Famous Ganapati Pandals in Mumbai: आजच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरूवात झाली आहे. भारताबरोबरच परदेशातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पा घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झाला आहे.

गणेशोत्सवात मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव म्हणजे भक्तांसाठी पंढरीच. लाखो भाविक दरवर्षी ठीक ठिकाणाहून मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट द्यायला येतात. पण अनेकांना ही मंडळं नेमकी कोणती आहेत, हेच माहित नसतं. लांबचा पल्ला गाठून आलेल्या गणेशभक्तांना मुंबईतील गणेश मंडळांचं आकर्षण असतं. म्हणूनच आज आपण मुंबईतील ७ प्रसिद्ध गणेश मंडळांबद्दल जाणून घेणार आहोत…

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2025)

मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की आपोआप लालबागच्या राजाचं नाव डोळ्यासमोर येतं. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. या लालबागच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते, त्याच ठिकाणी ती साकारली जाते.

मूर्ती साकारण्यापूर्वी त्या ठिकाणी विधिवत पूजा केली जाते, असे म्हणतात. १९३१ रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती, त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाली तर गणपती बसवू, असा नवस केला आणि त्याप्रमाणे १९३४ साली लालबाग बाजारपेठेत गणपती बसवण्यास सुरुवात झाली. आजही लाखो भक्त मुख दर्शनासाठी तर अनेकजण नवस करून चरणदर्शणासाठी मोठ मोठी रांग लावून याठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात.

लालबागच्या राजाला कसं जायचं? (LalbaugRaja How to Reach)

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग मार्केट, श्री गणेश नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परळ, मुंबई ४०००१२

१. रेल्वे (लोकल ट्रेन)

  • सेंट्रल लाईनवरून आल्यास परळ (Parel) स्टेशनला उतरा. वेस्ट साईडने बाहेर पडून चालत १०–१५ मिनिटांत पोहोचता येते.
  • हार्बर लाईनवरून आल्यास चिंचपोकळी किंवा परळ स्टेशन सोयीचे आहे.
  • वेस्टर्न लाईनवरून आल्यास लोअर परेल स्टेशनवर उतरून १० मिनिटांत चालत जाता येते.

२. बस

BEST बसमार्गावर ‘लालबाग’ स्टॉप आहे. तिथे उतरून चालत जाता येते.

३. टॅक्सी

दादर, परळ, लोअर परेल, महालक्ष्मी या जवळच्या भागांतून थेट टॅक्सीने जाता येते.

मुंबईचा राजा (Mumbaicha Raja Ganesh Galli cha Raja)

मुंबईचा राजा म्हणून ओळखली जाणारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेशमूर्ती खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी काही ना काही आगळीवेगळी सजावट येथे पाहायला मिळते. १९२८ साली गणेश गल्लीत लालबाग-परळमधील गिरणी कामगारांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व गणेश गल्ली मंडळाने येथे २२ फूट उंचीची गणेशमूर्ती बसवली. तेव्हापासून दरवर्षी येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. “बोल बोल… २२ फूट वाले की जय!” अशा जयघोषात मुंबईच्या राजाचं आगमन होतं.

गणेश गल्लीला कसं जायचं? (Mumbaicha Raja Location How to Reach)

लालबागच्या राजाला जाण्यासाठीचा मार्ग आणि हा मार्ग सारखाच आहे. जर तुम्ही लालबागचा राजा बघायला गेलात तर फक्त २–३ मिनिटं चाललं की तुम्हाला मुंबईचा राजा – गणेश गल्लीतील गणपतीचे ठिकाण दिसेल.

गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली, लालबाग, परळ, मुंबई – ४०००१२

चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokli Chintamani)

चिंचपोकळीचा चिंतामणी ही गणेशमूर्ती मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना ६ सप्टेंबर १९२० रोजी झाली. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. हे मंडळ मुंबईतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी येतात.

चिंचपोकळी चिंतामणीला कसं जायचं? (Chinchpokli Chintamani Address)

चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – ४०००१२

चिंचपोकळी स्टेशनच्या अगदी समोरच ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा मंडप आहे.

राजा तेजुकायाचा (Raja Tejukayacha , Lalbaug)

१९४७ साली तेजुकाया मेन्शन गणपती मंडळाची स्थापना झाली या मंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीवर कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे अनेक जण गणरायाची ही मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात.

