लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे पक्षांतराचे प्रमाण वाढते. उमेदवारी मिळाली नाही, किंवा त्याची खात्री झाली की मग निष्ठा बदलली जाते. २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता गेल्यानंतर देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठे धक्के बसले. भविष्यातील राजकीय गणिते ओळखून या पक्षातील नेत्यांनी अन्यत्र मार्ग शोधला. त्यात आता मुंबईतील वजनदार नेते मिलिंद देवरा यांची भर पडली. कुटुंबीयांचा काँग्रेसशी असलेला ५५ वर्षांचा संबंध तोडत, ४७ वर्षीय मिलिंद देवरा हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले.

मिलिंद हे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे पुत्र. मुरली देवरा यांचा उद्योगजगताशी स्नेह होता. मुंबई काँग्रेसवर त्यांची पकड होती. केंद्रात देवरा यांच्या शब्दाला वजन होते. मिलिंद यांचाही उद्योग वर्तुळात उत्तम संपर्क आहे. काँग्रेसचा त्यांनी राजीनामा दिल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच एक प्रमुख नेता पक्षाबाहेर पडलाय. त्याचे जनमानसात स्थान किती आहे या मुद्द्यापेक्षा माजी केंद्रीय मंत्र्याने पक्षाचा त्याग करणे, तीही पक्षाशी पाच दशके संबंधित असलेल्या कुटुंबातील व्यक्तीने यातून एक निश्चित राजकीय संदेश कार्यकर्त्यांमध्ये जातो. गेल्या पाच वर्षांत ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद अशी काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची मोठी यादी आहे. आता याचा फटका काँग्रसला बसतोय.

No sign of Gandhis yet from Amethi
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?
Kolhapur, Modi, Congress,
कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
wardha lok sabha seat, Dr. Sachin Pavde, maha vikas aghadi candidate amar kale, Dr. Sachin Pavde s Presence congress event, Sparks Speculation congress entry,
‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवी काँग्रेसमध्ये? नेमके काय झाले, वाचा…

ज्योतिरादित्य शिंदे

ग्वाल्हेर राजघराण्यातील ज्योतिरादित्य शिंदे यांनी चार वेळा खासदारकी भूषवली. मार्च २०२० मध्ये मध्य प्रदेशातील २२ समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम ठोकला. यामुळे राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार तर कोसळलेच पण राज्यात पक्षाला उभारी मिळाली नाही. कारण गेल्याच महिन्यात भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय मिळवला. यात ज्योतिरादित्य यांच्या ग्वाल्हेर पट्ट्यातही भाजपची कामगिरी उत्तम झाली. पक्षांतरानंतर ज्योतिरादित्य यांच्याकडे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवून भाजपने त्यांना मानाचे स्थान दिले. त्यांच्या काही निकटवर्तीयांनाही मध्य प्रदेशातील मोहन यादव यांच्या मंत्रिमडळात संधी मिळाली.

जयवीर शेरगील

काँग्रेसमध्ये २०१४ मध्ये जयवीर शेरगील यांची निवड झाली. निवड अशासाठी की, देशभरातून एका विशेष मोहिमेद्वारे त्यांना घेण्यात आले. मूळचे जालंधर असलेले जयवीर शेरगील यांनी २०२२ मध्ये पक्ष सोडला. पक्षात गुणवत्तेला वाव नसून, स्तुतिपाठकांची भरती आहे असा त्यांचा आरोप होता. आता त्यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे.

जितीन प्रसाद

उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समुदायातील प्रमुख चेहरा असलेल्या जितीन प्रसाद यांनी जून २०२१ मध्ये काँग्रेसचा त्याग गेला. काँग्रेस पक्षसंघटनेत आमूलाग्र बदलांची गरज आहे असे पत्र २०२० मध्ये ज्या २३ नेत्यांनी दिले होते, त्यापैकी प्रसाद हे एक होते. २००१ पासून ते पक्ष संघटनेत होते. केंद्रात मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले. ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे ते पुत्र. भाजप हाच खरा राष्ट्रीय पक्ष आहे असे त्यांनी काँग्रेस सोडल्यावर स्पष्ट केले होते. आता उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत.

आरपीएन सिंह

काँग्रेसचा प्रसारमाध्यमांत एक प्रमुख चेहरा अशी पूर्व उत्तर प्रदेशातील आर.पी.एन.सिंह यांची ओळख. इतर मागासवर्गीय कुर्मी समाजातून ते येतात. जरी व्यापक जनाधार नसला तरी, तीन दशके ते काँग्रेसशी संबंधित होते. तीन वेळा ते आमदार होते. जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप कार्यरत आहे असे सांगत जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी या पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी काही महिने आधी नोव्हेंबर २०२१ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा हात सोडला. सुरुवातीला त्यांनी प्रादेशिक पक्ष काढला नंतर तो भाजपमध्ये विलीन केला. आता त्यांची कन्या पंजाब भाजपमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी आहे.

अन्य पक्षांमध्येही सक्रिय

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सर्वांनीच भाजपची वाट धरली असे नव्हे, काही जण इतर पक्षांमध्येही सक्रिय राहिले आहेत. यात महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुष्मिता देव यांचे नाव प्रमुख आहे. आसाम काँग्रेसमधील प्रमुख कार्यकर्त्या असलेल्या देव यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष नेतृत्वाने आसामबाबत घेतलेल्या निर्णयांनी त्या समाधानी नव्हत्या असे सांगितले जाते. तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी मे २०२२ मध्ये काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेची खासदारकी मिळवली. त्यानंतर तीनच महिन्यांनी जम्मू व काश्मीरमधील नेते व माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद काँग्रेसबाहेर पडले. तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्यांनी पत्र पाठवत आपली नाराजी विशद केली. आझाद यांनी केंद्रातही दीर्घकाळ मंत्रिपद भूषवले. त्यांनी डेमॉक्रेटीक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष स्थापन केला. त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे मानले जाते. जम्मू व काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत आझाद यांचा प्रभाव किती आहे ते दिसेल.

पक्षाविरोधात वातावरणनिर्मिती

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांपैकी अनेकांना मोठी पदे दिली. तरीही राजकीय स्थिती पाहून त्यांनी आपला मार्ग निवडला. यातून काँग्रेसविरोधात वातावरणनिर्मिती होण्यास मदत झाली. राजकारणात काही वेळा आकलनही महत्त्वाचे ठरते. हा मुद्दा विचारात घेता, पक्षातून नेते बाहेर पडत आहेत अशा स्वरूपाच्या चर्चेचा सूर राहतो. ऑगस्ट २०१५ मध्ये आसाममध्ये तत्कालीन मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्या वेळी राहुल गांधी यांना त्यांनी लक्ष्य केले होते. हा मुद्दा देशभर चर्चेत होता. आज भाजपने आसामच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सरमा यांच्याकडे दिली. त्याबरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये समन्वय साधण्याचे कामही सोपवले. ही छोटी राज्ये असली तरी, या आठ राज्यांमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत. मणिपूर वगळता काँग्रेसला अन्यत्र या जागांवर आगामी २०२४ च्या लोकसभेला फारसे यश मिळेल अशी स्थिती नाही. सरमा यांनी पक्ष सोडणे काँग्रेसला महागात पडले. त्यामुळे देवरांपर्यंत पक्षातून बाहेर पडणाऱ्यां नेत्यांची मालिका बघता, राजकीय संदेश म्हणून काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे.

hrishikesh.deshpande@expressindia.com