16 January 2021

News Flash

अष्टविनायकमधील तिसरा गणपतीः सिद्धटेक सिद्धिविनायक

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.

| September 11, 2013 03:00 am

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते. उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोवळे फार कठिण असते. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी ५ कि.मी चालावे लागते.
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.
स्थान- पो. जलालपूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर
अंतर- सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने गाडीने थेट मंदिरापर्यंत जाता येते.
दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 3:00 am

Web Title: ashtavinayak siddhatek siddhivinayak ganpati
टॅग Ganesh Utsav
Next Stories
1 सोसायटय़ांचा गणेशोत्सवही दिमाखात!
2 आखाती देशांमध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धा
3 सिद्धटेक येथे उत्साहात गणेशजन्म सोहळा
Just Now!
X