Male vs Female Depression Statistics : पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त नैराश्य येत असल्याचे आतापर्यंतच्या अनेक अभ्यासातून समोर आले आहे. आता एका नवीन संशोधनाने या मताला दुजोरा दिला असून त्यासाठी थेट जनुकीय घटकांना जबाबदार धरले आहे. ऑस्ट्रेलियातील बर्गहोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी नुकतेच २ लाख नैराश्यग्रस्त व्यक्तींवर संशोधन केले. यावेळी जनुकीय घटकांचे सविस्तर विश्लेषण करून त्यातील समान आनुवंशिक घटक शोधण्यात आले. नेचर कम्युनिकेशन्स या प्रतिष्ठित जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनातून नेमके काय समोर आले? त्याबाबत जाणून घेऊ…

ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या या संशोधनात १,३०,००० महिला आणि जवळपास ६५,००० पुरुष सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यातील सर्वजण गंभीर नैराश्याने ग्रस्त होते. या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या क्यूआयएमआर बर्घोफर संस्थेतील न्यूरो-जेनेटिसिस्ट डॉ. जोडी थॉमस यांनी म्हणाल्या, “पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नैराश्याचे जनुकीय घटक अधिक प्रमाणात आढळून येतात. दोघांमधील जनुकीय घटक समजून घेतल्यास त्यांच्यातील नैराश्याची कारणे अधिक स्पष्टपणे ओळखता येऊ शकतात. या प्रणालीमुळे अधिक वैयक्तिक उपचारपद्धती विकसित करण्याचे मार्ग खुले होतात.”

नैराश्यासाठी कोणते घटक जबाबदार?

महिला आणि पुरुषांमधील गंभीर नैराश्यासाठी ७,००० जनुकीय घटक जबाबदार असल्याचे बर्गहोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनातून समोर आले आहे. त्याशिवाय महिलांमध्ये नैराश्याशी संबंधित आणखी ६,००० जनुकीय घटक आढळून आल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या जनुकीय फरकांमुळे पुरुष आणि महिलांना नैराश्य येत असले तरी त्यांना येणारा अनुभव वेगवेगळा असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : Skin Cancer : त्वचेच्या कॅन्सरचा धोका ‘या’ गोळीने होणार कमी? तज्ज्ञांचा दावा आणि संशोधन काय सांगतं?

महिलांना नैराश्याचा धोका जास्त का?

संशोधकांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त नैराश्य येण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये जैविक, आनुवंशिक, सामाजिक, भावनिक यांसारख्या अनेक घटकांचा समावेश आहे. नैराश्याने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये वजन वाढणे, दिवसा जास्त झोप येणे आणि वारंवार भूक लागणे यांसारखी चयापचय संबंधित लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येतात. त्याउलट नैराश्यग्रस्त पुरुषांमध्ये राग, आक्रमकता, जोखमीची वर्तणूक आणि मादक पदार्थांचे सेवन ही लक्षणे आढळून येतात. त्याबाबत न्यूरो-जेनेटिसिस्ट जोडी थॉमस म्हणाल्या, “आम्हाला पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळे जनुकीय बदल आढळून आले आहेत. या नैराश्यामुळे दोघांना येणारा अनुभवदेखील वेगवेगळा असल्याचे समोर आले आहे.”

नैराश्याबाबत संशोधकांनी काय सांगितलं?

संशोधक ब्रिटनी मिशेल यांच्या मते, या निष्कर्षांमध्ये महिलांसाठी नैराश्याच्या उपचारात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. आत्तापर्यंत, महिला आणि पुरुषांवर नैराश्यामुळे कसे वेगवेगळे परिणाम होतात याबाबत फारसे संशोधन झालेले नव्हते. नवीन संशोधनात दोघांमधील जनुकीय घटकांमधील बदल लक्षात आल्याने नैराश्याच्या उपचारासाठी मोठा फायदा होणार आहे. मिशेल यांनी संशोधनात महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला आहे. सध्या विकसित होत असलेली अनेक औषधे आणि आजपर्यंतची संशोधने फक्त पुरुषांच्या नैराश्यावरच केंद्रित होती. मात्र, आता त्यात महिलांचाही समावेश करण्यात आल्याने या संशोधनाचा नक्कीच फायदा होईल, असे मिशेल यांनी सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी काय सांगते?

‘मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर’ हा जगातील सर्वात सामान्य मानसिक आजारांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरातील ३० कोटींहून अधिक लोकांना या नैराश्याचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान महिला आणि पुरुष यांच्या जनुकीय बदलांवरील आधारित नवीन उपचार पद्धती विकसित झाल्यास महिलांना त्यांच्या विशिष्ट लक्षणांवर आणि जैविक कारणांवर आधारित अधिक प्रभावी उपचार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : लघवीतून युरिक अ‍ॅसिड कमी बाहेर पडतंय? सांधेदुखी, थकवा आणि सूजही आहे, रुजुता दिवेकर सांगताहेत सोपे उपाय!

नैराश्यामुळे वाढतेय आत्महत्येचे प्रमाण?

एका अहवालानुसार, भारतीय महिलांचे आत्महत्येचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत तीनपटीने जास्त आहे. १५-३० वयोगटांमधील स्त्री व पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतीय मनोवैज्ञानिक संस्थेनुसारनुसार, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १० ते १५ टक्के जण भावनेच्या भरात आत्महत्या करतात. आत्महत्येमुळे जगातील लोकसंख्येपैकी ८ लाख लोक दर वर्षाला मृत्यू पावतात. एक माणूस दर ४० सेकंदाला २५ वेळा आत्महत्येचा प्रयत्न करू शकतो. आत्महत्या करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसू लागतात. ‘माझं आयुष्य व्यर्थ आहे’ असे वाक्य या व्यक्ती सतत उद्गारतात. शेतकरी, विद्यार्थी आणि हुंडाबळीमुळे होणाऱ्या आत्महत्या यांचे प्रमाण जास्त आहे. जैवमानसिक विकार, नैराश्य, चिंताग्रस्त जीवनशैली, भीती यामुळे आत्महत्या करण्याच्या घटना जास्त घडत असल्याचे भारतीय मनोवैज्ञानिक संस्थेने म्हटले आहे.