गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि जल्लोषात साजरा होणाऱ्या उत्सवांपैकी एक. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पुणं शहर चैतन्य आणि उत्साहाने उजळून निघतं. शहरातील मध्यवर्ती पेठांपासून गल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मंडळ बाप्पाची स्थापना करून विविधरंगी सजावट आणि देखावे उभारतात. कुठे फुलांची नयनरम्य सजावट असते, तर कुठे दिव्यांची रोषणाई. काही मंडळं भव्य मंदिरांच्या प्रतिकृती तयार करतात, तर काही पौराणिक कथांवर आधारित जिवंत देखावे साकारतात.
दरवर्षी महाराष्ट्राच्या शौर्यगाथा आणि पौराणिक परंपरांना उजाळा देणारे हे जिवंत देखावे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. गेल्या वर्षी पुण्यात पहिल्यांदा ‘शिव-पार्वती विवाह सोहळा’ सादर करण्यात आला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यंदाही पुणेकरांसाठी खास आकर्षण तयार करण्यात आलं आहे. यंदा पहिल्यांदाच ‘खंडोबा-बानू विवाह सोहळा’ जिवंत देखाव्याच्या स्वरूपात रंगणार आहे. विशेष म्हणजे हा अनोखा देखावा एक नव्हे तर दोन मंडळं सादर करत आहेत. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाला यंदा एक आगळंवेगळं आणि भव्य स्वरूप लाभणार आहे
गेल्यावर्षी नवजवान मित्र मंडळाने कैलास पर्वतावरील शिव-पार्वती विवाह सोहळ्याच्या या जिवंत देखाव्याचे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यानंतर हा देखावा पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पुणेकरांना हा देखावा प्रंचड आवडला होता. यंदा याच मंडळाने खंडोबा आणि बानु विवाह सोहळा सादर केला आहे. गेल्यावर्षी शिव पार्वती सोहळ्यामध्ये जशी नंदीवर बसलेल्या शिवाचे आगमण झाले होते त्याप्रमाणे यंदा खंडेरायाचे आगमण पांढऱ्या घोड्यावरून होणार आहे. गेल्यावर्षी शिव पार्वती विवाह सोहळ्यामध्ये जसे भस्म उधळत होते तसाच यंदा भंडारा (हळद) उधळताना दिसत आहे. शिव पार्वती विवाह सोहळ्यात जसे सर्व शिवगण आणि देवांची उपस्थिती दिसत होती तशीच यंदाही भक्तगण विवाहसोहळ्याला उपस्थित असल्याचे दाखवले आहे. बानु आणि खंडेरायाच्या विवाहाचा सुंदर क्षण भक्तांना पाहता येणार आहे.
खंडोबा आणि बानु विवाह सोहळा यंदाही लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे पुण्यातील दोन मंडळाने एकच देखावा सादर केला आहे त्यामुळे पुणेकरांचा उत्साह आणखी वाढला आहे. संयुक्त जवान मंडाळाने जय मल्हार देखावा सादर केला आहे ज्यामध्ये बानु आणि खंडेरायाचा विवाह सोहळा पार पडताना पाहायला मिळत आहे. नवजवान मित्र मंडळाचा देखावा तुम्हाला सदाशिव पेठेत पाहाता येईल तर संयुक्त जवान मंडळाचा देखावा तुम्हाला नवी पेठेत लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर पाहता येईल. पुणेकरांना मग वाटल कसली पाहात आहात आजच या मंडळाना भेट द्या.
