Reason Immersion of Ganpati on One and Half, Fifth and Sixth Day : गणेशोत्सव २०२५ ला उत्साहात सुरुवात झाली आहे. घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. लाडक्या बाप्पासाठी सुंदर मखर अन् फुलांची आरास करून, एकापेक्षा एक अफलातून सजावट केली जाते. मोदक तयार केले जातात. घराला तोरण बांधलं जातं, दारासमोर रांगोळी काढली जाते. पारंपरिक कपडे परिधान केले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण उत्साहात गणरायाचं स्वागत करतात. फक्त घरातचं नव्हे तर मंडळाद्वारेदेखील सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणरायाच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त जोरदार तयारी करतात. अगदी वर्गणी गोळा करण्यापासून ते ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन आणि विसर्जन होईपर्यंत गणेशभक्त सर्व काही करतात.

दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन?

सहसा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत १० दिवस बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान होतात. काही जण दीड दिवस, काही जण पाच दिवस , काही जण सात तर काही जण दिवसांनी गणरायाचं विसर्जन करतात. असे करण्यामागे काही कारण आहे का? असा प्रश्न सर्वांच्या मनात येत असावा. या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

सर्वांना गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साहात सहभाही व्हायचं असतं; पण सध्या नोकरी, शाळा-महाविद्यालय आणि इतर धावपळीमध्ये अनेक जण फक्त दीड दिवसात गणपतीचं विसर्जन करतात. पण, ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामागील कारण वेगळं आहे आणि त्याचा संबंध शेती आणि शेतकऱ्यांशी जोडला जातो. चला तर मग जाणून घेऊ या दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट’

‘दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट’

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाबाबत प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीदरम्यान शेतांमध्ये धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणीमातेचे आभार मानण्याची पद्धत आहे. धरणीमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी बांधावरच गणरायाची मातीची मूर्ती तयार करून, तिची पूजा केली जात असे. सुरुवातीला पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जात असे. पण, नंतर काळानुसार या परंपरेमध्ये बदल होऊ लागला. काही जण सुबक मूर्ती तयार करून घरी आणू लागले आणि तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर मूर्ती नदीत विसर्जन करीत. हळूहळू दीड दिवसाच्या गणपती पूजनाची पद्धत सुरू झाली. पण, अजूनही अनेक गावांमध्ये चतुर्थीच्या दिवशीच गणेशमूर्तीचं विसर्जन करतात. अजूनही काही ठिकाणी ही प्रथा कायम आहे.

हेही वाचा- “खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली….”पुण्यात पहिल्यांदाच खंडोबा-बानु विवाह सोहळा! कुठे पाहता येईल हा जिवंत देखावा?

पाचव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यामागचे कारण

याबाबत अवधूत शेंबेकर गुरुजी यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, “गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण, उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी करतात.

बऱ्याच लोकांना वाटते की, गणेशाची प्राणप्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते; तर तसे नाही. काही ठिकाणी प्रतिप्रदेला गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे १० दिवस गणेशोत्सव साजरा होतो.

हेही वाचा – Ganesh Chaturthi History and Significance : काय आहे गणपती बाप्पाच्या जन्माची कथा? का साजरी करतात गणेश चतुर्थी? जाणून घ्या गणेशोत्सवाचे महत्व

गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते? जाणून घ्या त्यामागचे कारण

काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीसह गणेशमूर्तीचेही विसर्जन केले जाते; तर काही जणांकडे पाचव्या दिवशी गौरीचे विसर्जन झाल्यानंतर, सातव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. याबाबत शेंबेकर गुरुजी यांनी सांगितले की, “गौरी आणि गणपती वेगवेगळ्या देवता आहेत. गौरीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रानुसार होते. ज्या नक्षत्रामध्ये त्यांचे आगमन होते, त्याच्या पुढच्या नक्षत्राला त्यांचे विसर्जन होते. अनुराधा नक्षत्राला गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्राला तिचे विसर्जन होते. नक्षत्र कधी कधी पुढे-मागे होतात; त्यानुसार कधी हे विसर्जन पाचव्या दिवशी होते; तर कधी सातव्या दिवशी होते.”

.