पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. याचा एकूणच परिणाम दोन्ही देशांतील व्यापार संबंधांवरदेखील होत आहे. या तणावादरम्यान केशरचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रति किलोग्राम केशरची किंमत पाच लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अटारी-वाघा सीमा बंद केल्याचा निर्णय घेतल्याने केशरच्या किमती वाढत आहेत. लष्कर-ए-तैयबा अंतर्गत काम करणाऱ्या रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. केशरचे भाव वाढण्याचे कारण काय? याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊयात.

केशरचे भाव गगनाला भिडले

भारत देश मसाल्यांच्या बाबतीत समृद्ध असला तरी जगातील सर्वात महाग मसाला असलेले केशर भारतात काही निवडक ठिकाणीच पिकवले जाते. थंड प्रदेशात आढळणारे केशर हे जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. ‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार भारताने अटारी-वाघा बॉर्डर बंद केल्याच्या निर्णयानंतर अफगाणिस्तानातून जगातील सर्वात महागडा मसाला असलेल्या केशरचा ओघ थांबला आहे. एक किलोग्राम केशरची किंमत आता ५० ग्रॅम सोन्याइतकी आहे. गेल्या चार दिवसांत केशरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारत देश मसाल्यांच्या बाबतीत समृद्ध असला तरी जगातील सर्वात महाग मसाला असलेले केशर भारतात काही निवडक ठिकाणीच पिकवले जाते. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, पहलगाम दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी आणि सीमा बंद होण्यापूर्वी या उच्च दर्जाच्या केशरच्या किमती ४.२५ लाख ते ४.५० लाख रुपयांच्या दरम्यान होत्या. ‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, केशरच्या तीन प्रमुख जाती आहेत. मोंगरा (काश्मीर), लचा (काश्मीर) आणि पुशल (अफगाणिस्तान, इराण) यांचा समावेश आहे. काश्मीरमधील मोंगरा गडद रंग असलेला, चवदार आणि सर्वांत महाग केशर आहे. काश्मीरमधील लचा मोंगराच्या तुलनेत किंचित कमी गडद आणि चवदार आहे, तर अफगाणिस्तान आणि इराणमधील बारीक धागे असलेला आणि पिवळसर रंग असलेला केशर इतर जातींच्या तुलनेत स्वस्त आहे.

भारतातील केशर हा जगातील एकमेव केशर आहे, जो समुद्रसपाटीपासून १,६०० मीटर ते १,८०० मीटर उंचीवर पिकवला जातो. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, काश्मीरमधील केशर उच्च दर्जाचे मानले जाते. परंतु, काश्मीरमध्ये दरवर्षी फक्त सहा ते सात टन केशरचे उत्पादन होते. उर्वरित केशरची आयात अफगाणिस्तान आणि इराणमधून केली जाते. हे दोन देश जगातील सर्वात मोठे केशर उत्पादक देश आहेत. अफगाणिस्तानचा केशर त्याच्या रंग आणि सुगंधासाठी ओळखला जातो, तर इराणी केशर हा सर्वात स्वस्त असल्यामुळे त्याची मागणीही अधिक असते. जगातील केशरच्या एकूण उत्पादनांपैकी सर्वाधिक केशरचे उत्पादन इराणमध्ये होते. परंतु, भारताच्या या निर्णयानंतर इराणी केशरच्या किमतीतही पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, भारत दरवर्षी सुमारे ५५ टन केशर वापरतो.

काश्मिरी केशरचे उत्पादन वाढवण्याची गरज

‘द हिंदू’नुसार, पंपोर, बडगाम, पुलवामा, श्रीनगर आणि जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यात काश्मिरी केशर पिकवले जाते. ‘इंडिया इंटरनॅशनल काश्मीर केशर ट्रेडिंग सेंटर’नुसार, काश्मीरमध्ये केसरची लागवड ५०० इसवी सन पूर्वपासून सुरू आहे. २०२० मध्ये काश्मिरी केशरला भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग देण्यात आला, त्यामुळे हा जगातील एकमेव मसाला आहे, ज्याला जीआय टॅग मिळाला आहे. एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. मुख्य म्हणजे त्यामुळे नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी याचा फायदा उत्पादकांना होतो.

“जीआय प्रमाणपत्रामुळे काश्मीर केशरची प्रचलित भेसळ थांबेल, त्यामुळे प्रमाणित आणि उच्च दर्जाच्या केसरला खूप चांगली किंमत मिळेल,” असे काश्मीर केशरला जीआय टॅग मिळाल्यावर एका अधिकाऱ्याने सांगितले होते. काश्मिरी केशरचा वापर अन्नात, औषधीकरिता, सौंदर्यप्रसाधनांमध्ये तसेच इतर विविध उद्देशाने केला जातो. मुख्य म्हणजे संपूर्ण भारतात धार्मिक विधींसाठीदेखील या केशरचा वापर केला जातो. असे असले तरी १९९० च्या दशकापासून काश्मिरी केशरच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

‘इकॉनॉमिक टाईम्स’शी बोलताना वरिष्ठ व्यापार अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एकूण परिस्थितीविषयी सांगितले. ते म्हणाले, पंपोरमधील नवीन सिमेंट कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण आणि हवामान परिस्थिती या घटत्या उत्पादनासाठी कारणीभूत आहेत. केशरची फुले कोवळी असतात आणि सिमेंटची धूळ त्यांच्यावर पडली की ती कोमेजतात, त्यामुळेच केशरची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होते, असे ते म्हणाले.

अटारी-वाघा सीमा बंद केल्याने व्यापारावर परिणाम

पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आल्याने दोन्ही देशांतील व्यापार बंद झाला आहे. २०१९च्या पुलवामा हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा व्यापाराचा टक्का घसरला होता. भारताच्या एकूण व्यापारात पाकिस्तानचा वाटा ०.०६ टक्के इतकाच असल्याचे भारतीय निर्यात संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष एस. सी. रल्हान यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या मालावर २०० टक्के शुल्क आकारण्यासही सुरुवात केल्याने पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आताही पाकिस्तान भारताकडून रसायने, औषधे, कापूस, चहा, कॉफी, कांदे, टोमॅटो आयात करतो. मुख्य म्हणजेअटारी सीमेमार्गे अफगाणीस्तानशी होणाऱ्या व्यापारावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे केशरच्या किंमती वाढत आहेत.