कसं जायचं? (Tejukaya Ganpati Address)

परळ स्टेशनवरून १० मिनिटं चाललं की “राजा तेजुकायाचा, लालबाग” हे गणपती मंडळ दिसेल. हे मंडळ लालबागचा राजा आणि गणेश गल्लीच्या जवळच आहे.

परळचा राजा (नरे पार्क) (Parel cha raja)

परळचा राजा हा मुंबईतील एक मानाचा गणपती मानला जातो. ज्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी म्हणजेच १९४७ साली या गणपती मंडळाची स्थापना झाली आणि येथे गणपती बसवण्यात आला. या गणेशमूर्तीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा म्हणूनसुद्धा ओळखले जाते.

परळचा राजा – नरे पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरे पार्क, एलब्लॉक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परळ, मुंबई – ४०००१२. परळ स्टेशनवर उतरलात की फक्त १० मिनिटं चाललं की “परळचा राजा – नरे पार्क” गणपतीचा मंडप सहज दिसतो.

जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल (GSB Ganpati)

माटुंगा येथील जीएसबीच्या गणेशमूर्तीला सर्वांत धनाढ्य गणपती म्हणून ओळखले जाते. जीएसबी सेवा गणेश मंडळाचा हा गणपतीही मुंबईतील मानाचा गणपती आहे. १९५५ मध्ये कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. या गणेशमूर्तीला शुद्ध सोन्याची आभूषणे घातली जातात. गणपतीची ही मूर्ती साकारतानासुद्धा सोन्याचा वापर केला जातो. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी ही मूर्ती सजवली जाते.

कसं जायचं? (पत्ता)

जीएसबी सेवा मंडळ गणपती, शीव (किंग्स सर्कल) वडाळा, मुंबई – ४०००२२

(मंडप बहुतेक वेळा किंग्ज सर्कलच्या आर्य समाज हॉलजवळ उभारला जातो.)

१. रेल्वे (लोकल ट्रेन)

हार्बर लाईन: किंग्ज सर्कल (King’s Circle) स्टेशनवर उतरलात की अगदी चालत २–३ मिनिटांत मंडप आहे.
सेंट्रल लाईन: माटुंगा किंवा सायन (Sion) स्टेशनवर उतरून ५–७ मिनिटांत चालत जाता येते.
वेस्टर्न लाईन: दादरवर उतरून हार्बर लाईनला बदल करून किंग्ज सर्कलला उतरावे.

२. बस (BEST)

किंग्ज सर्कल किंवा शीव बसथांब्यावर उतरलात की थेट मंडप गाठता येतो.

टॅक्सी

दादर, शीव, माटुंगा, वडाळा या भागांतून थेट टॅक्सीने जाता येते.

किंग्ज सर्कल स्टेशनजवळच जीएसबी गणपतीचा मंडप आहे. रेल्वे स्टेशनवरून २–३ मिनिटं चाललं की थेट दर्शनाला पोहोचता येते.

केशवजी नाईक चाळ, गिरगाव (Keshavji Naik Chawl Ganpati Girgaon)

मुंबईतील सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी एक म्हणजे केशवजी नाईक चाळीतील गणपती मंडळ. अत्यंत पारंपरिक आणि साधेपणाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीचे आगमन नेहमी पालखीतूनच होते आणि विसर्जनासाठीही पालखीच वापरली जाते. हे मंडळ पर्यावरणानुकूल उत्सव साजरा करतात. कित्येक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपून ठेवली आहे.

कसं जायचं?

केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, केशवजी नाईक चाळ, गिरगाव, मुंबई – ४००००४

१. रेल्वे (लोकल ट्रेन)

वेस्टर्न लाईन: चर्नी रोड (Charni Road) स्टेशनवर उतरा. तिथून चालत ५–७ मिनिटांत चाळ परिसर गाठता येतो.
सेंट्रल लाईन दादर स्टेशनवर उतरून वेस्टर्न लाईनने चर्नी रोड स्टेशनला जा
हार्बर लाईन: CST (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वर उतरून टॅक्सीने १०–१२ मिनिटांत पोहोचता येते.

२. बस (BEST)

“गिरगाव चौपाटी” किंवा “ओपेरा हाऊस” जवळचे बसथांबे आहेत. तिथून काही मिनिटांत चाळीपर्यंत चालत जाता येते.

टॅक्सी

मुंबई सेंट्रल, दादर, CST, चर्चगेट या भागांतून टॅक्सीने सहज पोहोचता येते.

चर्नी रोड स्टेशनपासून चालत ५ मिनिटे अंतरावरच “केशवजी नाईक चाळ गणपती” आहे.