-संदीप कदम

भारताने बांगलादेशविरुद्ध चुरशीच्या झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. भारताने मालिका विजय मिळवला असला तरीही मालिकेदरम्यान संघाच्या अनेक कमकुवत बाजू समोर आल्या. भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेतील दुसरे स्थान भक्कम केले आहे. तरीही, आगामी कसोटी मालिकेपूर्वी संघाला आपल्या चुकांवर मेहनत करणे गरजेचे आहे. भारतासमोर या मालिकेनंतर कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा

केएल राहुलला लय कधी सापडणार?

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व हे केएल राहुलने केले. भारताला त्याच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकण्यास यश मिळाले असले तरीही त्याला म्हणावी तशी लय सापडली नाही. राहुलने आतापर्यंत भारतासाठी ४५ कसोटी सामने खेळले आणि त्याची सरासरी ही ३५हून कमी आहे. त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या कठीण खेळपट्ट्यांवर धावा केल्या आहेत. मात्र त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. राहुलला अनेक संधीही मिळत आहेत. राहुलने कसोटी मालिकेत केवळ १३७ धावा केल्या. गेल्या काही काळात अनेकदा त्याला दुखापतींचाही सामना करावा लागला आहे. त्याच्यासोबत सलामीला येणारा युवा फलंदाज शुभमन गिल चांगला खेळताना दिसत आहे. भारताला आगामी कसोटी मालिका ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळायची आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना भारताला चांगल्या सलामीची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुलला लवकरात लवकर आपल्या चुकांवर मेहनत घेत धावा करणे गरजेचे आहे. रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, मात्र त्याच्यात नेतृत्वगुणाचा अभाव दिसला. पहिल्या सामन्यातील सामनावीर कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याने फलंदाजीत धावा न केल्यास निवड समिती त्याच्या स्थानाबाबत विचार करू शकते.

फिरकी गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजांना अडचण का?

भारतीय खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांना पूरक असतात. अनेक फलंदाजांना लहानपणापासूनच फिरकीचा सामना करण्याची सवय असते. बांगलादेशच्या खेळपट्ट्याही फिरकीसाठी पुरक होत्या. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांचा सामना करताना भारतीय फलंदाजांना अडचणी येत होत्या. दुसऱ्या कसोटीत फलंदाजांच्या अडचणीत चांगलीच भर पडली होती. वरच्या फळीतील फलंदाजांना मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांनी दबावाखाली ठेवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत घरच्या मैदानावर खेळणार असल्याने परिस्थितीची चांगली माहिती असली तरीही संघातील फलंदाजांना या बाबीवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

विराट कोहलीचे लय सापडणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे का?

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत सारख्या फलंदाजांनी आपला ठसा उमटवला. मात्र सर्वात अनुभवी विराट कोहलीला कसोटी मालिकेत छाप पाडता आली नाही. २०२०पासून विराटने २० कसोटी सामन्यांत २६.२०च्या सरासरीने केवळ ९१७ धावा केल्या आहे. ज्यामध्ये एकाही शतकाचा समावेश नाही. यासह त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्लिपमध्ये तीन झेलही सोडले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला मालिका विजय मिळवायचा झाल्यास विराट कोहली लयीत येणे गरजेचे आहे.

तळाच्या फलंदाजांना बाद करण्यास भारतीय गोलंदाज अपयशी का ठरत आहेत?

बऱ्याच काळापासून भारतीय गोलंदाज या समस्येचा सामना करत आहेत. गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या वरच्या फलंदाजी फळीला बाद करतात, मात्र नंतर तळाच्या फलंदाजांना बाद करताना गोलंदाजांचा कस लागतो. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतही गोलंदाजांना बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी अडचणी वाढवल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियासारख्या भक्कम संघाला संधी दिल्यास भारताला त्याचा फटका बसू शकतो.

भारतीय वेगवान गोलंदाज का प्रभाव पाडू शकले नाहीत?

गेल्या काही काळात भारतीय वेगवान गोलंदाजीत अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे गोलंदाजी फळी स्थिरावलेली दिसत नाही. पूर्वी ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा भारताच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करत होते. सध्या हे चौघेही संघासोबत नाही. मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये आपला प्रभाव पाडलेला आहे, मात्र त्याला दुसरीकडे म्हणावी तशी साथ मिळत नाही. उमेश यादवला जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्याने आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली. शमी, भुवनेश्वर तंदुरुस्त झाल्यास पुन्हा संघात येतील. वेगवान गोलंदाजांची कामगिरी उंचावायची झाल्यास त्यांची हाताळणी संघ व्यवस्थापनाला चांगल्या पद्धतीने करावी लागेल.

फिरकी गोलंदाज आगामी काळात महत्त्वाचे का?

भारतीय फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आपली छाप पाडली. देशातील खेळपट्ट्यांवरही हे फिरकी गोलंदाज चमक दाखवतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा गेल्या काही काळात भारतासाठी कसोटीत निर्णायक ठरत आहेत. जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघात आलेल्या अक्षर पटेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आपले महत्त्व पटवून दिले. त्यामुळे भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पोहोचायचे असल्यास संघाची मदार फिरकी गोलंदाजीवर असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष देणे गरजेचे का?

नजीकच्या काळात भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शमी, भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमरा हे भारताचे प्रमुख गोलंदाज दुखापतींमुळे त्रस्त आहे. आगामी काळात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका खेळायची आहे. त्यामुळे या खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असेल. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाही दुखापतीतून सावरतो आहे. त्यामुळे भारताच्या या प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष देणे विशेष गरजेचे आहे.