Lalbagucha Raja : लालबागचा राजा गणेश मूर्तीचं विसर्जन कित्येक तास उलटूनही झालेलं नाही. मुंबईकरांचा लाडका गणपती आणि नवसाला पावणाारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली. लालबाग ते गिरगाव हे अंतर १० किमीचं आहे. गिरगाव चौपाटीवर राजाची मिरवणूक येण्यासाठी २२ तास लागले. दरम्यान आता १२ ता तास उलटूनही राजाचं विसर्जन झालेलं नाही. राजाला तराफ्यावर आरुढ करणं हे मोठं आव्हान होतं. आता काही वेळापूर्वीच लालबागचा राजा तराफ्यावर विराजमान झाला. मात्र विसर्जन सोहळा सुरु होण्यासाठी रात्रीचे १०.३० वाजतील असं मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितलं.

लालबागचा राजा तराफ्यावर आरुढ झाला आणि गणेश भक्तांनी जल्लोष केला

लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर आरुढ होत नसल्यामुळे गेल्या अनेक तासांपासून हा गणपती समुद्रात चार ते पाच फूट पाण्यात बसून होता. यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेशभक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटले आहे. किनाऱ्यावर असलेले अनेक भक्त लालबागचा राजाची विनवणी करत आहेत. आमच्याकडून काही चुकलं-माकलं असेल तर माफ कर, यापुढे तुझ्या सेवेत हयगय होणार नाही, अशी याचना भक्तांकडून केली जात आहे. यावेळी लालबागचा राजा विसर्जनासाठी नवा तराफा गुजरातहून आणण्यात आला आहे. मात्र या तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात अनेक अडचणी येत होत्या. काही वेळापूर्वी म्हणजे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास मूर्ती तराफ्यावर आरुढ करण्यात आली. ज्यानंतर गणेशभक्तांनी जल्लोष केला. आता मूर्ती १०.३० च्या सुमारास विसर्जनासाठी मार्गस्थ होईल असं सुधीर साळवींनी सांगितलं.

लालबाग राजा मंडळाचे सुधीर साळवी काय म्हणाले?

“लालबागचा राजा गणपतीची मिरवणूक सुमारे २३ तास चालली. सकाळी ८.३० ला आम्ही पोहचलो होतो. अरबी समद्राची भौगोलिक परिस्थिती लवकर आली कारण गेल्या तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडतो आहे. आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. त्यामुळे आम्ही प्रयत्न केला विसर्जनाचा. पण लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तराफ्यावरुन नेऊनच आम्ही विसर्जन करतो. आम्ही त्याच पद्धतीने विसर्जनाचा निर्णय घेतला. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरती लवकर आली आणि आम्हाला १५ मिनिटं उशीर झाला. सगळ्या माध्यमांनी भावनिक आणि श्रद्धेच्या क्षणात तुम्ही सगळे उभे राहिलात. मी सगळ्यांचे आभार मानतो.” असं सुधीर साळवी म्हणाले.

१०.३० च्या दरम्यान भरती आहे तेव्हा विसर्जन होईल-सुधीर साळवी

सुधीर साळवी म्हणाले, “आम्हा सगळ्यांसाठीच हा वेगळा क्षण होता. आम्ही नियोजन केलं आणि तसं होत नाही असं झालेलं नाही. गणपतीचं विसर्जन थोडं उशिरा होतं आहे पण विसर्जन आता शास्त्रोक्त पद्धतीनेच करतो आहोत. नवीन तराफा आहे, त्यामुळे गणपतीचं विसर्जन सोहळा आता पार पडेल. आता भरती थोडी उशिरा आहे. १०.३० च्या दरम्यान भरती आहे त्यावेळी लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. भरती सुरु असताना विसर्जन करणं आव्हानात्मक होतं. त्यामुळे आम्ही तराफ्याशिवाय विसर्जन करणं शक्य नव्हतं. रात्री साडेदहाच्या दरम्यान विसर्जन होईल.” असं सुधीर साळवी यांनी सांगितलं आहे.