7500 Religious Texts Embodied Ganapati Bappa: आज (२७ ऑगस्ट) देशभरात सर्वत्र गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सकाळपासूनच सर्वत्र गणपतीचे जयघोष सुरू आहेत. मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. घरांमध्येही गणेश आगमनाची तयारी सुरू आहे. गणेशाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत आहे.
दरम्यान, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशभरात विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. अशात चेन्नईतील मनाली परिसरात ७५०० धर्मग्रंथांचा वापर करून गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. यामध्ये ५००० भगवद्गीता, १५०० वेल विरुत्तम (भगवान मुरुगन यांना समर्पित एक तमिळ काव्यग्रंथ) आणि १००८ मुरुगन कावसम या ग्रंथांचा समावेश आहे.
गणेश चतुर्थी निमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुण्यातही मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधानांकडून शुभेच्छा
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तीचा हा शुभ प्रसंग सर्वांसाठी मंगलमय जावो. मी भगवान गजाननाला सर्व भक्तांना आनंद, शांती आणि चांगले आरोग्य देवो अशी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया!”
दुसरीकडे गुजरातच्या वडोदरामध्ये पाणीगेट मांडवी रस्त्यावर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना अटक करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
यातील दोन प्रौढ आरोपींवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि अपमान करण्याच्या उद्देशाने मूर्तींची विटंबना केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अल्पवयीन मुलाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वडोदरा शहराच्या सहपोलीस आयुक्त डॉ. लीना पाटील यांनी सांगितले की, विविध पोलीस पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.