ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध झाल्यामुळे गेले काही दिवस शहरात कचरा कोंडी झाल्याचे चित्र वरचेवर दिसून येत आहे. खरे तर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेला डायघर कचरा प्रकल्प हेच शहरातील कचराकोंडीमागचे खरे कारण असल्याची बाब समोर येत आहे. हा प्रकल्प बंद का आहे, त्या मागचे कारण काय आणि त्यामुळे शहरात कचराकोंडी कशी झाली, याविषयी सविस्तर जाणून घेऊ. 

ठाणे पालिकेची कचराभूमी नाही 

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला, तर ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभूमी नाही. यामुळे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. पण या ठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नव्हती. कचरा दुर्गंधी आणि आगीमुळे परिसरात धूर पसरत होता. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांनी कचरा प्रकल्पास विरोध केला होता. यानंतर पालिकेने दिवा कचरा भूमी बंद करून पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरूपात कचरा प्रकल्प उभारला होता. डायघर येथे कचरा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. यामुळे भंडार्ली येथे वर्षभरासाठी कचरा प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु दीड वर्षे होऊनही तो सुरूच होता. या प्रकल्पामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांकडून विरोध होत होता. डायघर कचरा प्रकल्प कार्यान्वित होताच पालिकेने भंडार्ली प्रकल्प बंद केला.

१४ वर्षांनंतर डायघर कचरा प्रकल्प   

ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या सोडविण्यासाठी डायघर येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीचा निर्णय प्रशासनाने २००८ मध्ये घेतला होता. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प उभारण्यात पालिकेला यश येत नव्हते. या ठिकाणी कचऱ्यापासून वीज तसेच बायो सीएनजी गॅसची निर्मिती करण्याचा प्रकल्पाची पालिकेने आखणी केली आणि त्यासाठी स्थानिकांची समजूत घालण्यास सुरुवात केली. हा प्रकल्प कशा प्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही, याचे प्रात्यक्षिक घनकचरा विभागाने स्थानिकांना दाखविले. या प्रकल्पात प्रायोगिक तत्त्वावर १५ टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून प्रकल्पाची चाचणी घेतली होती. २०२३ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. प्रकल्पात वीज निर्मितीचे काम सुरू झाले नसले तरी याठिकाणी कचरा वर्गीकरणाचे काम केले जात होते. गेले १४ वर्षे कागदावर असलेला प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शहरातील कचरा समस्या सुटली होती. 

सीपी तलाव येथे विरोध का?

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येते. ज्या भागात वाहने जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी कचरावेचकांमार्फत कचरा उचलण्यात येतो. हा कचरा वागळे इस्टेट येथील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर आणला जातो. येथे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर कचरा डायघर प्रकल्पस्थळी नेला जातो. परंतु येथे कचऱ्याचे मोठे ढीग लागले आहेत. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठी गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण आहेत. त्यातच गेल्या आठ दिवसांत या केंद्रावरील कचऱ्याला दोनदा आग लागली. या आगीचा धूर परिसरात पसरल्याने नागरिकांना त्रास झाला. यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागताच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच यापुढे या केंद्रावर एकही कचरा गाडी आणू नका आणि गाडी आणण्याचा प्रयत्न केला तर गाड्या फोडून टाकू असा इशारा दिला. यानंतर पालिका प्रशासनाने भिवंडी येथील आतकोली परिसरात राज्य शासनाने कचराभूमीसाठी दिलेल्या जागेवर कचरा नेण्यास सुरुवात केली आहे. 

घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले कसे ?  

ठाणे महापालिकेने कचराभूमीसाठी जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार, राज्य शासनाने भिवंडी येथील आतकोली भागातील जमीन ठाणे महापालिकेला कचराभूमीसाठी देऊ केली आहे. या जागेवर पालिकेने कचरा नेऊन टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु ठाणे ते आतकोली अंतर ३७ किलोमीटर इतके असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच येथील स्थानिक नागरिकांनीही तेथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे. यामुळे शहरात कचरा कोंडीची समस्या अधिक बिकट झाली असून कचरा टाकायचा कुठे असा पेच पालिकेसमोर उभा राहिला आहे.  

डायघर प्रकल्प बंदमुळेच कचरा कोंडी?

डायघर प्रकल्पात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार होती. परंतु, या प्रक्रियेस उशीर होत असल्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते. या ठिकाणी कचरा विल्हेवाटीसाठी परदेशातून यंत्रे आणण्यात आली होती. या प्रकल्प उभारणीसाठी ठेकेदाराने पैसे खर्च केले होते. त्यापैकी काही पैसे पालिकेने ठेकेदाराला दिले आहेत. परंतु उर्वरित पैसे मिळत नसल्यामुळे ठेकेदार प्रकल्प चालविण्यासाठी तयार नाही. याच कारणातून गेले अडीच महिने डायघर प्रकल्प बंद आहे. परिणामी डायघर प्रकल्पस्थळी येणारा कचरा सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावर साठला आणि यातून दुर्गंधी पसरू लागली. त्याचबरोबर आगीमुळे धूर पसरू लागल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी प्रकल्पास विरोध केला. यामुळे शहरात कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली. या प्रकल्पासाठी ठेकेदाराचे किती पैसे खर्च झाले, याचा हिशोब करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासाठी ‘मुंबई आयआयटी’चे पथक नेमले जाणार आहे. सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध झाल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून शहरात कचरा कोंडी झाल्याचे चित्र वरचेवर दिसून येत असले तरी, गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेला डायघर कचरा प्रकल्प, हेच शहरातील कचराकोंडीमागचे खरे कारण असल्याची बाब समोर येत आहे.