Ashtavinayaka : अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाचे गणपती होय. गणपतीची ही आठ मंदिरे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वसलेली आहेत. अष्टविनायकांतील प्रत्येक गणपतीला आणि त्या मंदिराला स्वतंत्र इतिहास व महत्त्व आहे. या अष्टविनायकांतील गणपती पुणे, रायगड व अहमदनगर जिल्ह्यात आहेत. दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात. या यात्रेदरम्यान हे गणेशभक्त आठ मानाच्या गणपतींचे दर्शन घेतात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
मोरगाव : श्री मयूरेश्वर
अष्टविनायकांतील पहिला मानाचा गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील मोरेश्वर या गावी गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेला हा गणपती अनेकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आणि जुना आहे. गावाच्या मध्यभागी बांधलेले हे मंदिर बहामनी काळात बांधले गेले होते. काळ्या दगडापासून बनविलेले हे मंदिर संरक्षणाच्या दृष्टीने खूप मजबूत आहे. या मंदिरातील मयूरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक असून, मस्तकावर नागराजाचा फणा आहे. दर दिवशी हजारो भाविक या मंदिराला भेट देतात.
थेऊर : श्री चिंतामणी
अष्टविनायकांपैकी एक असलेला गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी होय. थेऊर येथे कदंब वृक्षाखाली श्री गणेशाचे मंदिर आहे. भक्तांच्या चिंता दूर करणारा हा गणपती आहे म्हणून याला चिंतामणी म्हणतात. श्री गणेशाची येथील मूर्ती स्वयंभू आहे.
जर तुम्हाला थेऊरला जायचे असेल, तर तुम्हाला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात जावे लागेल. पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावरच आणि पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर हे गाव आहे.
असे म्हणतात की, थेऊरचा विस्तार करण्यात पुण्यातील पेशव्यांचा खूप मोठा वाटा आहे. पेशवे हे गणरायाचे मोठे भक्त होते. ते नेहमी थेऊरला जायचे.
सिद्धटेक : सिद्धिविनायक
सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे आहे. येथे सिद्धिविनायकाची स्वयंभू मूर्ती आहे. अष्टविनायकांतील सर्व सात गणपतींची सोंड डाव्या बाजूला आहे; पण एकमेव अशा या सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची सोंड उजव्या बाजूला आहे. या गणपतीने मांडी घातली आहे आणि त्याच्या मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत.
या मंदिरालाही खूप प्राचीन इतिहास लाभला आहे. टेकडीवर असलेल्या या मंदिराचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला होता; तर हे देऊळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात बांधले होते.
रांजणगाव : महागणपती
अष्टविनायकांपैकी सर्वांत शक्तिमान समजला जाणारा गणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती होय. हा महागणपती स्वयंभू असून, या गणेशाला १० हात आहेत. प्रसन्न आणि रमणीय अशा या स्थळी महागणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येतात. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे मानले जाते. या महागणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे आहे.
ओझर : विघ्नहर
अष्टविनायकांतला मानाचा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. कोणत्याही कामातील विघ्न दूर करणारा गणपती म्हणून याची ओळख आहे. दर दिवशी हजारो भाविक श्रद्धेने या गणपतीचे दर्शन घ्यायला येतात. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात असलेल्या ओझर येथे हे सुंदर मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधले होते आणि त्यावर सोनेरी कळस चढविला होता. गणेशभक्त या विघ्नहर्त्याला खूप मानतात.
लेण्याद्री : गिरीजात्मज
अष्टविनायकांतील लेण्याद्रीचा गिरीजात्मज गणपतीचे स्थान डोंगरात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती आणि पार्वतीचा आत्मज म्हणजे पुत्र म्हणून याला गिरीजात्मज असे नाव देण्यात आले आहे. निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर एक उत्तम प्रेक्षणीय स्थळसुद्धा आहे. अष्टविनायकांतील हा एकमेव गणपती आहे; ज्याचे वास्तव्य एका गुहेत आहे. या गुहेला गणेश लेणीसुद्धा म्हणतात. हे मंदिर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील गोळेगावजवळ स्थित आहे.
महाड : वरदविनायक
अष्टविनायकांतील एक गणपतीचे मंदिर महाड येथे आहे. वरदविनायक मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर रायगड जिल्ह्यात खोपोलीजवळ आहे. भक्तांना मनाप्रमाणे वर देणारा गणपती म्हणून याचे नाव ‘वरदविनायक’ असे ठेवण्यात आले. अनेक जण महाडचा गणपती म्हणूनही या ‘वरदविनायक’ला ओळखतात.
पाली : बल्लाळेश्वर
बल्लाळेश्वरचा गणपती अष्टविनायकांतील एक स्वयंभू स्थान आहे. रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील पाली येथे हे मंदिर वसलेले आहे. या तीर्थक्षेत्राला दर दिवशी हजारो भाविक दर्शनाला येतात. बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी गणपतीच्या दिवसांमध्ये प्रचंड गर्दी असते. पूर्वी हे मंदिर लाकडी होते. त्यानंतर नाना फडणवीस यांनी या मंदिराचे रूपांतर दगडी मंदिरात केले. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना तलाव असून, निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेले आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)