अन्वय सावंत
‘त्याच्या खेळात रॉजर (फेडरर), राफा (नदाल) आणि माझ्या खेळाची छटा आहे, असे लोक म्हणतात. मला ते पटले आहे. त्याने आम्हा तिघांतील सर्वोत्तम गुण घेतले आहेत. मी त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध यापूर्वी खेळलेलो नाही.’ सर्बियाच्या विक्रमी २३ ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने हे गौरवोद्गार स्पेनच्या २० वर्षीय कार्लोस अल्कराझसाठी काढले. टेनिसचे भविष्य मानल्या जाणाऱ्या अल्कराझने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेवरील जोकोव्हिचची मक्तेदारी अखेर मोडीत काढली. जोकोव्हिचला विम्बल्डनमध्ये नमवणे हे अशक्यप्राय आव्हान मानले जात होते. मात्र, आपल्यातील अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवताना अल्कराझने अशक्य ते शक्य करून दाखवले. जोकोव्हिचला पराभूत करून अल्कराझने कारकीर्दीत प्रथमच विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. त्याचे हे यश खास का ठरले आणि त्याने टेनिसचा नवा चेहरा म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे का, याचा आढावा.
अल्कराझचे यश का खास ठरले?
जोकोव्हिचने गेल्या काही काळापासून टेनिसविश्वावर वर्चस्व गाजवले आहे. फेडररची निवृत्ती आणि नदालमागे दुखापतींचा ससेमिरा यामुळे जोकोव्हिचला आव्हान देऊ शकेल असा खेळाडू समोर येत नव्हता. करोनाची लस न घेतल्याने जोकोव्हिचला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, या दोन स्पर्धांचा अपवाद वगळल्यास जोकोव्हिचने गेल्या तीन वर्षांत आठपैकी सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यातच तो विम्बल्डनमध्ये २०१७ नंतर पराभूत न झाल्याने यंदाही जेतेपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर होता. मात्र, जोकोव्हिचच्या या वर्चस्वाला अल्कराझने शह दिला. जोकोव्हिचच्या अनुपस्थितीत गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या अल्कराझने आता जोकोव्हिचला नमवून विम्बल्डनचा चषक उंचावला. त्याने तब्बल २१९४ दिवस आणि ३४ सामन्यांनंतर जोकोव्हिचला विम्बल्डनमध्ये हार पत्करायला लावली. सेंटर कोर्टवर जोकोव्हिच ४५ सामन्यांनंतर पराभूत झाला आणि त्यामुळेच अल्कराझचे हे यश खास ठरले.
अंतिम लढतीत काय घडले?
आठ विम्बल्डन जेतेपदांच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची जोकोव्हिचची संधी हुकली. अंतिम लढतीत अग्रमानांकित अल्कराझने १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा विजय साकारला. जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये अल्कराझची सर्व्हिस दोन वेळा तोडत ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याला पहिला सेट ६-१ असा मोठ्या फरकाने जिंकण्यात यश आले. आणखी एक प्रतिस्पर्धी जोकोव्हिचपुढे शरणागती पत्करणार असे वाटत असतानाच अल्कराझने दमदार पुनरागमन केले. संघर्षपूर्ण झालेल्या दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझने टायब्रेकरमध्ये बाजी मारली. हा सेट साधारण दीड तास चालला. दीर्घकाळ चाललेल्या या सेटनंतर ३६ वर्षीय जोकोव्हिच दमलेला दिसला. तसेच तो काही वेळा कोर्टवर घसरला. त्याने तिसरा सेट १-६ असा गमावला. रागात रॅकेट कोर्टवर आदळली. मात्र, तिसऱ्या सेटच्या सांगतेनंतर दोन्ही खेळाडूंना विश्रांतीची थोडी संधी मिळाली आणि याचा जोकोव्हिचला फायदा झाला. त्याने चौथ्या सेटमध्ये पुन्हा विजय मिळवत सामना बरोबरीत आणला. जोकोव्हिच पाच सेटपर्यंत जाणारे सामने जिंकण्यासाठी ओळखला जातो. मात्र, अल्कराझने सुरुवातीलाच जोकोव्हिचची सर्व्हिस तोडली. त्यानंतर आपली सर्व्हिस अखेरपर्यंत राखत हा सेट दोन गेमच्या फरकाने जिंकला आणि कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
अल्कराझ टेनिसमधील नवा तारा म्हणून उदयास आला आहे का?
