अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.
श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
थेऊर – चिंतामणी
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.
कपिल मुनींच्याजवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते. गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नांच्या साहाय्याने त्यास पंचपक्वानांचे भोजन दिले. हे पाहून गणासूर स्तंभित झाला व त्यास त्या रत्नाचा मोह निर्माण झाला, त्याने कपिलमुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार देताच त्याने त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले. कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले. कपिल मुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथे विनायकास चिंतामणी संबोधले जाऊ लागले व या नगरीस कदंबनगर म्हणू लागले.
पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
स्थान- ता.हवेली, जि.पुणे
अंतर- थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. थेऊर फाटा ते थेऊर ५, मुंबई १९१ कि.मी