scorecardresearch

Premium

विश्लेषण : कॅनडामध्ये ‘खलिस्तान’ चळवळ अजूनही का जिवंत?

कॅनडामधील शीख समुदयाने ‘ऑपरेशन ब्लूस्टार’च्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रॅम्प्टन शहरात रॅली काढली.

Khalistan movement still alive in Canada
वाचा सविस्तर विश्लेषण

संदीप नलावडे

कॅनडामधील शीख समुदयाने ‘ऑपरेशन ब्लूस्टार’च्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रॅम्प्टन शहरात रॅली काढली. या रॅलीत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करण्यात आला. त्याबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त करून कॅनडाकडे निषेध नोंदवला. गेल्या काही दिवसांपासून कॅनडामध्ये खलिस्तान चळवळीने पुन्हा डोके वर काढले असून त्याची झलक या रॅलीमध्ये दिसली. भारतातून ही चळवळ मुळासकट उखडलेली असली, तरी जगात इतर काही भागांमध्ये तिचे अस्तित्व आजही दिसून येते. कॅनडामधील खलिस्तान चळवळीविषयी…

Sensex bids farewell to the week
त्रिशतकी झेप घेत ‘सेन्सेक्स’चा सप्ताहाला निरोप
india wins gold in horse riding
विश्लेषण: एशियाडमध्ये अश्वारोहणात ४१ वर्षांनी सोनेरी यश… ड्रेसाज हा स्पर्धा प्रकार नेमका काय आहे?
significance of the asteroid samples
विश्लेषण: ‘नासा’ने आणलेल्या लघुग्रह नमुन्यांचे महत्त्व काय?
ukrain attack
अन्वयार्थ : युक्रेनची नवी ‘आघाडी’..

कॅनडामधील खलिस्तान चळवळ काय आहे?

पंजाब परिसरात खलिस्तान नावाचे कथित वांशिक-धार्मिक सार्वभौम राज्य स्थापन करून शिखांसाठी कथित मातृभूमी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी एक फुटीरतावादी चळवळ म्हणजे खलिस्तान चळवळ. ब्रिटिश साम्राज्याच्या पतनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या शीख राज्याची मागणी सुरू झाली. १९८४ मध्ये घडलेल्या ‘ऑपरेशन ब्लूस्टार’नंतर खलिस्तान चळवळीने उग्र स्वरूप धारण केले. ऑपरेशन ब्लूस्टार आणि त्याच्या हिंसक परिणामांमुळे जागतिक स्तरावर विखुरलेल्या अनेक शिखांमध्य खलिस्तानची मागणी लोकप्रिय झाली. शीख ज्या भागांमध्ये प्राधान्याने वसले, त्यांतील काही भागांमध्ये खलिस्तान चळवळीचे अस्तित्व अधूनमधून दिसून येते. ब्रिटन, कॅनडा, अमेरिकेतील काही शीख संस्थांनी या चळवळीला आर्थिक व लष्करी मदत करून खतपाणी घातले. कॅनडामध्ये शीख समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे शीख चळवळ वेगाने पसरली. १९९८ मध्ये कॅनडास्थित शीख पत्रकार तारासिंग हैर यांची हत्या संशियत खलिस्तानी अतिरेक्यांनी केली. या पत्रकाराने खलिस्तान चळवळीवर टीका केली होती. २००२ मध्ये टोरंटोमधील पंजाबी भाषेतील साप्ताहिक सांझ सवेराने इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीला त्यांच्या हत्येचे चित्र असलेले मुखपृष्ठ प्रसिद्ध करून ‘पाप्याला मारणाऱ्या शहिदांचा सन्मान’ असा मथळा छापला होता. या मासिकाला सरकारी जाहिराती मिळाल्या आणि ते कॅनडामधील प्रमुख वृत्तपत्र बनले. कॅनडामधील सर्वाधिक शीख धर्मीय राहत असलेल्या ब्रॅम्प्टनमध्ये ‘शीख फॉर जस्टिस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खलिस्तान समर्थक संघटनेने सार्वमत आयोजित केले असून एक लाखांहून अधिक शिखांचा त्याला पाठिंबा आहे.

खलिस्तान चळवळीला कॅनडाचे समर्थन?

कॅनडा या देशाचे खलिस्तान चळवळीला थेट समर्थन नसले तरी कॅनडा हे खलिस्तान समर्थकांसाठी आणि भारतात दहशतवादाचा आरोप असलेल्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानले जात आहे. खलिस्तान चळवळीला उग्र रूप देणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना कॅनडामध्ये आश्रय देण्यात आला असून याबाबत कॅनडाने कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही. ‘खलिस्तानी आव्हानाला कॅनडात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच्या आणि आताच्या भारत सरकारांनी कॅनडाकडे खलिस्तानी अतिरेक्यांना आश्रय दिल्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कॅनडामध्ये शीख समुदायांची लोकसंख्या आठ लाखांच्या वर आहे. मतपेढीच्या राजकारणामुळे कॅनडातील प्रमुख राजकीय पक्ष खलिस्तान चळवळीकडे दुर्लक्ष करतात. खलिस्तान चळवळीविषयी मतप्रदर्शन करणे म्हणजे मते गमावण्याचा धोका आहे, हे जाणून कॅनडातील राजकीय पक्ष या चळवळीला एकप्रकारे खतपाणीच घालत आहेत.

