Why RBI is flying more of Indias Gold Back Home : गेल्या वर्षभरात भारतात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. सणसुदीच्या काळात पिवळ्या धातूच्या दराने सव्वा लाखांचा टप्पा ओलांडला. यादरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशात ठेवलेले सोने मायदेशात आणण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या सात महिन्यांत आरबीआयने विविध देशांमधून तब्बल ६४००० किलो मौल्यवान धातू (सोने) भारतात परत आणले. १९९० च्या दशकानंतरचे हे सोन्याचे सर्वात मोठे स्थलांतर असल्याचे मानले जाते. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांच्याकडून १०२ टन सोने मायदेशात आणले गेले होते. त्यानंतर मे महिन्यातही आणखी १०० टन सोन्याची भारतात आयात करण्यात आली होती, त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा वाढला आहे, पण हा निर्णय का याविषयी…
आरबीआयकडे सोन्याचा किती साठा?
भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगजाहीर आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सोन्याला वेगवेगळे स्थान आहे, त्यामुळे भारतीयांची सोन्यामध्ये नुसती आर्थिकच नव्हे तर भावनिक गुंतवणूकही असते. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत बँकेकडील सोन्याचा एकूण साठा ८८० मेट्रिक टन एवढा झाला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा साठा ८५४.७३ मेट्रिक टन होता. याचाच अर्थ, मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षभरात आपल्या साठ्यात २५.४५ मेट्रिक टनांनी वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या एकूण साठ्यातील ५७५.८ मेट्रिक टन सोने भारतातच आहे, तर २९०.३७ मेट्रिक टन सोने इंग्लंडच्या बँकेत आणि स्वित्झर्लंडमधील बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स येथे ठेवण्यात आले आहे.
सोन्याची तेजी संपली आहे का?
- मार्च २०२३ पासून आरबीआयने तब्बल २७४ टन सोने परदेशातून मायदेशी परत आणले आहे.
- त्याशिवाय आरबीआयकडे आणखी १३.९९ मेट्रिक टन सोने ‘गोल्ड डिपॉझिट्स’ स्वरूपात आहे.
- देशातल्या एकूण परकीय चलन साठ्यातील सोन्याचा हिस्सा मार्च २०२५ मधील ११.७० टक्क्यांवरून वाढून सप्टेंबर २०२५ मध्ये १३.९२ टक्क्यांपर्यंत गेला आहे.
- या वाढलेल्या मूल्यामागे सोन्याच्या दरात झालेली विक्रमी वाढ हेदेखील एक कारण आहे.
- १७ ऑक्टोबर रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याचा दराने प्रतितोळा एक लाख ३२ हजार २९४ रुपये आणि चांदीने प्रतिकिलो एक लाख ७० हजार ४१५ रुपये इतका सर्वोच्च उच्चांक गाठला होता.
- मात्र, दिवाळीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या धातूच्या किमतीत १० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे.
- या घसरणीमुळे सोन्याची तेजी संपली आहे का, अशी शंका येऊ लागली आहे.
आरबीआय सोने मायदेशी कसे आणते?
रिझर्व्ह बँकने परदेशात ठेवलेले सोने भारतात परत आणण्याची प्रक्रिया अत्यंत गुप्त आणि सुरक्षित असते. सोने भारतात परत आणण्याचा निर्णय आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाकडून किंवा अर्थ मंत्रालयाच्या सहकार्याने घेतला जातो. हे मौल्यवान धातू बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्समधून आणले जाते. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मुंबईसह भारतातील आपल्या सुरक्षित सुविधांचा आणि नागपूर येथील मध्यवर्ती तिजोरीचा वापर केला जातो. सोन्याच्या वाहतुकीचे हे काम ‘टॉप सिक्रेट’ ठेवले जाते. आरबीआय या कामासाठी आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स कंपन्या, विमा एजन्सी आणि भारतीय सुरक्षा दलांशी समन्वय साधते. परदेशातून आणले जाणारे सोने भारतातील तिजोरीत सुरक्षित ठेवले जाण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर भारतीय सुरक्षा दलांच्या जवानांची करडी नजर असते. सोने भारतात परत आणण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी त्याचे वजन आणि सीलिंग करतात. तसेच मायदेशात आल्यानंतर पुन्हा पडताळणी करून ते तिजोरीत सुरक्षित ठेवले जाते.
आरबीआय सोने मायदेशी का आणत आहे?
- परदेशात सुरक्षित ठेवलेले सोने भारतात परत आणण्यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत.
- अलीकडच्या काळातील रशिया आणि युक्रेनमधील युद्ध, तालिबानची अफगाणिस्तावरील पकड आणि यानंतर पश्चिमी देशांनी घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे जागतिक अनिश्चितता वाढली आहे.
- अशा परिस्थितीत अनेक देश त्यांचे सोने परदेशातून परत आणून सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
- १९९१ मध्ये भारताला आर्थिक संकटाच्या काळात इंग्लंड आणि जपानच्या बँकांकडून ४०० दशलक्ष डॉलर (सुमारे ३५,२७६ कोटी रुपये) कर्ज मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले होते.
- हा धडा लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेकडून सध्या सावधगिरी बाळगली जात आहे.
- त्याशिवाय आरबीआयला आपले सोने परदेशातील बँकांमध्ये ठेवण्यासाठी शुल्क भरावे लागते.
- यादरम्यान काही सोने भारतात परत आणल्याने हा खर्चही वाचण्याची शक्यता आहे.
- मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात २००९ मध्ये आरबीआयने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०० टन सोने खरेदी केले होते.
- तेव्हापासून बँक आपल्या सोन्याच्या साठ्यात हळूहळू वाढ करत आहे.
सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण
गेल्या वर्षभरात सोन्याने अत्यंत कमी कालावधीतच गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा दिला. सणासुदीच्या काळात पिवळ्या धातूच्या दराने सव्वा लाखांचा टप्पा ओलाडल्यानंतर अनेकांनी त्यातून नफाही कमावला. मात्र, आता परिस्थिती बदलत असून सोन्याच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे. दिवाळीआधी वाढलेले दर या आठवड्याच्या सुरुवातीलाच कमी झाले आहेत, त्यामुळे येत्या काळात सोन्या-चांदीत गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या सोने-चांदी दरात घसरण होत असली तरी हा त्यातील तेजीचा अंत नसून मोठ्या वाढीनंतर आलेला अल्पकालीन विराम आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली तरीही त्यात सध्या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
