Colorectal cancer rising जगभरात मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त आहे. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. पूर्वी आतड्यांचा कर्करोग हा केवळ ५० वर्षांवरील लोकांचा आजार मानला जात होता, मात्र आता हे चित्र बदलले असून तरुण पिढीमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. ज्या ज्या देशांमध्ये पाश्चिमात्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे, त्या देशांमध्ये मोठया आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.

गेली १० वर्षे, आतड्याच्या कर्करोगाचे तज्ज्ञ डॉ. अमनजित सिंग त्यांच्या रुग्णांच्या प्रोफाईलमध्ये बदल पाहत आहेत. “३० ते ४० वयोगटातील तरुण रुग्णांना आतड्याच्या कर्करोगाचे निदान पश्चिमेकडील देशांतील तरुणांपेक्षा वेगाने होत आहे.” त्यामागील कारणे काय? मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कसा टाळता येणार? त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? सविस्तर जाणून घेऊयात…

तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात?

गुरुग्राम येथील मेदांता येथे गॅस्ट्रोसायन्सेसचे जीआय सर्जरी आणि जीआय ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ संचालक डॉ. सिंग यांनी व्यक्त केले, “फास्ट आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ, रेडी टू इट पदार्थ, गरम करून खाण्याचे पदार्थ, डेस्कवर जास्त वेळ बसणे, अजिबात व्यायाम न करणे आणि झोपेचा अभाव; ही कर्करोगाचा धोका वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. खरं तर, मला खाण्याच्या पद्धतींमध्ये समानता दिसली. त्यापैकी जवळपास सर्व जण बाहेर जेवण करायचे किंवा त्यांचे जेवण ऑनलाईन ऑर्डर करायचे, म्हणूनच मी आतड्याच्या कर्करोगाला जीवनशैलीमुळे होणारा कर्करोग म्हणतो,” असे ते म्हणाले. त्यांचे हे निरीक्षण आता ‘जामा ऑन्कोलॉजी’ (JAMA Oncology) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

हा अभ्यास अमेरिकेतील बोस्टन येथील मॅस जनरल ब्रिघम येथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अँड्र्यू टी. चॅन यांच्या निष्कर्षांवर आधारित आहे, जो दर्शवतो की अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांच्या वाढत्या सेवनासोबत आतड्याचा कर्करोग कसा वाढला आहे. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, चुकीचा आहार ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो. डॉ. चॅन आणि त्यांच्या टीमने २०, ३० आणि ४० वयोगटातील महिला परिचारिकांचा अभ्यास केला. ज्या महिलांनी जास्त प्रमाणात अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाल्ले, जसे की साखरयुक्त पेये, तळलेले स्नॅक्स, प्रोसेस्ड मांस, चिप्स, कँडीज आणि सोडा, त्यांना कोलोन किंवा गुदाशयात कर्करोगपूर्व पॉलिप्स विकसित होण्याचा धोका अधिक होता.

अभ्यासात काय आढळले?

संशोधकांनी अभ्यासाच्या सुरुवातीला २० ते ४० च्या दशकातील २९,००० हून अधिक महिला परिचारिकांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी १९९१ ते २०१५ या काळात त्यांच्यावर नजर ठेवली, या दरम्यान त्यांनी दर चार वर्षांनी आहाराबद्दल सविस्तर प्रश्नावली भरली. या सर्वांनी वयाच्या ५० वर्षांपूर्वी किमान एकदा कोलोनोस्कोपी केली होती. ज्या परिचारिकांनी सर्वाधिक अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाल्ले, त्यांना सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोगपूर्व पॉलिप होण्याची शक्यता अधिक होती. त्यांनी खाल्लेल्या अल्ट्रा-प्रोसेस्ड उत्पादनांमध्ये स्लाईस ब्रेड, ब्रेकफास्ट सीरियल, सॉस, स्प्रेड्स आणि कृत्रिमरित्या गोड केलेली पेये यांचा समावेश होता.

अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ कर्करोगाला कसे ट्रिगर करतात?

“अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ आतड्यांमधील चांगले आणि वाईट सूक्ष्म जंतूंचे संतुलन बिघडवतात. आतड्यांच्या संरक्षक आवरणाला टिकवून ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. या आवरणाला कोणताही धोका पोहोचल्यास, विषारी घटक आतड्यांवर सूज (Inflammation) निर्माण करतात. यामुळे पेशींचे वर्तन असामान्य होते आणि अॅडेनोमास नावाच्या सौम्य गाठींची वाढ होते. यापैकी काही गाठी कर्करोगाच्या गाठीत रूपांतरित होतात,” असे डॉ. सिंग म्हणतात.

अल्ट्रा-प्रोसेस्ड आणि लवकर गरम होणाऱ्या पदार्थांवर जास्त अवलंबून राहिल्याने फायबरचा (तंतुमय पदार्थ) वापर कमी होतो. “जेव्हा तुम्ही जास्त फळे, भाज्या आणि घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करतात, तेव्हा तुम्हाला जास्त फायबर मिळते. हे फायबर तुमच्या आतड्यात स्क्रब ब्रशसारखे काम करून स्वच्छ करते. हे तुमच्या आतड्यांमधील बॅक्टेरिया आणि इतर साचलेले पदार्थ स्वच्छ करते आणि आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी करते,” असेही डॉ. सिंग सांगतात.

कोणते अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ सर्वात जास्त नुकसानकारक?

डॉ. सिंग यांच्या मते, प्रोसेस्ड केलेले मांस आणि मासे हे सर्वात जास्त नुकसान करतात. बारीक केलेल्या मांसामध्ये ‘थॅलेट्स’चे प्रमाण असू शकते, जी औद्योगिक रसायने आहेत. ही रसायने प्रक्रियेदरम्यान आणि पॅकेजिंगदरम्यान अन्नात मिसळतात. “तुम्ही ताजे मांस विकत घेत नसाल, तर पॅकेटमधील मांसाचे सेवन टाळले पाहिजे.” डॉ. सिंग सांगतात, “प्रोसेस्ड मांस आतड्याचा आणि पोटाच्या कर्करोगाचा वाढलेला धोका यांच्याशी सातत्याने जोडलेले आहे. जागतिक आरोग्य संघटना प्रोसेस्ड मांसाला ‘ग्रुप १ कार्सिनोजेन’म्हणून वर्गीकृत करते. याचा अर्थ त्याचे सेवन आणि कर्करोगाचा धोका यांच्यात संबंध आहे.” या पॅकेजिंगमध्ये संरक्षक म्हणून वापरले जाणारे नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मांस शिजवल्यावर कर्करोगजन्य संयुगे तयार करू शकतात.

आतड्यातील सर्व पॉलिप्स कर्करोगात बदलू शकतात का?

डॉ. सिंग सांगतात “आम्ही आतड्यातील प्रत्येक पॉलिप काढून टाकतो. परंतु तरुण वयात, बहुतेक पॉलिप्सचे निदान मूळव्याध किंवा पाईल्स म्हणून चुकीच्या पद्धतीने केले जाते. तो कर्करोगजन्य पॉलिप असला तरी तपासणीअभावी त्याचे निदान वेळेत होत नाही,” असे ते म्हणतात. आतड्याचा कर्करोग हळूहळू वाढतो आणि त्याची लक्षणे पोटाच्या इतर अनेक विकारांसारखीच असतात, ज्यामुळे अनेक लोकांचे त्याकडे दुर्लक्ष होते.

भारतात तपासणीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे?

भारतात तपासणीबाबतची विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. “परंतु, जर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशर असेल, तर कोलोनोस्कोपीमुळे कर्करोगाच्या पेशी आहेत की नाही हे दिसून येते. अमेरिकेत तरुणांमध्ये या रोगाचे प्रमाण वाढल्यानंतर आतड्याच्या कर्करोगाची नियमित तपासणी करण्याचे वय पाच वर्षांनी कमी करून ४५ करण्यात आले आहे. “परंतु, जर तुमच्या नात्यातील कोणाला आतड्याचा कर्करोग झाला असेल, तर सध्याच्या पिढीतील तरुणांनी पाच वर्षांपूर्वी, म्हणजे वयाच्या ४० व्या वर्षीच स्वतःची तपासणी करून घ्यावी,” असे डॉ. सिंग सांगतात.