‘लाल मातीच्या आणि हार्ड कोर्टवर तुझ्याविरुद्ध खेळताना मला आव्हान जाणवत होतेच. आता ग्रास कोर्टवरही तू चांगला खेळ करत आहेस. तुझे अभिनंदन,’ अशा शब्दांत अंतिम लढतीनंतर जोकोव्हिचने अल्कराझची स्तुती केली. ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच खुली स्पर्धा लाल मातीच्या कोर्टवर, तर विम्बल्डन स्पर्धा ग्रास (गवताच्या) कोर्टवर खेळवली जाते. या तीनही कोर्टवर खेळण्याची आव्हाने वेगळी असतात. त्यामुळेच ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये टेनिसपटूंची खरी कसोटी लागते. यशस्वी टेनिसपटू म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी खेळाडूने कोर्टनुसार खेळात बदल करणे आवश्यक असते. यात अल्कराझ सक्षम असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याने गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धा जिंकल्यानंतर यंदा फ्रेंच स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आता त्याने विम्बल्डन जिंकत तिन्ही कोर्टवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याने गेल्या वर्षी माद्रिद खुल्या स्पर्धेत राफेल नदालवर विजय मिळवला होता. त्यामुळे लाल मातीच्या कोर्टवर नदालला नमवणारा तो सर्वांत युवा खेळाडू ठरला होता. यंदा त्याने जोकोव्हिचला पराभूत करत विम्बल्डनचे जेतेपद मिळवले. तसेच सर्वांत कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवण्याचा विक्रमही अल्कराझच्याच नावे आहे. त्यामुळे तो निश्चितच टेनिसमधील नवा तारा म्हणून उदयास आला आहे.
अल्कराझच्या खेळाची वैशिष्ट्ये काय?
अल्कराझ एक परिपूर्ण खेळाडू असून कोर्टच्या सर्व कोपऱ्यांत तितक्याच ताकदीने फटके मारण्याची त्याच्यात क्षमता आहे. विशेषत: ‘फोरहँड’ने (उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूची उजवी बाजू) ‘बेसलाइन’वरून (मागील रेषा) वेगवान फटके मारण्यात त्याचा हातखंडा आहे. तसेच वेगवान फटक्यांदरम्यान एखादा कमी वेगाचा (ड्रॉप शॉट) फटका मारून प्रतिस्पर्ध्याला अडचणीत टाकण्याची कलाही त्याला अवगत आहे. वेगवान सर्व्हिस ही त्याची आणखी एक ताकद आहे. मात्र, त्याला सर्व्हिसमध्ये अधिक सातत्य आणता येऊ शकते. त्याचप्रमाणे नेटच्या जवळील फटके मारताना त्याला अडचणी येतात आणि हे जोकोव्हिचविरुद्धच्या अंतिम लढतीतही पाहायला मिळाले. मात्र, याव्यतिरिक्त त्याच्या खेळात फारशा उणिवा नाहीत. शिवाय दडपणाखाली मानसिक कणखरता राखून अचूक खेळ करण्याची आपल्यात क्षमता असल्याचे अल्कराझने दाखवून दिले आहे.
अन्य कोणते खेळाडू भविष्यात चमकू शकतील?
जोकोव्हिच, फेडरर आणि नदाल या त्रिकुटाने गेली जवळपास दोन दशके टेनिसविश्वावर वर्चस्व गाजवले. यापैकी केवळ जोकोव्हिच अजूनही आपला सर्वोत्तम खेळ करत आहे. मात्र, आता टेनिसला नव्या चेहऱ्यांची गरज भासू लागली आहे. युवा खेळाडूंपैकी अल्कराझने आपला वेगळा दर्जा सिद्ध केला आहे. गेल्या काही काळापासून स्टेफानोस त्सित्सिपास, डॅनिल मेदवेदेव आणि ॲलेक्झांडर झ्वेरेव यांसारखे खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, त्यांना अद्याप सर्वोच्च दर्जा गाठणे जमलेले नाही. नॉर्वेच्या २४ वर्षीय कॅस्पर रूडने सलग दोन वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेची, तर गतवर्षी अमेरिकन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे भविष्यात ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याची त्याच्यात नक्कीच क्षमता आहे. तसेच डेन्मार्कचा २० वर्षीय होल्गर रून, इटलीचा २१ वर्षीय यानिक सिन्नेर यांसारख्या खेळाडूंकडूनही भविष्यात चमकदार कामगिरीची आशा बाळगता येऊ शकते.