Lalbaugcha Raja Visarjan 2025: देशभरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला, यानंतर सर्वत्र लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र लालबागचा राजा गणेश मूर्तीचं विसर्जन कित्येक तास उलटूनही झालेलं नव्हते. ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली. तर आज सुमारे ३३ तासांनंतर अखेर ७ सप्टेबर रात्री ९ च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन पूर्ण झाले.

लालबाग परळ परिसरात असलेला लालबागचा राजा हा जगभरातील भाविकांचे आकर्षण असतो. येथे दर्शनासाठीच नव्हे तर आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने लाखो भाविक येथे येतात. दरम्यान यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय झालं?

लालबागचा राजा काल सकाळी १० वाजता मंडपातून निघाला होता. तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता. त्यानंतर आरती होऊन दीड-दोन तासात गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे लालबागचा राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन लांबले . यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट होता.

ओहटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो आणि भरतीच्यावेळी त्याचे विसर्जन केले जाते. मिरवणूक चौपाटीवर पोहचण्यास १० ते १५ मिनिटं उशिर झाला. त्यामुळे मिरवणूक भरती सुरू झाल्यावर तेथे पोहचली. यामुळे दिवसभर विसर्जनासाठी वाट पाहावी लागली. अखेर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

मंडळाकडून दिलगिरी व्यक्त

लांबलेल्या मिरवणुकीबाबात मंडळाचे पदाधिकारी सुधिर साळवी यांनी माध्यमांना माहिती दिली होती. “लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक सुमारे २३ तास चालली. सकाळी ८.३० ला आम्ही पोहचलो होतो. अरबी समद्राची भौगोलिक परिस्थिती लवकर आली कारण गेल्या तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडतो आहे. आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला विसर्जनाचा. पण लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तराफ्यावरुन नेऊनच आम्ही विसर्जन करतो. आम्ही त्याच पद्धतीने विसर्जनाचा निर्णय घेतला. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरती लवकर आली आणि आम्हाला १५ मिनिटं उशीर झाला. सगळ्या माध्यमांनी भावनिक आणि श्रद्धेच्या क्षणात तुम्ही सगळे उभे राहिलात. मी सगळ्यांचे आभार मानतो.” असं सुधीर साळवी म्हणाले होते.