हवामान खात्याने मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी त्यासंदर्भात काही घोषणा केल्या. यात यावर्षी वेळेआधी मोसमी पाऊस दाखल होणार, पाऊस अपेक्षेपेक्षा अधिक असणार असे सांगितले. तो वेळेआधीच दाखल झाला असला तरी त्याच्या वाटचाल मात्र मध्यातच मंदावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोसमी पावसाच्या आगमनासंदर्भात शंकांना पेव फुटले आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र कोरडाठाक आहे.

मोसमी पावसाची वाटचाल का मंदावली?

अंदमान-निकोबारनंतर केरळमध्ये मोसमी पाऊस वेळेआधीच दाखल झाला. तर महाराष्ट्रातदेखील नियोजित वेळेपूर्वीच मोसमी पावसाने प्रवेश केला. पुणे, मुंबई, कोल्हापुरात तो दाखल झाला आणि त्यानंतर विदर्भात यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर याठिकाणी तो दाखल झाला. वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाल्याने तो काही दिवसातच राज्य व्यापणार असे वाटत असताना मोसमी पावसाची वाटचाल मंदावली. मोसमी पावसाची केवळ एकच अरबी समुद्रीय शाखाच महाराष्ट्रात पुढे सरकत आहे. तर बंगालच्या उपसागराची शाखा स्थिरावली आहे. त्यामुळे राज्यात सध्या मोसमी पाऊस थबकल्याचे चित्र आहे. सध्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मोसमी पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते.

हेही वाचा…माउथवॉश वापरल्यामुळे होतोय कॅन्सर? अहवालात समोर आली धक्कादायक माहिती

मोसमी पावसाची प्रतीक्षा कुठेकुठे?

मोसमी पावसाने संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. तर खान्देश, पूर्व विदर्भात मोसमी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात यवतमाळ, अकोला तसेच अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यातच मोसमी पावसाची घोषणा हवामान खात्याने केली. मोसमी वाऱ्याच्या प्रगतीसाठी असून चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. तेलंगणा, तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात तो दाखल झाला आहे. येत्या चार ते पाच दिवसात मोसमी पाऊस ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्रप्रदेश येथे दाखल होणार आहे.

मोसमी पावसाचा कालावधी नेमका किती?

महाराष्ट्रात साधारणपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत मोसमी पावसाने हजेरी लावून परत जाणे अपेक्षित आहे. या कालावधीत पडणारा पाऊस नैसर्गिक समजला जातो. तर परतीच्या मोसमी पावसाच्या कालावधीत कमी गारपीट, कमीअधिक थंडी आणि हलके धुके दिसून येतात. मोसमी पावसाच्या आगमनाची आणि परतीची ही स्थिती नैसर्गिक मानली जाते. मोसमी पावसाच्या हंगामात पावसाची तीव्रता महत्त्वाची नाही, तर तो किती दिवस पडला हे महत्त्वाचे असते. कारण नियोजित कालावधीनंतर परतीचा पडलेला पाऊस हा महत्त्वाचा नसतो. तर तो बरेचदा नुकसानदायकदेखील ठरतो.

हेही वाचा…आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या जोशीमठचे नामांतर; कारण काय? या जागेचे धार्मिक महत्त्व काय?

मोसमी पावसाचा कालावधी बदलला का?

मोसमी पाऊस देशाच्या विविध भागांत दाखल होण्यापूर्वी पूर्वमोसमी पाऊस दाखल होतो. त्यानंतर अवकाळी पाऊसही सुरूच असतो. कमीअधिक प्रमाणात वर्षभर पावसाचे चक्र सुरू राहते. यावर्षी देशाच्या विविध भागात जवळजवळ वर्षभर अवकाळी पाऊस दिसून आला. मात्र, मोसमी पावसाचा कालावधी अधिक महत्त्वाचा समजला जातो. कारण, याच पावसावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. जून ते सप्टेंबर या कालावधीत मोसमी पाऊस पडतो. अलीकडच्या काही वर्षात मात्र, हा कालावधी संपल्यानंतरही मोसमी पावसाचे चक्र सुरूच असल्याचे दिसून आले. कधी उशीरा प्रवेश तर कधी उशीरापर्यंत मुक्काम असा मोसमी पावसाचा कालावधी बदलत आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंतही मोसमी पावसाच्या परतीच्या घडामोडी सुरू असल्याचे दिसून आले आहे.

पेरणीवर काय परिणाम?

महाराष्ट्रात अजूनही मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. याउलट मोसमी पावसाची गती महाराष्ट्रात मंदावली. हवामान खात्याच्या आधीच्या अंदाजामुळे पूर्ण राज्यातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले होते. वेळेआधीच मोसमी पावसाची घोषणा झाल्यानंतर पेरणीदेखील सुरू झाली. मात्र, मोसमी पावसाची वाटचालच रखडल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. पेरणी केलेला शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे, तर पेरणी न केलेला शेतकरीदेखील खात्याच्या अंदाजानुसार पेरणीयोग्य पाऊस कधी बरसणार याची वाट पाहात आहे.

हेही वाचा…नेतान्याहू यांनी आणीबाणी सरकार का विसर्जित केले? गाझा पट्टीतील युद्धावर काय परिणाम होईल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांगला पाऊस कधी?

मोसमी पावसाने जवळजवळ संपूर्ण कोकण व्यापला, पण महाराष्ट्रासह इतर काही भागात अजूनही पावसाची वाट आहे. येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात तो पूर्णपणे सक्रिय होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कालावधीत मोसमी पावसाची बंगालची शाखा पूर्व भारतात पुढे सरकेल. तर त्याचवेळी मोसमी पावसाची अरबी समुद्रीय शाखादेखील सह्याद्रीच्या पूर्वेकडे प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवार म्हणजेच २३ जून नंतरच राज्यात मोसमी पावसाची सक्रियता वाढेल. त्यानंतरच राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस दाखल होईल. खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते.

rakhi.chavhan@expressindia.com