अमेरिकेने जपानवर पहिला अणुबॉम्ब टाकून या क्षेत्रात आघाडी घेतली होती. त्याच दरम्यान सोव्हिएत युनियनमध्येही अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. सोव्हिएत युनियनने मॅनहटन प्रकल्पातून हेरगिरी करून काही माहिती मिळवली होती. जोडीला त्यांचे स्वत:चे संशोधन होतेच. त्यातून सोव्हिएत युनियनने २९ ऑगस्ट १९४९ रोजी मध्य आशियातील सोमिपलाटिन्स्क येथे त्यांच्या पहिल्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. अणुबॉम्बमधील शृंखला अभिक्रिया जशी थांबवता येत नाही तशीच आता ही शस्त्रस्पर्धाही थांबवणे अवघड होते.

अणुबॉम्बमध्ये युरेनियम किंवा प्लुटोनियमसारख्या जड धातूच्या केंद्रकाचे न्यूट्रॉन्सचा मारा करून विखंडन केले जाते आणि त्यातून ऊर्जा बाहेर पडते. हायड्रोजन बॉम्बमध्ये त्याच्या उलट प्रक्रिया होते. त्यात हायड्रोजनचे अणू अतिदाब आणि उष्णतेखाली एकत्र करून त्याचे हेलियममध्ये रूपांतर केले जाते. म्हणजेच अणूंचे मीलन होते. त्यातून अणुविखंडनापेक्षा अधिक ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली असतो. हायड्रोजन बॉम्बला थर्मोन्यूक्लिअर वेपन असेही म्हणतात.

हायड्रोजन बॉम्बची रचना अणुबॉम्बच्या तुलनेत थोडी अधिक प्रगत असते. दोन अणू एकत्र करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. हायड्रोजन बॉम्बमध्ये अणुमीलनासाठी लागणारी प्राथमिक ऊर्जा अणुविखंडनातून किंवा अणुस्फोटातून मिळवली जाते. या पहिल्या अणुस्फोटामुळे तयार झालेल्या उष्णता आणि दाबाने हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होते. त्यातून आणखी जास्त ऊर्जा बाहेर पडते. हायड्रोजन बॉम्बमध्ये हायड्रोजनची डय़ुटेरियम आणि ट्रिटियम ही समस्थानिके वापरली जातात.

अमेरिकेत एडवर्ड टेलर या शास्त्रज्ञाच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रमन यांनी १९५० मध्ये हायड्रोजन बॉम्ब बनवण्यासाठी मान्यता दिली. अमेरिकेने ८ मे १९५१ रोजी एनिवेटॉक बेटावर पहिला थर्मोन्यूक्लिअर स्फोट घडवला. सोव्हिएत युनियनने १२ ऑगस्ट १९५३ रोजी पहिला थर्मोन्यूक्लिअर स्फोट घडवला. अमेरिकेने १ मार्च १९५४ रोजी बिकिनी अटॉल येथे हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. त्याची शक्ती १५ मेगाटन इतकी होती.

पहिला अणुबॉम्ब हा सर्वात शक्तिशाली पारंपरिक बॉम्बपेक्षा १००० पट शक्तिशाली होता. पहिला हायड्रोजन बॉम्ब सुरुवातीच्या अणुबॉम्बपेक्षा १००० पटीने जास्त ताकदवान होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या दशकात बॉम्बची संहारकता १० लाख पटींनी वाढली होती. शस्त्रांच्या विकासातील पल्ला, अचूकता आणि संहारकता या निकषांमधील संहारकतेची अत्युच्च पातळी हायड्रोजन बॉम्बमुळे गाठली गेली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com