मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेणारा लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय ही मुख्य भूमिका साकारत आहे. गणेशोत्सवाबद्दलचे त्याचे विचार वेगळे आहेत. आपलं घर, भवताल ते निसर्ग सर्वत्र गणरायाचा वास आहे.  देव चराचरांत आहे अशी त्याची ठाम धारणा आहे. त्याने त्याच्या मुलाचे नाव देखील ऋग्वेद ठेवले आहे. गणपती हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. तो प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतो, असं शशांक म्हणाला.

हेही वाचा >>> “देवाने सांगितलं नाहीये की…”, गणेशोत्सवातील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टच बोलला शशांक केतकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने सगळय़ांना एकत्र आणणारा सण आहे असं तो मानतो. ‘गणपतीच्या आगमनानिमित्त सगळे नातेवाईक घरी येतात. घरात आणि आजूबाजूलाही प्रसन्न वातावरण असते. माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती बसतो. त्याच्या आगमनासाठी काही दिवस आधीपासूनच घरात स्वच्छतामोहीम सुरू होते. संपूर्ण घर स्वच्छ करून घेतले जाते. लगोलग घरी मोदकांची तयारी सुरू झालेली असते. गेली ७० वर्षे झाली आम्ही घरी गणपती बसवतो आहोत. माझे आजोबा, त्यानंतर बाबा, सध्या मी आणि आता माझा मुलगा ऋग्वेद अशी आमची चौथी पिढी गणरायाच्या सेवेत मग्न आहे, असं शशांक म्हणाला. शशांकने आजोळी आणि वडिलांच्या घरीही लहानपणापासून गणेशोत्सवाचा आनंद अनुभवला आहे. ‘माझ्या दोन्ही आजोबांची गणपतीवर फार श्रद्धा होती. माझ्या आईचे वडील हे साताऱ्याचे आहेत. तिथे त्यांच्या घराशेजारी गणपतीचा कारखाना होता, त्यामुळे लहान असताना मी तिथे रमायचो. तसंच माझ्या बाबांच्या वडिलांचाही मुंबईत स्वत:चा गणपतीचा कारखाना होता. त्यांच्या काळात ते साच्याचा वापर न करता पाच फूट उंच गणपतीची मूर्ती स्वत:च्या हातांनी घडवायचे. त्यामुळे कलेचे ज्ञान मला त्यांच्याकडून मिळाले. लहानपणी अनेकदा त्यांना मूर्ती घडवताना पाहिले आहे. मला मूर्ती घडवता येत नसली तरी ती मूर्ती घडवताना मदत करायला मला नेहमी आवडतं’, अशी लहानपणीची आठवणही त्याने सांगितली.