Kerala Hijab Controversy Marathi News : गेल्या आठवड्यात केरळच्या कोची शहरातील एका खासगी शाळेत हिजाबच्या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. आठवीत शिकणारी एक विद्यार्थिनी अचानक शाळेत हिजाब परिधान करून आल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला दोन दिवसांची (१३ व १४ ऑक्टोबर) सुट्टी जाहीर केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या कोची शहरात तणावपूर्ण शांतता असून, हे प्रकरण थेट न्यायालयात गेले आहे. केरळमध्ये पुन्हा हिजाबच्या वादाला तोंड फुटल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना पूर्वनियोजित आणि चिंताजनक असल्याचे भाजपाने म्हटले आहे. हा प्रकार नेमका घडला तरी कसा? शाळा प्रशासनाचे म्हणणे काय? त्याविषयी जाणून घेऊ…
कोची शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी अचानक शुक्रवारी हिजाब परिधान करून आल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून ही विद्यार्थिनी नियमितपणे शाळेच्या गणवेशात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यात तिने हिजाब परिधान करून शाळेत हजेरी लावली. त्यावेळी शाळा प्रशासनाने हे गणवेश धोरणाचे उल्लंघन असल्याचे सांगत विद्यार्थिनीला समज दिली. “आम्ही विद्यार्थिनीला शाळेत हिजाब घालून येऊ नकोस, अशी प्रेमाने समज दिली होती. शिक्षकांच्या विनंतीला या विद्यार्थिनीने मानही दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची आई शाळेत आली आणि आम्हाला तुमचे नियम मान्य नसल्याचे सांगून ती गोंधळ घालू लागली,” असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी माध्यमांना सांगितले.
विशिष्ट समुदायाकडून शाळेला घेराव
मुख्याध्यापकांनी पुढे सांगितले की, विद्यार्थिनीच्या आईने गोंधळ घातल्याने काही काळ शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांनी त्यांची समजूत काढली आणि प्रकरण शांत झाले. १० ऑक्टोबर रोजी या वादाला आणखीच हवा मिळाली. कारण- संबंधित विद्यार्थिनी पुन्हा हिजाब परिधान करून शाळेत आली. यावेळी शिक्षकांनी तिला वर्गात येऊ न दिल्याने विद्यार्थिनीचे पालक आणि इतर मंडळींनी शाळेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान परिसरात हिजाबच्या मुद्द्यावरून दोन गट पडले. त्यातील एका गटाने शाळेच्या भूमिकेचे समर्थन केले; तर दुसऱ्या गटाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. वाद अधिकच वाढल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
आणखी वाचा : भारतातील ७० टक्के महिलांना जडलेला ऑटोइम्युन आजार नेमका आहे तरी काय? वेळीच उपचाराची गरज, अन्यथा…
विद्यार्थिनीने काय दावा केला?
घडलेल्या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देताना विद्यार्थिनीने एनडीटीव्हीला सांगितले की, शाळेत मला हिजाब घालण्याची परवानगी दिली जात नाही. मी हिजाब परिधान करून आल्यानंतर शिक्षकांनी मला प्रवेशद्वारावरच उभे केले. जोपर्यंत शाळेच्या गणवेशात येत नाही, तोपर्यंत तुला प्रवेश मिळणार नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्यातील काही शिक्षक तर माझ्याशी अतिशय उद्धटपणे बोलले. माझ्या अधिकारांवरच गदा आणल्याने यापुढे मी संबंधित शाळेत शिक्षण घेणार नाही.
जमावाचा शाळेत घुसण्याचा प्रयत्न
विद्यार्थिनीला शिक्षकांनी शाळेत प्रवेश न दिल्यामुळे विशिष्ट समुदायातील लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काहींनी तर थेट शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीला हिजाब परिधान करण्याची परवानगी मिळावी, अशी जमावाची मागणी होती. या घटनेमुळे शाळेच्या आवारात मोठा तणाव निर्माण झाला. या वादाला बंदी घालण्यात आलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या राजकीय संघटनेचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप शाळेच्या पालक-शिक्षक संघटनेच्या (पीटीए) एका अधिकाऱ्याने केला आहे. “या सगळ्यामागे एसडीपीआयचा हात असून, त्यांचे सदस्य हिजाबची सक्ती करण्यासाठी शाळेत आले आणि त्यांनी शिक्षकांवर दबाव टाकला, असे पीटीएचे सदस्य जोशी कैथावलप्पिल यांनी एनडीटीव्हीला सांगितले
वाद चिघळल्याने शाळेला दोन दिवस सुट्टी
हिजाबवरून निर्माण झालेला वाद चिघळल्यानंतर अखेर शाळा प्रशासनाला १३ व १४ ऑक्टोबर, अशी दोन दिवसांची दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली. शाळेच्या मुख्याध्यापिकेने जारी केलेल्या पत्राची प्रत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या वादाची माहिती बाहेर आली. “गणवेशाचे पालन न करणारी विद्यार्थिनी, तिचे पालक आणि शाळेबाहेरील काही व्यक्तींकडून वाढलेल्या दबावामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक मानसिक तणावाखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पीटीएच्या कार्यकारी सदस्यांशी चर्चा करून शाळेला दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर हेलीना अल्बी यांनी पत्रकात दिली. “संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या व शाळा व्यवस्थापनाच्या अधिकारांनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे,” असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : Depression Reason : पुरुषांपेक्षा महिलांना जास्त नैराश्य का येतं? काय आहेत कारणं? संशोधन काय सांगतं?
