लालबागचा राजा गणेश मूर्तीचं विसर्जन २७ तास उलटूनही झालेलं नाही. मुंबईकरांचा लाडका गणपती आणि नवसाला पावणाारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली. लालबाग ते गिरगाव हे अंतर १० किमीचं आहे. गिरगाव चौपाटीवर राजाची मिरवणूक येण्यासाठी १९ तास लागले. दरम्यान २७ तास उलटूनही राजाचं विसर्जन झालेलं नाही. नेमकं काय घडलं जाणून घेऊ.
लालबागचा राजा गणेश मूर्ती तराफ्यावर चढत नसल्याने विसर्जनाला उशीर
लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर चढत नसल्यामुळे गेल्या साडेतीन तासांपासून हा गणपती समुद्रात चार ते पाच फूट पाण्यात बसून आहे. यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेशभक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दाटले आहे. किनाऱ्यावर असलेले अनेक भक्त लालबागचा राजाची विनवणी करत आहेत. आमच्याकडून काही चुकलं-माकलं असेल तर माफ कर, यापुढे तुझ्या सेवेत हयगय होणार नाही, अशी याचना भक्तांकडून केली जात आहे. यावेळी लालबागचा राजा विसर्जनासाठी नवा तराफा गुजरातहून आणण्यात आला आहे. मात्र या तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत.
राजाची मिरवणूक शनिवारी सकाळी १० वाजता सुरु झाली
राजा काल सकाळी १० वाजता मंडपातून निघाला होता. तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता. त्यानंतर आरती होऊन दीड-दोन तासात गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे लालबागचा राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन लांबले आहे. यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा वेगळा होता. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट आहे. समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलत आहे. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती हायड्रोलिक्सने वर घेण्यात अडचण येत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून लालबागचा राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही लालबागचा राजा तराफ्यावर चढलेला नाही. त्यामुळे गेल्या तीन तासांपासून लालबागचा राजा समुद्रात बसून आहे. समुद्राला भरती असल्यामुळे लालबागचा राजाचा मूर्तीचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला आहे. अशाच अवस्थेत मूर्ती पाण्यात बसून असल्यामुळे गणेशभक्तांच्या मनात कालवाकालव सुरु आहे. आता ओहोटी आल्यानंतर पुन्हा एकदा लालबाग राजाची मूर्ती तराफ्यावर विराजमान करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात येतील.