पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली भारतातील तीन वेगवेगळ्या राज्यांमधील १२ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या उत्तरी राज्यांमध्ये ही अटक करण्यात आली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच भारतात होत असलेल्या हेरगिरी कारवायांचा माग काढला गेला. ते थांबविण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत असतानाच संबंधित संशयित आरोपींबाबत माहिती मिळताच त्यांना अटक केली गेली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा हिच्यासह इतरांचाही समावेश आहे. भारतातील उच्चायुक्तालयातील एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी संपर्क असल्याचे समोर आल्यानंतर तिला अटक केली. तर हे अटक केलेले लोक कोण आहेत? त्यांच्यावर काय आरोप आहेत आणि अधिकाऱ्यांनी आतापर्यंत काय म्हटले आहे हे या विश्लेषणातून जाणून घेऊ…
१. ज्योती मल्होत्रा
ज्योती मल्होत्रा जी ज्योती राणी म्हणूनही ओळखली जाते. ती पदवीधर आहे आणि हरयाणा पॉवर डिस्कॉममधील निवृत्त अधिकाऱ्याची मुलगी आहे. ती ट्रॅव्हल विथ जो नावाचे एक ट्रॅव्हल यूट्यूब चॅनेल चालवते. तिच्या या चॅनेलचे ३.२ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावरही तिचे लक्षणीय फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे १.३७ लाख फॉलोअर्स आहेत आणि फेसबुक व स्नॅपचॅटवरही ती सक्रिय आहे. ज्योती ही अनेकदा पाकिस्तानला गेली होती. ती दोन महिन्यांपूर्वीच परतली होती. या ट्रिपचे अनेक व्हिडीओ आणि रील तिने पोस्ट केले होते. या भेटीमुळे भारतीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ज्योतीला कायमस्वरूपी पाकिस्तानची हेर म्हणून कार्यरत करू पाहत होती. ज्योतीला हरयाणातील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली. तिच्यावर अधिकृत गुप्तता कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
२. देवेंद्र सिंग
हरयाणातील २५ वर्षीय विद्यार्थ्याला हेरगिरी आणि पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तो पटियाला इथल्या खालसा महाविद्यालयात राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्याच्या फेसबुक अकाउंटवर त्याने बंदुका आणि पिस्तुलांचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो कर्तारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानला गेल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर पाकिस्तानच्या आयएसआयला संवेदनशील माहिती पुरविल्याचा आरोप आहे.
“तो भारत आणि पाकिस्तानमधील वादाची माहिती त्या एजन्सीला देत होता. तसेच ऑपरेशन सिंदूरची माहिती वेळोवेळी पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयला देत होता”, असे कैथलचे डीएसपी वीरभान यांनी म्हटले आहे.
३. अरमान
हरयाणातील नूह इथल्या २३ वर्षीय अरमानला दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, संशय आल्यानंतर शेअर केलेले व्हिडीओ आणि माहिती असे सर्व पुरावे गोळा करीत त्या संदर्भात तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, अरमान २०२३ पासून पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात होता.
४. नौमान इलाही
नौमान इलाही या २४ वर्षीय तरुणाला पाकिस्तानातील लोकांना संवेदनशील माहिती पुरविल्याच्या संशयावरून हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तो पाकिस्तानच्या आयएसआयच्या एका हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या इलाही याने पाकिस्तानमधून पैसे घेतल्याचा आरोप आहे. ते पैसे त्याच्या मेव्हण्याच्या खात्यात जमा करण्यात आले होते. इस्लामाबादमधील काही लोकांना माहिती देण्याच्या बदल्यात हे पैसे घेतल्याचे वृत्त आहे.
५. शहजाद
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील व्यापारी शहजाद याला स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ने मुरादाबाद येथून अटक केली. एसटीएफच्या माहितीनुसार, त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती पुरवली आहे. त्याच्यावर भारत-पाकिस्तान सीमेवरून सौंदर्यप्रसाधने, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंची तस्करी केल्याचाही संशय आहे.
६. मोहम्मद मुर्तजा अली
मोहम्मद मुर्तजा अली हा पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जालंधर येथे छापा टाकून त्याला अटक केली. त्याने माहिती पाठविण्यासाठी स्वतः विकसित केलेल्या मोबाईल अॅपचा वापर केल्याचा आरोप आहे. अटकेच्या वेळी पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि तीन सिम कार्डे जप्त केली.
७. गुजाला आणि यामिन मोहम्मद
पाकिस्तानी हाय कमिशनमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधत माहिती पुरविल्याच्या संशयावरून पंजाबमधील मालेरकोटला जिल्ह्यातील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुजाला व यामिन मोहम्मद अशी या दोघांची ओळख पटली आहे. दोघेही मालेरकोटला येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजाला ही ३२ वर्षांची विधवा महिला आहे.
८. फलकशेर मसीह आणि सूरज मसीह
पंजाब पोलिसांनी ४ मे रोजी अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्रे आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती व छायाचित्रे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडे उघड केल्याच्या आरोपाखाली दोन व्यक्तींना अटक केली. पलक शेर मसीह व सूरज मसीह अशी या दोघांची ओळख पटली आहे. ग्रामीण अमृतसरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनिंदर सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या अटकेची माहिती दिली आहे. त्यांच्यावर पाकिस्तानमधील हँडलर्ससोबत लष्करी स्थळांशी संबंधित दृश्ये आणि माहिती पुरविल्याचा आरोप आहे.
प्रियांका सेनापती कोण आहे?
ओडिशास्थित यूट्यूबर प्रियांका सेनापती तिच्या प्रवास व्हिडीओजसाठी प्रसिद्ध आहे. तिची सध्या ज्योती मल्होत्राशी संबंधित प्रकरणासंदर्भात चौकशी सुरू आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ती तीन ते चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील कर्तारपूरला गेली होती आणि ज्योतीशी तिची मैत्री झाली होती.
पुरीचे पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल म्हणाले की, प्रियांकाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. तपास अधिकारी ज्योतीशी तिचे संबंध आणि कर्तारपूर कॉरिडॉरमधून तिच्या प्रवासाची चौकशी करीत आहेत. “याबाबत माहिती मिळाल्यानंतर, या संदर्भात आमची पडताळणी सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्व तथ्ये समोर आणू. यासोबतच आम्ही वेगवेगळ्या राज्यांच्या विविध एजन्सी, केंद्रीय एजन्सी, हरयाणा पोलिसांशी संपर्कात आहोत आणि त्यांना आमच्याकडून हवी असलेली माहिती आम्ही नक्की देऊ”, असेही अग्रवाल यांनी सांगितले.