुषंगाने आंदोलनं केली. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांना वाचा फोडली. २०११ मध्ये जनलोकपाल आंदोलन हे भाजपासाठीही महत्त्वाचं ठरलं. तसंच दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणातही सरकार म्हणून काँग्रेस ठोस असं काहीही करु शकलं नाही. त्यामुळे देशाची सत्ता भाजपाच्या हाती जाणार हे जवळपास दिसू लागलं. यानंतर सर्वात महत्त्वाचा ठरला तो म्हणजे मोदी फॅक्टर. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना मिळालेली अमाप प्रसिद्धी. गोध्रा प्रकरणामुळे झालेली बदनामी, अमेरिकेने व्हिसा नाकारणं. सोनिया गांधींनी त्यांना ‘मौत के सौदागर’ म्हणणं या सगळ्या गोष्टी एका पारड्यात आणि नरेंद्र मोदींनी राबवलेला गुजरात पॅटर्न एका पारड्यात टाकला गेल्या तेव्हा जनतेच्या दृष्टीने मोदींच्या गुजरात पॅटर्नचं पारडं जड ठरलं. त्यामुळे देशाच्या जनतेला मोदी हे एक आश्वासक चेहरा वाटू लागले.
हे पण वाचा- विश्लेषण : पंतप्रधान मोदी तेली समाजाचे असल्याचा राहुल गांधींचा दावा; मात्र, गुजरातमधील तेली समाज नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या…
यूपीएच्या काळातले घोटाळे
टू जी स्पेक्ट्रम घोटाळा
हेलिकॉप्टर घोटाळा
आदर्श घोटाळा
कॉमनवेल्थ घोटाळा
कोळसा घोटाळा
शारदा चिटफंड घोटाळा
आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग
एअरसेल मक्सिस कंपनीत परकिय गुंतवणुकीला संमती देताना अनियमितता
अॅक्ट्रिस देवास यांच्या सॅटलाईट करारात भ्रष्टाचार
माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव आणि कुटुंबावर नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप
या घोटाळ्यांचा उल्लेख आपल्या प्रचारांच्या भाषणात करत मोदींनी आणि भाजपा नेत्यांनी आपला करीश्मा काय असतो ते दाखवून दिलं. एवढंच नाही काळा पैसा परत आणणार, दोन कोटी रोजगार दर र्षी निर्माण करणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार यांसारख्या लोकप्रिय घोषणा देऊन भाजपाने त्यांचा विजय जवळपास निश्चित केला.
सोशल मीडियाची भूमिका
२०१४ आणि २०१९ या दोन्ही कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय होण्यामागे सोशल मीडियाचा मोठा हात आहे. सोशल मीडियावर ज्या प्रकारे प्रचाराचं, भाजपाचं कँपेनिंग करण्यात आलं त्याला खरंच जवाब नाही. मोदींची आश्वासनं जनतेपर्यंत पोहचवणं, पंतप्रधान मोदींनी हिंदू मंदिरांमध्ये जाऊन केलेली पूजा इथपासून ते त्यांचा सूट किती रुपयांचा आहे. त्यांना देशातल्या जनतेबाबत काय वाटतं? २०१९ मध्ये एअर स्ट्र्राईक करुन घेतलेला पाकिस्तानचा बदला या सगळ्या गोष्टींचा प्रचार सोशल मीडियावर खूप प्रभावीपणे केला गेला. भाजपाने अतिशय स्मार्टपद्धतीने सोशल मीडियाचा वापर केला आणि तरुणाईच्या मनाला हात घातला, जे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना जमलं नाही. २०१४ च्या प्रचाराच्या आधी काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा भाजपाने प्रचारात केलेला वापर आणि मोदी हा चेहरा आश्वासक वाटणं या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. तर २०१९ च्या निवडणुकीच्या आधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेला ‘एअर स्ट्राईक’ हा लोकांच्या लक्षात राहिला. काँग्रेसने त्याचे पुरावे मागितले त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या. आणि आणखी एका पराभवाचा सामना काँग्रेसला करावा लागला. काँग्रेसला उभारी घ्यायची असेल तर काँग्रेसने गांधी आणि नेहरु घराण्याबाहेर जाऊन नेतृत्वासाठी विचार करणं आवश्यक आहे असा सल्ला नुकताच शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही दिला.
हे पण वाचा- “थँक्यू अधीर रंजनजी..” म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली घराणेशाहीची व्याख्या
शर्मिष्ठा मुखर्जी त्या मुलाखतीत काय म्हणाल्या?
काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पक्षाचं देशातलं स्थान आजही निर्विवाद आहे. मात्र पक्षाला उभारी आणायची असेल, बळ द्यायचं असेल तर पक्षाच्या नेत्यांनी काम करण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षाने सदस्य मोहीम चालवली पाहिजे. तसंच पक्षातंर्गत निवडणुका घेऊन लोकशाही पद्धत अवलंबली पाहिजे. मोठे किंवा छोटे निर्णय यासंबंधी पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यानंतर निर्णय घेतले पाहिजेत. माझे वडील प्रणव मुखर्जी यांनीही त्यांच्या डायरीत लिहिलं आहे की लोकांमध्ये जाऊनच काँग्रेसला मोठं व्हावं लागेल. जादूची छडी फिरवली आणि बळ मिळालं असं होणार नाही.”
शर्मिष्ठा मुखर्जी पुढे म्हणतात “काँग्रेसने एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती अशी की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर कुठल्याही पक्षात नेतृत्व बदल झालाच असता. भाजपात असं काही झालं असतं तर तिथेही नेतृत्व बदल झालाच असता. एकच नेता आपल्या पक्षाला हरवत आहे त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी चेहरा कोण असेल याचा विचार केला पाहिजे. ” शर्मिष्ठा मुखर्जींचं हे म्हणणं व्यापक स्तरावर योग्यच आहे असं म्हणता येईल. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडून यायला पक्षाने २१ वर्षे घेतली. त्याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच पक्षाचे अध्यक्ष होते.
हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर काँग्रेसची अवस्था ही शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांसारखी का झाली आहे, ते सहज लक्षात येतं. काँग्रेसने स्वतःत आवश्यक ते धोरणात्मक बदल केले नाहीत तर त्यांना भाजपा सारख्या त्यांच्यानंतर बलाढ्य झालेल्या पक्षाला तोंड देणं कठीण होत जाईल यात काहीही शंका नाही.