इंद्रायणी नार्वेकर 

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असून त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिराचे सुशोभीकरण २८० कोटी रुपये खर्चून केले जाणार आहे. पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे महापालिकेचे काम नाही, अशी टीकाही होत आहे.

कोणकोणत्या मंदिरांच्या परिसराचा विकास होणार? 

मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी आणि प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर या मंदिरांच्या परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करण्याचे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यात मुंबादेवी मंदिरासाठी २२० कोटी, महालक्ष्मी मंदिरासाठी ६० कोटी आणि सिद्धिविनायक मंदिरासाठी तब्बल ५०० कोटींचा निधी पालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्याचे आदेश आहेत. 

हेही वाचा >>>विश्लेषण : टेस्ला पाण्यात, कोट्यधीश उद्योगपतीचा मृत्यू; गाडी खरंच सुरक्षित ठेवते?

या तीन मंदिराना  इतके महत्त्व का आहे?

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. तर मुंबादेवी आणि महालक्ष्मी ही मंदिरे मुंबईतील प्राचीन मंदिरे आहेत. दक्षिण मुंबईत गिरगावला लागूनच असलेल्या मुंबादेवीच्या नावावरूनच या शहराला मुंबई हे नाव पडले आहे. 

या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात येतात.  नवीन चित्रपट येणार असला तरी अभिनेते, अभिनेत्री दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात येत असतात. दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीलाही भाविकांची मोठी गर्दी तेथे असते. पायी चालत मंदिरापर्यंत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिराचीही अशीच ख्याती आहे. 

उज्जैनच्या धर्तीवर कसा विकास करणार?

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे असलेल्या पुरातन महाकालेश्वर मंदिराचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील कामात कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. तसा मार्ग तयार करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.  प्रभादेवी परिसरात जागा कमी आहे.  प्रकल्पाचा विस्तृत अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

हेही वाचा >>>मालदीवमधल्या निवडणुकीसाठी भारताच्या ‘या’ राज्यात होणार मतदान, पण का? जाणून घ्या

अन्य सुविधा कोणत्या?

दादरसारख्या गजबजलेल्या स्थानकाकडून प्रभादेवीकडे येण्यासाठी मिनी बसगाड्यांची सुविधा वाढवण्यात येणार आहे. तसेच स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या भाविकांना वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे त्रास होतो. त्यामुळे वाहनतळाचीही सुविधा देण्यात येणार आहे. तसेच तिन्ही मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करणे, भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह बनवणे, दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना तात्पुरती बसण्याची व्यवस्था करणे, छत बांधणे , मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करणे, भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करणे या कामांचा समावेश आहे.

महालक्ष्मी आणि मुंबादेवी परिसरात कोणत्या सुविधा देणार?

महालक्ष्मी, मुंबादेवी परिसराचा विकास करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी शहर भागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला होती. त्यात मुंबादेवी मंदिराचा परिसर अतिशय गजबजलेला असून या मंदिर परिसराच्या विकासासाठी  २२० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. महालक्ष्मी मंदिर परिसरात सोयीसुविधा देण्याचे ठरवले होते. त्यात मुंबादेवी परिसरात आधीच बहुमजली यांत्रिकी वाहनतळाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालिकेने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या आदेशानुसार वाळकेश्वर येथील बाणगंगा या ऐतिहासिक व धार्मिक तलावाच्या सुशोभीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. 

हेही वाचा… विश्लेषण : केळी नामशेष होण्याची भीती संपली? ऑस्ट्रेलियात विकसित जनुकीय वाण ठरणार निर्णायक?

मंदिरांच्या सुशोभीकरणावरील खर्च चर्चेत का?

मंदिरांच्या सुशोभीकरणावर केला जाणारा कोट्यवधीचा खर्च हा आता चर्चेचा विषय झाला आहे. मात्र त्याबद्दल केवळ दबक्या सुरात चर्चा सुरू आहे. एकूणच देशात सध्या मंदिरे उभारण्याचे वातावरण असताना मुंबईतही त्याचे अनुकरण होणारच. नागरी सुविधा देण्यास बांधील असलेल्या पालिका प्रशासनाने हा खर्च करावा का असा मुख्य प्रश्न आहे. मात्र विरोधी पक्षदेखील याबाबत आवाज उठवत नाही कारण कोणत्याही समाजाला दुखवणे हे राजकीय पक्षाना परवडणारे नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळांनाही आर्थिक मदत?

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काही महिन्यांपूर्वी हाजीअली येथील प्रसिद्ध दर्ग्याच्या सुशोभीकरणाचीही घोषणा केली होती. मात्र त्यात अजून पुढे काहीही झालेले नाही.