पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत भारताने असे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे पाकिस्तानची गळचेपी झाली आहे. त्यातच आता पाकिस्तानने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवल्याची माहिती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला लक्ष्य केले जाऊ शकते, या भीतीने हाफिज सईदवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हा सईद असल्याचे मानले जात आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक जण पर्यटक होते. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही हाफिज सईद लष्कर-ए-तैयबाची एक शाखा आहे. पाकिस्तानने हाफिज सईदच्या सुरक्षेत कशी वाढ केली आहे? पाकिस्तानला भीती कशाची? जाणून घेऊयात.
हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ
पाकिस्तानने हाफिज सईदच्या लाहोरमध्ये असणाऱ्या त्याच्या घराजवळील सुरक्षा वाढवली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय)’ने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरमधील मोहल्ला जोहर येथील घरासह इतर ठिकाणांवर स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे माजी कमांडो आणि अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हाफिज सईदचा सहभाग होता, तेव्हापासून हाफिज सईद भारताला हवा आहे. हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्तीच्या परिसरात ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या आजूबाजूला नागरिकांची वस्ती आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार पाकिस्तानमध्ये कारागृहात असलेल्या सईदच्या घराचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्यात आले आहे.

सूत्रांनी ‘इंडिया टुडे टीव्ही’ला माहिती दिली आहे की, जमात-उद-दावा प्रमुखाची सुरक्षा चौपट करण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षा दलात पाकिस्तान सशस्त्र दलाचे कर्मचारीदेखील तैनात आहेत, जे त्याला चोवीस तास संरक्षण प्रदान करत आहेत. त्याच्या निवासस्थानातील परिसरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे आणि घरापासून चार किलोमीटर अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर उच्च-रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
‘इंडिया टुडे’ने सॅटेलाइट इमेजेस आणि व्हिडीओंवरून पूर्वी सांगितले होते की, हाफिज सईदच्या कंपाऊंडमध्ये तीन मुख्य इमारती आहेत. त्यात त्याचे निवासस्थान, एक मोठी मशीद आणि एक मदरसा आहे, जिथे त्याचे काम चालते. या परिसरात त्याची खासगी बागदेखील आहे. पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे आणि लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सईदला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी हाफिज सईद भारत आणि अमेरिकेला हवा आहे. २०२२ मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संस्थापकाला पाकिस्तानमध्ये दहशतवादाला आर्थिक मदत करण्याच्या दोन प्रकरणांमध्ये ३३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जुलै २०१९ मध्ये त्याला अटक करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते.
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्या
२०२३ पासून पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कताल याची पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात काही हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर असणारा अबू कताल सईदचा पुतण्या असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या हत्येनंतर २६/११ चा कट रचणाऱ्या शेख जमील-उर-रहमान याची सुरक्षा वाढवण्यात आली.
मार्च २०२४ मध्ये युनायटेड जिहाद कौन्सिलचा स्वयंघोषित सरचिटणीस शेख जमील-उर-रहमान हा खैबर पख्तुनख्वाच्या अबोटाबादमध्ये मृतावस्थेत आढळला होता. २०१६ च्या पठाणकोट हल्ल्यामागील सूत्रधार मानला जाणारा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) दहशतवादी शाहिद लतीफ याला ऑक्टोबर २०२३ मध्ये सियालकोटमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. अनेक अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची हत्या केली आहे.
शाहिद लतीफ याच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी भारताचा वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा सहकारी दाऊद मलिक याला उत्तर वझिरिस्तानमध्ये काही बंदूकधार्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानच्या कराचीमध्ये दोन मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी मौलाना झियाउर रहमानची गोळ्या घालून हत्या केली होते. मौलाना झियाउर रहमानने तरुणांना शस्त्रे उचलण्यासाठी आणि भारताविरुद्ध जिहाद करण्यासाठी प्रवृत्त केले होते.
सप्टेंबर २०२३ मध्ये रावलकोटमधील अल-कुदुस मशिदीत नमाज पढत असताना अबू कासिम काश्मिरीची काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. अल-कुदुस हा राजौरी जिल्ह्यातील धांगरी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात होते. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता आणि १३ जण जखमी झाले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये हाफिज सईदचा सहकारी सरदार हुसेन अरैन याची सिंधच्या शहीद बेनझीराबाद जिल्ह्यातील काझी अहमद शहरात हत्या करण्यात आली होती.
मे २०२३ मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानमधील खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवार याची दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा सहकारी बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम याची रावळपिंडीतील एका दुकानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
याच्या आठवड्याभरानंतर, अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची कराचीमध्ये दुचाकीवरून आलेल्या बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. मार्च २०२२ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट आयसी ८१४ च्या अपहरणकर्त्यांपैकी एक असलेल्या झहूर मिस्त्रीची कराचीच्या अख्तर कॉलनीत दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केली होती.