मुख्याध्यापकांनी माध्यमांना काय सांगितले?
माध्यमांशी संवाद साधताना सिस्टर हेलीना अल्बी म्हणाल्या, “शाळेत प्रवेश घेण्याआधीच आम्ही ‘ती’ विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना गणवेशाबद्दलची स्पष्टपणे माहिती दिली होती. आमची शाळा १९९८ पासून कार्यरत असून, असा वाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थिनीचे पालक आणि काही लोकांनी शुक्रवारी (१० ऑक्टोबर) शाळेत येऊन गोंधळ घातला. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी तणावाखाली असल्याने आम्हाला दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली.” सिस्टर हेलीना यांनी ‘The News Minute’ला सांगितले की, विद्यार्थिनी हिजाब घालून आल्यानंतर शाळेनं तिच्या वडिलांना बोलावून घेतलं. मात्र, ते आपल्या समुदायातील काही लोकांबरोबर शाळेत आले आणि त्यांनी शिक्षकांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. वर्ग सुरू असताना ते आमच्याबरोबर आक्षेपार्ह भाषेत बोलत होते.
हिजाबच्या वादामागे अतिरेकी घटकांचा हात?
पीटीए अध्यक्ष जोशी कैथावलप्पिल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना या वादामागे अतिरेकी घटकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. तक्रारदार विद्यार्थिनीने जून २०२५ मध्ये शाळेत प्रवेश घेतला होता आणि ६ ऑक्टोबरपर्यंत तिने शाळेच्या गणवेशाचे नियमित पालन केले. या शाळेतील ४५० पैकी १७७ विद्यार्थिनी मुस्लीम असून, त्यांना गणवेशाबद्दल कोणताही आक्षेप नाही. फक्त आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मुद्दामहून हिजाब परिधान करून वाद निर्माण करायचा आहे. तिच्या या कृत्यामागे अतिरेकी घटकांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे. शाळेत आंदोलन करणारे लोक स्थानिक नव्हते,” असा दावा जोशी कैथावलप्पिल यांनी केला.
विद्यार्थिनींच्या पालकांचे म्हणणे काय
दुसरीकडे विद्यार्थिनीच्या पालकांनी मात्र आमच्या मुलीने शाळेच्या गणवेशाचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचा दावा केला. “गेले चार महिने ती स्कार्फ बांधून शाळेत जात होती; पण तिने तो हिजाबप्रमाणे पिन केलेला नव्हता. तिची आई गणवेशाच्या नियमांबद्दल चर्चा करण्यासाठी अनेकदा शाळेत गेलेली आहे. जेव्हा मी मुख्याध्यापकांबरोबर चर्चा करण्यासाठी गेलो, तेव्हा शालेय समितीच्या सदस्यांनी मला हीन वागणूक दिली,” असे विद्यार्थिनीच्या पालकाने सांगितले. “मुलीला हिजाब घालण्याचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही अनेकदा शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. जर माझ्या मुलीनं हिजाब घातला, तर गणवेशाच्या नियमांचं उल्लंघन कसं होईल”, असा प्रश्नही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
आणखी वाचा : Skin Cancer : त्वचेच्या कॅन्सरचा धोका ‘या’ गोळीने होणार कमी? तज्ज्ञांचा दावा आणि संशोधन काय सांगतं?
हिजाब प्रकरणावरून राजकीय वादळ
हिजाबचा हा वाद उफाळून आल्यानंतर शाळा प्रशासनाने केरळ उच्च न्यायालयात धाव घेऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली. सोमवारी न्यायालयाने शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अंतरिम पोलीस संरक्षण देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. या वादाने केरळच्या राजकारणात मोठे राजकीय वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपाचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी हिजाबच्या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हा वाद नियोजित असून १०० टक्के घडवून आणलेला आहे. त्याद्वारे राजकीय संस्कृतीची आणि सामाजिक रचनेची चाचणी घेतली जात आहे. या नाट्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आम्हाला संशय आहे. काँग्रेसने अतिरेकी शक्तींसमोर शरणागती पत्करली आहे. एका बाजूला ते संविधानाविषयी बोलतात आणि दुसऱ्या बाजूला जमात-ए-इस्लामीसोबत हातमिळवणी करतात”, अशी टीका चंद्रशेखर यांनी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने भाजपाचा हा दावा फेटाळून लावला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वादावर लक्ष केंद्रित करून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काँग्रेसच्या खासदाराने म्हटले आहे.
शिक्षणमंत्र्यांचे गणवेशावर स्पष्टीकरण
केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी शाळांच्या गणवेश धोरणांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेच्या गणवेशाचे पालन करायला हवे. पालक आणि विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा व्यवस्थापनाला सहकार्य केले पाहिजे. इतर राज्यांप्रमाणे केरळमध्ये पेहरावावरून वाद निर्माण होता कामा नयेत,” असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हिजाबचा हा वाद लवकरच शांत होण्याची शक्यता आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या वडिलांनी नियमांनुसार आपल्या मुलीचे शिक्षण त्याच शाळेत सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांनी माध्यमांना दिली आहे. “मंगळवारी शाळा अधिकारी आणि काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान हा वाद सोडवण्यात आला आहे. सर्वांनी माघार घेतल्याने समाजात जातीय सलोख्याचा मजबूत संदेश गेला आहे”, असेही ते म्हणाले.