-अन्वय सावंत

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. या मालिका विजयासह भारतीय संघाने जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी सलग दुसऱ्यांदा गाठण्यासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ अन्य कोणत्या संघाविरुद्ध सामने खेळेल आणि भारताची सध्या गुणतालिकेतील स्थिती काय आहे, याचा हा आढावा.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

जागतिक कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची स्थिती काय?

बांगलादेशविरुद्धच्या मालिका विजयानंतर भारताने जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेतील दुसरे स्थान अधिक भक्कम केले आहे. भारताची ५८.९३ अशी गुण सरासरी असून, ऑस्ट्रेलियाचा संघ ७६.९२ अशा गुण सरासरीसह अग्रस्थानावर आहे. भारताने यंदाच्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत ८ सामने जिंकले असून, ४ सामने गमावले आहेत. तसेच भारताचे दोन सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे भारताच्या खात्यावर एकूण ९९ गुण आहेत. मात्र, गुणतालिकेतील स्थानांसाठी गुण सरासरी ग्राह्य धरली जाते. दक्षिण आफ्रिकेचा संघ ५४.५५ गुण सरासरीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचा निकाल किती महत्त्वाचा?

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेचा निकालही जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत सहा गडी राखून विजय मिळवला होता. हा सामना केवळ दोन दिवसांत संपला होता. तसेच मेलबर्न येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. हा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलिया जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना गाठणार हे जवळपास निश्चित होईल.

जागतिक कसोटी स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील प्रतिस्पर्धी कोण?

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताचा दौरा करणार आहे. उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा भाग असेल. या स्पर्धेतील भारताची ही अखेरची मालिका असणार आहे. भारतीय संघाला घरच्या मैदानावर नमवणे हे अत्यंत अवघड आव्हान मानले जाते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही भारताचे पारडे जड असेल.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील निकालाचा काय प्रभाव पडणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ४-० असे निर्भेळ यश मिळवले, तर भारताचे जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान पक्के होईल. ही मालिका जिंकल्यास भारताचे सरासरी ६८.०६ गुण होतील. तसेच या मालिकेत ३-१ किंवा ३-० अशी सरशी साधल्यास भारताचे सरासरी ६२.५० गुण होतील. भारताला हा निकालही अंतिम फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरेल. ही मालिका २-० किंवा १-० अशी जिंकल्यास भारताचे सरासरी ६०.६५ गुण होतील. ही मालिका बरोबरीत संपल्यास भारताची गुण सरासरी ६० पेक्षा कमी राहील. तसे झाल्यास वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या मालिकेतील निकालावर भारतीय संघाची आगेकूच ठरेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ०-२, ०-३ किंवा ०-४ अशा फरकाने गमावल्यास त्यांच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात येतील.

जागतिक कसोटी स्पर्धेतील उर्वरित मालिका कोणत्या?

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका, तसेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, उभय संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकेतील निकालांच्या आधारे जून महिन्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणते संघ खेळणार हे ठरेल. गतस्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.