शीख समुदाय कॅनडासाठी महत्त्वाचा का?

२०२१च्या कॅनडातील जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येत शिखांचे प्रमाण २.१ टक्के असून हा या देशातील सर्वात वेगाने वाढणारा धार्मिक गट आहे. भारतानंतर कॅनडात जगातील सर्वात जास्त शिखांची लोकसंख्या आहे. कॅनडाच्या विकासात शीख समुदायाचाही मोठा वाटा आहे. विकासाच्या बहुतेक सर्वच क्षेत्रात शीख आढळतात. शीख कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी कॅनडाच्या प्रशासनात सर्व स्तरांवर सेवा देतात. शिखांची वाढती लोकसंख्या हा देशातील सर्वात मोठी राजकीय मतपेढी आहे. २०१७ मध्ये वयाच्या ३९ व्या वर्षी जगमीत सिंग यांनी डावीकडे झुकलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचा ताबा घेतला, तेव्हा ते कॅनडाच्या एका प्रमुख राजकीय पक्षाचे पहिले शीख नेते बनले. इतरही अनेक पक्षांचे शीख नेते आहेत. सर्व कॅनेडियन शीख हे खलिस्तान समर्थक नाहीत. मात्र कॅनडातील नेत्यांना शीख मते गमवायची नाहीत. त्यामुळे खलिस्तान चळवळीला प्रत्यक्ष पाठिंबा नसला तरी शीख समुदायाला दुखावण्याचा कोणताही हेतू कॅनडातील राजकीय पक्षांचा नाही.

कॅनडातील खलिस्तान चळवळीबद्दल भारताची प्रतिक्रिया काय?

परदेशातील खलिस्तान चळवळीबाबत भारत सरकारचे संमिश्र धोरण आहे. भारत सरकारने हिंसेला खतपाणी घालणाऱ्या फुटीरतावादी गटांच्या विरोधात वारंवार कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेमधील ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय बब्बर खालसा, इंटरनॅशनला शीख यूथ फेडरेशन, खलिस्तान लिबरेशन फोर्स यांसारख्या बऱ्याच खलिस्तानी संघटनांवर भारत सरकारने बंदीचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे यापैकी बऱ्याच संघटनांवर जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपीय संघटना, अमेरिका व कॅनडानेही बंदी घातली आहे, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश मानले जाते. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा केल्याबाबत भारत सरकारने कॅनडाकडे नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत नापसंती नोंदवून भारत-कॅनडा संबंधांसाठी हे चांगले नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

खलिस्तान चळवळीला बाह्य शक्तींचे समर्थन?

भारत व कॅनडातील खलिस्तान चळवळीला भारताचे शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तान व चीन या राष्ट्रांचे अप्रत्यक्ष समर्थन आहे. पाकिस्तानकडून फुटीरतावादी खलितस्तानच्या चळवळीला पाठबळ देण्याचे काम सुरू असल्याचा दावा कॅनडातील शीख चळवळ अभ्यासकांनी केला आहे. खलिस्तान ही पाकिस्तानची महत्त्वाकांक्षा असून कॅनडामधील काही राजकीय गटांनी याला जिवंत ठेवले आहे, असे मत कॅनडातील प्रमुख थिंक टँक असलेल्या ‘एमएल इन्स्टट्यूट’ने म्हटले आहे. भारतातील पंजाबमध्ये खलिस्तानचे समर्थक अगदी मोजकेच असल्याने खलिस्तानी चळवळीला पाठबळ देण्यासाठी आणि ही चळवळ वाढविण्यासाठी पाकिस्तानने आता कॅनडावर लक्ष केंद्रित केले असून मदतही वाढविली आहे. भारतातील फुटीरतावादी चळवळीला नेहमीच चीनची अप्रत्यक्ष मदत असते. कॅनडातील खलिस्तानी चळवळीला चीनचेही पाठबळ असल्याचे काही संस्थांचे म्हणणे आहे.

कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येची कारणे…

कॅनडामधील खलिस्तानी चळवळ थोपविण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले आहेत. खलिस्तानी चळवळ उग्र बनविणाऱ्या अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. भारताला हवा असलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील एका गुरुद्वाराबाहेर एका वाहनात निज्जरचा मृतदेह आढळला. निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स या बंदी घातलेल्या संस्थेचा म्होरक्या होता. सरे शहरातील गुरू नानक शीख गुरुद्वाराचा तो प्रमुख होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why is the khalistan movement still alive in canada print exp scj

First published on: 21-06-2023 at 10:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×