Modi bunkers दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतात सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेदेखील भारताविरोधात काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. २४ एप्रिल रोजी भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) विनाकारण गोळीबार सुरू केला आहे. परिणामी, जम्मू-काश्मीरमधील नागरिक संकटकाळासाठी ‘मोदी बंकर’ म्हणजेच खंदक तयार करत आहेत. काय आहेत हे बंकर्स? त्यांना मोदी बंकर का म्हटले जाते? बंकर बांधण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ…
पाकिस्तान-भारत यांच्यातील तणावाचा परिणाम
भारत-पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या भीतीने नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या जम्मूमधील काही नागरिकांनी भूमिगत बंकर तयार करण्यास सुरुवात केली आहे. ते या बंकरमध्ये साफसफाई आणि आवश्यक वस्तूंची साठवणूक करीत आहेत. या बंकरचा उल्लेख ते मोदी बंकर म्हणून करीत आहेत. भारताने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने कुरापती काढल्या जात आहेत. पाकिस्तानकडून सीमारेषेवरील अनेक भागांत गोळीबार करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी म्हणून स्थानिक नागरिकांकडून हे बंकर तयार केले जात असल्याची माहिती आहे.

‘मोदी बंकर’ म्हणजे काय?
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने नियंत्रण रेषेजवळ असणाऱ्या गावातील रहिवासी बंकर तयार करीत आहेत. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सालोत्री व करमारा येथील ग्रामस्थ खबरदारी म्हणून त्यांनी तयार केलेले जुने बंकर साफ करीत आहेत आणि आवश्यक वस्तूंची साठवणूक करीत आहेत. ही गावे पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांपासून जवळ आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
या गावांचे स्थान पाकिस्तानी लष्करी चौक्यांपासून जवळ असल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये गावकरी बंकरमध्ये गादी आणि ब्लँकेट ठेवताना दिसत आहेत. ” लोकांनी आतापर्यंत या बंकरकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आता पुन्हा त्या बंकरची स्वच्छता केली जात आहे. लोकांमध्ये भीतीचे आहे. परंतु आम्हाला आशा आहे की, खोऱ्यात शांतता कायम राहील,” असे करमारा गावातील एका रहिवाशाने ‘एएनआय’ला सांगितले.
आणखी एका ग्रामस्थाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि सरकारला पाठिंबा दिला. “पूर्वी या भागात गोळीबाराच्या घटना घडायच्या. आमचे गाव नियंत्रण रेषेजवळ आहे. गोळीबारासारख्या घटनांदरम्यान आम्हाला व आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवता यावे म्हणून आम्ही बंकर साफ करीत आहोत. आम्हाला असे बंकर पुरवल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभारी आहोत,” असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक ठिकाणी गोळीबार सुरू केल्याने तणाव वाढला आहे. दोन्ही देशांतील संबंध बिघडत आहे आणि सुरक्षा दलांनी या प्रदेशातील कुमक वाढवली आहे. प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या बंकरला ‘मोदी बंकर’ का म्हणतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरून या भूमिगत बंकरांना ‘मोदी बंकर’ असे नाव देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानशी वाढत्या तणावादरम्यान सीमेजवळ राहणाऱ्या रहिवाशांना गोळीबारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे बंकर तयार करण्यात आले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, यापैकी बरेच बंकर पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात बांधले गेले होते. केंद्र सरकारने संघर्षप्रवण सीमाभागांजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितठेवण्याची हमी म्हणून हे बंकर तयार केले होते. जम्मूमधील पूंछ आणि राजौरी यांसारख्या सीमारेषेजवळील संवेदनशील भागात बंकर बांधण्यासाठी सरकारने यापूर्वी निधी आणि तांत्रिक साह्य प्रदान केले होते. २०२१ मध्ये जम्मूमधील नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात सुमारे ८,००० भूमिगत बंकर बांधण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नियंत्रण रेषेवर गोळीबार
पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर सतत गोळीबार सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी त्यांनी विनाकारण गोळीबार सुरू ठेवला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी (२९ एप्रिल) दिली. २८ ते २९ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा व बारामुल्ला जिल्ह्यांसमोरील भागात, तसेच अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान गोळीबार केला, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे.
गेल्या गुरुवारी भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार स्थगित केल्यापासून, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील विविध ठिकाणी विनाकारण गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानी सैन्याने उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवर गोळीबार केला आहे. तसेच त्यांनी जम्मूमधील पूंछ सेक्टर आणि अखनूरपर्यंत युद्धबंदीचे उल्लंघन केले. आतापर्यंत या चकमकीत भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.