भाईंदर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील गणपती दुबईकडे रवाना झाले आहेत. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मोरगाव येथील श्री मयुरेश्वराची प्रतिकृती मोठ्या उत्साहात भाईंदरहून दुबईला रवाना करण्यात आली आहे.
दुबईतील रसेल खेमा येथे विला क्र. ५-बी या निवासस्थानी,मूळचे हैदराबादचे असलेली रामराम पवार यांच्या घरी श्री मयुरेश्वर दहा दिवसांसाठी विराजमान होणार आहेत.
भाईंदरच्या श्री गणराज कला मंदिराचे कुशल मुर्तिकार शंकर तेंडुलकर यांनी ही मूर्ती साकारली आहे. अत्यंत बारकाईने केलेले शिल्पकाम, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक रुप असलेल्या या मूर्तीचे दुबईतही स्वागत होणार असून गणेशभक्तांना मातृभूमीशी जोडणारा आध्यात्मिक धागा निर्माण होईल, असा विश्वास मूर्ती रवाना करताना उपस्थितीत असलेले महापालिकेचे माजी विरोधी नेते असिफ शेख यांनी व्यक्त केला आहे.