संजय जाधव

करोना महासाथीमुळे घडलेल्या उलथापालथीतून जग अद्याप सावरलेले नाही. करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी संसर्गात वाढही होताना आढळून येत आहे. त्याच वेळी आणखी एक महासाथ जगाच्या उंबरठय़ावर येऊ घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संभाव्य आजाराला ‘एक्स’ असे नाव दिले आहे. हा आजार आजवर न सापडलेल्या अशा कारकाशी म्हणजे पॅथोजनशी (विषाणू/ जिवाणू/ बुरशी यापैकी) निगडित असून, त्याचा मोठय़ा प्रमाणात मानवाला संसर्ग होऊ शकतो. करोना विषाणूपेक्षा या ‘एक्स’चा कारक घटक २० पट अधिक घातक असेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचा संसर्ग सुरू झाला असेल, असा अंदाजही वर्तविला जात आहे.

‘एक्स आजार’ म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये एक्स आजार हे नाव वापरण्यास सुरुवात केली. जगात महासाथ घडवू शकेल, असा संभाव्य अनोळखी आजार म्हणून त्याचे नामकरण एक्स करण्यात आले. त्यामुळे मानवी आजाराला कारणीभूत ठरू शकेल, अशा अनोळखी पॅथोजनचा शोध संशोधक घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर या आजाराला प्राधान्यक्रमाच्या आजारात स्थान दिले आहे. कोविड-१९, इबोला, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस), निपा आणि झिका यांसारख्या जीवघेण्या आजारांमध्ये ‘एक्स’ला स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा>>>ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला?

हा आजार कोणत्या प्रकारचा असेल?

हा एक्स आजार हा विषाणू, जिवाणू अथवा एखाद्या अतिसंसर्गजन्य बुरशीद्वारे पसरू शकतो. हा आजारही प्राण्यांमधून मानवात पसरणाऱ्या प्रकारातील असेल, अशी शक्यता आहे. त्याचा मृत्युदर अधिक असेल आणि त्याच्यावर कोणतेही उपचार नसतील. हा आजार स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीएवढा घातक असेल. एक्स हा गोवरइतका संसर्गजन्य, पण त्याचा मृत्युदर इबोलासारखा असण्याची शक्यता आहे.

लस उपलब्ध होईल का?

या ‘अज्ञात’ आजारावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. प्रत्येक घातक विषाणू प्रकाराच्या जातकुळीसाठी वेगवेगळय़ा लशींचे नमुने तयार करून ठेवायला हवेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे एक्सवर आतापासूनच लस तयार करण्याची पावले उचलायला हवीत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत केवळ २५ विषाणू कुटुंबे ओळखण्यात यश मिळविले आहे. त्यातून हजारो विषाणूंची माहिती मिळाली असली, तरी अद्याप कोटय़वधी विषाणूंची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आणखी संशोधनावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा>>>विश्लेषण : जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील पीक पद्धती बदलणार? 

काय उपाययोजना करणार?

एक्स आजाराचा विषाणू संसर्गाच्या उंबरठय़ावर असेल आणि तो कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो, असा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे प्राथमिक टप्प्यावरच पावले उचलण्यात यावीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.  सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या महासाथीचा सामना करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करणे. वेळीच पावले न उचलल्यास काय घडू शकते, हे आपण करोना महासाथीवेळी पाहिले आहे. करोना विषाणू हा एक्सपेक्षा सौम्य असूनही त्यामुळे आर्थिक नुकसान आणि आरोग्य यंत्रणेवरला वाढीव खर्च मिळून तब्बल १६ लाख डॉलरचा फटका जगाला बसला होता. त्यामुळे आधीच सावध होऊन पावले उचलण्याची गरज आहे.

प्राण्यांतून मानवात आजार का?

वाढते शहरीकरण, शेतीखालील वाढते क्षेत्र यांमुळे जंगलांचे प्रमाण कमी होत आहे. आधुनिक शेतीच्या पद्धतींचाही दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांचे अधिवासही नष्ट होत आहेत. त्यातून जंगलातील पक्षी आणि प्राण्यांचा मानवाशी संपर्क वाढत आहे. त्यातून मानवात नवीन आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

नेमका धोका किती?

एक्स आजारामुळे पाच कोटी जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत ब्रिटनमधील लसीकरण कृती गटाच्या अध्यक्षा केट बिंगहॅम यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, करोनापेक्षा एक्स हा अधिक जीवघेणा असेल. जगात १९१८-१९ मध्ये आलेल्या फ्ल्यूच्या साथीत ५ कोटी जणांचा मृत्यू झाला होता. पहिल्या महायुद्धात जगभरात मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट होते. करोना विषाणूमुळे जगात २ कोटींहून अधिक जणांचा मृत्यू झाला. ‘एक्स’ हा करोनापेक्षा जास्त धोकादायक असेल आणि त्याचा मृत्युदरही इबोलाएवढा म्हणजेच ६७ टक्के असेल, असा अंदाज आहे. परंतु हा आजार सुरू झाल्याची नेमकी माहिती आज तरी उपलब्ध नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sanjay. jadhav@expressindia. com