न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी डेमोक्रॅटिक उमेदवार झोहरान ममदानी यांची मोठ्या बहुमताने निवड झाली. त्यांनी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मोठे मताधिक्य मिळवलेच. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या आणि सारी ताकद लावलेल्या या निवडणुकीत युवा, हिस्पॅनिक आणि गौरेतर मतदारांनी भारतीय वंशाच्या मुस्लिम उमेदवाराला निवडून देणे ही ट्रम्पवादी राजकारणाच्या उतरणीच्या काळाची नांदी ठरू शकते.
ऐतिहासिक निवड
कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या असत्या, तर आशियाई-आफ्रिकन वंशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या असत्या. मात्र तसे घडले नाही. झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी निवड अशीच ऐतिहासिक ठरली. अमेरिकेतील या सर्वांत मोठ्या शहराच्या महापौरपदी ३४व्या वर्षी निवड झालेले ते सर्वांत युवा उमेदवार. तसेच या शहराच्या इतिहासातील पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर. जवळपास २० लाख मतदारांनी या निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान केले. गेल्या ५० वर्षांतली ही विक्रमी मतदारसंख्या. त्यांनी न्यूयॉर्क राज्याचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला. कुओमो हे मूळ डेमोक्रॅटिक पक्षाचे. पण न्यूयॉर्क राज्याइतकेच महत्त्व असलेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या शर्यतीत ते उतरले अपक्ष म्हणून. कारण जून महिन्यात पक्षांतर्गत निवडणुकीत त्यांचा ममदानींकडून पराभव झाला होता. त्यामुळे ममदानी, कुओमो आणि रिपब्लिकन पक्षाचे कर्टिस स्लिवा अशी ही तिरंगी निवडणूक झाली. ममदानी यांनी १० लाखांहून थोडी अधिक म्हणजे ५०.४ टक्के मते मिळाली. कुओमो यांना ८.५ लाख (४१.६ टक्के) मते मिळाली. स्लिवा यांना अवघी १.४६ लाख (७.१ टक्के) मते मिळाली. १९६९नंतर पहिल्यांदाच महापौर निवडणुकीत एखाद्या उमेदवारास १० लाखांहून अधिक मते पडली.
मुस्लिम, लॅटिनो, आफ्रिकन मते
९/११ दहशतवादी हल्ल्यांची सर्वाधिक झळ न्यूयॉर्क शहराला बसली. त्यातून या शहरात काही काळ मुस्लिमद्वेष बऱ्यापैकी निर्माण झाला होता. अशा शहरात मुस्लिम महापौर निवडून येणे ही अनेकांना अशक्यकोटीतली बाब वाटत होती. रिपब्लिकन पक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांची मुस्लिम आणि स्थलांतरित पार्श्वभूमी वारंवार अधोरेखित केली. पण त्याचा फार परिणाम झालेला दिसला नाही. न्यूयॉर्क शहर सहसा डेमोक्रॅट उमेदवाराच्या पारड्यात मते टाकते हे खरे. मॅनहॅटन, ब्रुकलिन येथील उच्चभ्रू गोरे मतदार, तसेच आफ्रिकन आणि लॅटिनो किंवा हिस्पॅनिक स्थलांतरितांच्या वंशातील मतदार, कट्टर ज्यू समुदाय हा या पक्षाचा जनाधार मानला जातो. मात्र यावेळी ममदानींसमोर कुओमो हे डेमोक्रॅटिक पक्षाचेच माजी पण वजनदार उमेदवार होते. त्यांच्याकडे या पक्षाची काही पारंपरिक (उदा. ज्यू समुदाय) मते गेलीच. मात्र न्यूयॉर्कमध्ये गेल्या काही काळात मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या दक्षिण आशियाई मुस्लिम मतदारांना ममदानी यांनी आपलेसे केले. टॅक्सी ड्रायव्हर, गिग वर्कर, छोटे नोकरदार नि किरकोळ व्यावसायिक यांच्यात जाऊन ममदानींनी प्रचार केला. त्याने मोठा फरक पडला.
स्वस्ताईचा वायदा
न्यूयॉर्क शहर हे जगातील अत्यंत महागड्या शहरांतील एक गणले जाते. निम्न मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला याची झळ मोठ्या प्रमाणात बसत असते. घरभाडी, दुकानभाडी आवाक्याबाहेरील आहेत. शाळेत पाठवावे, तर बससेवा महागडी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही फार स्वस्त नाही. ममदानींनी याबाबत काही दूरगामी आश्वासने दिली. घरभाड्यांना स्थगिती, मोफत बससेवा, सरकारी धान्य दुकाने, इतर अनेक स्तरांवर परवडणाऱ्या सेवा ही आश्वासने न्यूयॉर्कमधील नोकरदार मतदाराला भावली.
ट्रम्प यांचे अपयश
न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीबरोबरच न्यूजर्सी आणि व्हर्जिनिया या दोन राज्यांच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकांतही डेमोक्रॅटिक उमेदवार निवडून आले. अमेरिकेत सध्या सुरू असलेले सरकारी शटडाऊन आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अनेक राज्यांत जाणवणारी महागाई हे ट्रम्प यांची लोकप्रियता खालावणारे प्रमुख मुद्दे ठरले. त्यांनी न्यूयॉर्कची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. एके काळचे त्यांचे कट्टर विरोधक कुओमो यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला, तेदेखील रिपब्लकन पक्षाचा स्वतंत्र उमेदवार असतानाही! झोहरान ममदानी निवडून आले, तर न्यूयॉर्क शहराला फेडरल म्हणजे केंद्रीय मदत कमीत कमी दिली जाईल अशी धमकी त्यांनी दिली होती. कायद्यात बसेल अशी कमीत कमी मदत ते देतील. पण ताकद लावूनही ममदानींच्या निवडणुकीत त्यांना प्रभाव पाडता आला नाही हेही खरे.
ट्रम्प यांचा ओसरता प्रभाव
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, कारण पारंपरिक वयस्कर व ग्रामीण गोऱ्या मतदारांप्रमाणेच त्यांना लॅटिनो, आफ्रिकन युवा मतदारांनी पाठिंबा दिला होता. ताज्या निवडणुकीत हा आफ्रिकन, लॅटिनो, आशियाई युवा मतदारांचा वर्ग डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकलेला दिसून आला. अमेरिकेत पुढील वर्षी मध्यावधी निवडणुका होत आहेत, ज्या व्हाईट हाऊसमधील सत्ताधारी पक्षाला नेहमीच प्रतिकूल ठरतात. तसे झाल्यास डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रभाव आणि उत्साह वाढेल. उलट ट्रम्प यांच्याशिवाय पर्याय शोधता न आल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये गोंधळ निर्माण होईल. ती ट्रम्प यांच्या पराभवाची नांदी ठरेल. त्यामुळेच तिसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवण्यासाठी ते जंग जंग पछाडत आहेत.
