सरलेल्या सप्टेंबर महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ६७,९२७.२३ अंशांची सर्वोच्च पातळी गाठली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २०,२२२.४५ या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. या सर्वोच्च पातळीपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे ४,५०० आणि १,५०० हून अधिक अंशांची पडझड झाली आहे. ही पडझड का झाली, ती अशीच सुरू राहणार का, याबाबत जाणून घेऊया…
घसरणीमागील प्रमुख कारणे कोणती?
जागतिक पातळीवर सुरू झालेल्या इस्रायल-हमास संघर्षामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना चिंतेत टाकले आहे. इस्रायल-हमासदरम्यान संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. शिवाय गाझा पट्टीत इस्रायलने हल्ले तीव्र केल्याने इराणनेदेखील सक्रिय होण्याची सिद्धता केली आहे. त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाल्यास खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, जी सध्याच ८८ ते ९० डॉलर प्रतिपिंप आहे. यामुळे अनेक उद्योगांसाठी आवश्यक कच्चा माल महाग होईल. शिवाय राहणीमानाचा खर्च वाढेल. या सर्वांचा अर्थव्यवस्थेवर एकंदर गंभीर परिणाम होईल.
हेही वाचा : विश्लेषण : जळत्या जंगलांवर उपाय काय?
परदेशी गुंतवणूकदार देशांतर्गत बाजारातून पलायन का करताहेत?
अमेरिकी रोखे ही जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या १० वर्ष मुदतीच्या अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दर हा ५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. परिणामी भारतासह उदयोन्मुख बाजारपेठेत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) चौफेर समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला आहे. ते देशांतर्गत बाजारातून निधी काढून स्वदेशात निधी नेत आहेत. अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर आणि डॉलर निर्देशांक असाच वर राहिल्यास भारतासह उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री तीव्र होण्याची भीती आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सप्टेंबरमध्ये १४,७६८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. तर विद्यमान ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सुमारे १०,३४५ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.
बाजारात आयटी कंपन्यांच्या समभागात घसरण का?
तिमाही आर्थिक हंगामाला माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीपासून सुरुवात होते. आघाडीची आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने सर्वप्रथम सप्टेंबर अखेर सरलेल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ इन्फोसिस आणि विप्रोने तिमाही कामगिरी जाहीर केली. मात्र तीनही आघाडीच्या कंपन्यांची कामगिरी समाधानकारक आली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफा आणि महसुलातील वाढ किरकोळ राहिली आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी समभाग विक्री करून नफावसुलीला प्राधान्य दिले. कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे एकूणच बाजाराचा हिरमोड झाला आहे. तशात युरोपातील मंदीसदृश परिस्थितीमुळे बहुतांश आयटी कंपन्यांना मंदीचा सामना करावा लागतो आहे.
हेही वाचा : जेरुसलेममध्ये ८०० वर्षांपासून आहे भारतीय धर्मशाळा; बाबा फरीद लॉज आणि भारताचा संबंध काय?
देशांतर्गत गुंतवणूकदार बाजाराला तारणार?
गेल्या काही महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या सततच्या समभाग विक्रीमुळे निर्देशांकातील घसरण अधिक वाढली आहे. मात्र निर्देशांकातील अधिक पडझड देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्या रोखू शकतात. कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या अवास्तव घसरणीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे. कोटक म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडे सध्या २,५०,००० कोटींचा निधी उपलब्ध आहे. त्यांनी मांडलेल्या गणितानुसार, सध्या एकूण इक्विटी म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील मालमत्ता २५ लाख कोटी रुपये आहे. ज्यामध्ये सुमारे ५ टक्के रक्कम म्युच्युअल फंड कंपन्या रोख स्वरूपात बाळगतात, म्हणजे १,२५,००० कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. शिवाय कोणत्याही फंड योजनेचे निधी व्यवस्थापक कोणत्याही विमोचनासाठी तयार राहण्यासाठी रोख ठेवत असतात किंवा तरीही ते कोणत्याही अपवादात्मक संधीचा फायदा घेण्यासाठी रोख रक्कम बाळगू शकतात. दुसरे म्हणजे, डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन फंड जे ‘इक्विटी’, ‘डेट’ आणि ‘कॅश’मध्ये बाजाराच्या दृष्टिकोनावर आधारित असतात आणि समतोल फंड जे इक्विटीमध्ये २५ टक्के ते ७५ टक्के निधी हलवू शकतात, ते सध्या २ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतात. त्यामुळे इक्विटीमध्ये गुंतवला जाऊ शकणारा असा अंदाजे ४० टक्के म्हणजेच सुमारे ८०,००० कोटी रुपयांचा निधी आहे. याशिवाय, दर तिमाहीत म्युच्युअल फंड एसआयपी प्रवाहाद्वारे किमान ४५,००० कोटी रुपये बाजारात येतात. एकत्रितपणे, म्युच्युअल फंडांची सद्यःस्थितीत बाजार २,५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्ती आहे. म्हणजेच बाजारातील प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी एकट्या म्युच्युअल फंड उद्योगाकडे २,५०,००० कोटी रुपयांची ‘फायर पॉवर’ आहे. यामुळे बाजारात अधिक पडझड झाल्यास देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून बाजार सावरला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : भारताच्या आठ माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?
शेअर बाजारात मंदी की खरेदीची संधी?
शेअर बाजारात मंदी आणि तेजीचे चक्र कायमच सुरू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर पुन्हा मंदी, असे चक्र निरंतर सुरू असल्याने गुंतवणूकदारांनादेखील बाजारात समभाग खरेदीची आणि विक्रीची संधी मिळते. गेल्या ४० वर्षांच्या कालावधीत भांडवली बाजार अनेक चांगल्या-वाईट घटना आणि आव्हानांना सामोरा गेला आहे. सेन्सेक्सची सुरुवात झाली तेव्हा तो निर्देशांक वर्ष १९७९ मध्ये केवळ १०० अंशांवर होता. त्या १०० अंशांच्या पातळीपासून आतापर्यंत ६७,९२७ अशा उच्चांकी पातळीपर्यंत झेप घेतली आहे. त्यामुळे जागतिक प्रतिकूल घटनांमुळे बाजार जेव्हा-जेव्हा निराशेच्या गर्तेत जातो, तेव्हा सेन्सेक्सने आतापर्यंत मारलेली मजल लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे सध्याच्या बाजारातील घसरण मंदी नसून खरेदीची संधी मानता येईल.