– मंगल हनवते

देशातील पहिली-वहिली मोनोरेल अशी ओळख असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) मोनोरेल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (एमएमआरडीए) पांढरा हत्ती ठरली आहे. दिवसाला सहा ते सात लाखांचे नुकसान सहन करून मोनोरेल चालवली जात आहे. तोट्यात चालणाऱ्या या प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी एमएमआरडीए विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून आता मोनोरेलचा विस्तार संत गाडगे महाराज चौक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानकापर्यंत करून मोनोरेल मेट्रो ३ शी (कुलाबा…वांद्रे… सिप्झ) जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारीकरणामुळे मोनोरेलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असा दावा एमएमआरडीएने केला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो आणि विस्तारीकरण मोनोरेलला तारते का, हे येणारा काळच ठरवेल.

cigarette, cigarette ban, Britain,
विश्लेषण : ब्रिटनची वाटचाल संपूर्ण सिगारेटबंदीकडे… काय आहे नवा धूम्रपान बंदी कायदा?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

मोनोरेल प्रकल्प म्हणजे काय? 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक अत्याधुनिक पर्याय म्हणजे मोनोरेल. जेथे रेल्वे किंवा बससारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोहोचू शकत नाहीत, तिथे नागमोडी वळणे घेत मोनोरेल पोहचते. एका खांबावरील रुळावरून चालणाऱ्या मोनोरेलच्या उभारणीसाठी रेल्वे, मेट्रोच्या तुलनेत खर्च आणि वेळ कमी लागतो. त्यामुळे हा पर्याय जगभरात पसंतीस उतरला आहे. जपान, मलेशिया, जर्मनी, रशिया आदी देशात मोनोरेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील भक्कम पर्याय म्हणून उभी राहिली आहे. मोनोरेल्वेचा शोध रशियातील इव्हान इल्मानोव्ह यांनी १८२० मध्ये यांनी लावला. मात्र मोनोरेलचे पेटंट ब्रिटनच्या हेन्री पाल्मर यांना मिळाले आहे. जगातील पहिली मोनोरेल ब्रिटनमध्ये धावली. सुरुवातीच्या काळात डिझेल आणि अगदी जुन्या काळातील रेल्वेप्रमाणे वाफेच्या इंजिनावर मोनो चालविली जात होती. पण आता मात्र विजेवर आणि काही ठिकाणी चुंबकीय बळावर मोनो धावते. 

मुंबई मोनो देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल?

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने साधारणतः २००७-२००८  मध्ये मोनोरेल प्रकल्प आणला. एमएमआरमध्ये १८५ किमीचे मोनोरेलचे जाळे विणण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. जेथे रेल्वे पोहोचलेली नाही, बेस्ट बसची सुविधा पुरेशी नाही अशा ठिकाणी मोनोरेल नेण्याची आखणी करण्यात आली. यातील पहिली मोनोरेल मार्गिका होती ती म्हणजे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक. दोन टप्प्यांत ही मार्गिका बांधून पूर्ण करण्यात आली असून देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मुंबईत धावत आहे. मात्र त्याच वेळी मोनोरेल १ चा २० किमीचा मार्ग वगळता अंदाजे १६५ किमीचा मोनोरेल प्रकल्प एमएमआरडीएने गुंडाळला. पहिली मोनोरेल मार्गिका अपयशी ठरत असल्याचे संकेत मिळाल्याबरोबर एमएमआरडीएने संपूर्ण प्रकल्प गुंडाळला. 

कशी आहे मार्गिका? 

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशी २० किमीची मोनोरेल मार्गिका चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशा दोन टप्प्यांत साकारण्यात आली. चेंबूर ते वडाळा असा ८.९३ किमीचा पहिला टप्पा पूर्ण करून ४ फेब्रुवारी २०१४ मध्ये ती वाहतूक सेवेत दाखल झाली. वडाळा ते  संत गाडगे महाराज चौक असा ११.२० किमीचा टप्पा २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हा टप्पा रखडला आणि अखेर फेब्रुवारी २०१९ मध्ये हा टप्पा पूर्ण झाला. १७ स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेवर चार डब्यांची मोनोरेल धावू लागली. २४६० कोटी रुपये खर्च करून देशातील ही पहिली मोनोरेल मार्गिका उभारण्यात आली. एका मोनोरेल गाडीची प्रवासी क्षमता ५६२ आहे.  

प्रकल्प तोट्यात का?

पहिल्या मार्गिकेला प्रवाशांचा प्रतिसादच मिळाला नाही. अनेकदा मोनो गाड्या रिकाम्या फिरत असल्याचे चित्र आजही कायम आहे. प्रवासी नसल्याने मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून एमएमआरडीएला दिवसाला सात-आठ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मोनोरेल मार्गिकेचे व्यवस्थापन आणि देखभाल स्कोमी-एल अँड टी कंपनीकडे होती. यासाठी एमएमआरडीएकडून स्कोमी-एल अँड टीला प्रति फेरी ४ हजार ६०० रुपये द्यावे लागत होते. इतका भरमसाट खर्च करूनही प्रवासी संख्या काही वाढत नव्हती. त्यातच अनेकदा मोनोरेलला अपघात झाले, मोनोरेल गाड्या अल्पावधीतच खराब झाल्या. आर्थिक नुकसान वाढत गेले. अशात नोव्हेंबर २०१७ मध्ये मोनोरेलच्या डब्याला आग लागली. या आगीत मोनोरेल अक्षरशः जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे तब्बल नऊ महिने मोनो बंद होती. त्याचाही मोठा आर्थिक फटका एमएमआरडीएला बसला. शेवटी एमएमआरडीएने प्रकल्पाचे व्यवस्थापन स्वतःकडे घेतले. मात्र एमएमआरडीएलाही प्रवासी संख्या वाढवणे साधलेले नाही. आजही मोनोरेल तोट्यात धावत असून ती एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरली आहे. 

विस्तारीकरणाचा घाट यशस्वी ठरेल? 

मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून सुरुवातीपासून प्रयत्न केले जात आहेत. मोनोरेल स्थानकावरील जाहिराती, मोनोरेल मार्गिकेतील खांबावरील जाहिराती आणि इतर माध्यमातून महसूल मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे. प्रवासी संख्या वाढावी यासाठी दोन गाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज प्रत्येक २२ मिनिटांनी मोनो सुटते पण येत्या काळात हे अंतर कमी होईल आणि मोनोची प्रवासी संख्या वाढेल अशी आशा एमएमआरडीएला आहे. त्यासाठीच नवीन १० गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचबरोबर आता मोनोरेलचा विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला त्यानुसार संत गाडगे महाराज चौक ते महालक्ष्मी मेट्रो ३ स्थानक असा ७०० मीटरचा विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणास प्राधिकरणाची मंजुरी मिळाली असून अर्थसंकल्पात विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. लवकरच भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात मोनोरेल महालक्ष्मी मेट्रो ३ स्थानकापर्यंत धावेल. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका असून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज आहे. अशा वेळी मेट्रो ३ शी मोनोरेल जोडल्यास त्याचा फायदा मोनोरेलला होईल अशी आशा एमएमआरडीएला आहे.