News Flash

लहान मुलांमधील चंचलता

सिद्धेश क्लिनिकमध्ये आला तो मुळात अभ्यासातील अडचणींमुळे. वजाबाकीऐवजी बेरीज कर, हातचा धरायचा विसरून जा, अशा वेंधळेपणामुळे गुणांवर परिणाम व्हयायला लागला होता.

| September 23, 2014 06:44 am

सिद्धेश क्लिनिकमध्ये आला तो मुळात अभ्यासातील अडचणींमुळे. वजाबाकीऐवजी बेरीज कर, हातचा धरायचा विसरून जा, अशा वेंधळेपणामुळे गुणांवर परिणाम व्हयायला लागला होता. हुशार असूनही पुरेसा यश मिळवू शकत नव्हता. त्याचे जोरात दार ढकलणे आणि तारस्वरात बोलणे माझ्या लक्षात आले होते. अधिक माहिती घेतल्यावर लक्षात आले की एका जागी अभ्यासाला बसणे हेच कठीण काम होते. सतत धावपळ, मस्ती, कधी टेबलवर चढ, तर कधी पलंगावरून उडी मार हे असे अगदी लहान असल्यापासून ते आत्ता चौथीत येईपर्यंत चालूच होते. मी काही विचारले तर प्रश्न पूर्ण ऐकून न घेताच तो उत्तर देत होता. त्याच्या पालकांशी बोलत असताना तो मात्र सतत चुळबूळ करत होता, वस्तू हिसकून घेत होता. शाळेतून सतत तक्रारी येत होत्या पण जोपर्यंत गुण चांगले मिळत होते तोपर्यंत पालकांनी या तक्रारीकडे काणाडोळा केला होता. पण  तेही कमी व्हयायला लागल्यावर आता इलाज शोधायला हवा म्हणून ते आले होते.
वरवर पाहता या अभ्यासातील समस्या वाटू शकतात पण समस्येच्या मुळाशी जाता लक्षात येईल की त्याचे खरे कारण हे अतिचंचलपणा हे असू शकते. सिद्धेशसारखी कितीतरी मुले एका जागी लक्ष केंद्रित न करू शकल्याने अपयशी ठरतात. त्यात बुद्धिमान असतील तरी ठीक नाहीतर सतत दांडगट, मस्तीखोर म्हणून हिणवली जातात. मग कोणी दुसऱ्या मुलाने खोडी काढली तरी शाळेत यांचेच नाव पुढे येते. आधीच एकाग्रतेत अडचण, अस्वस्थ स्वभाव, कमी मार्क आणि त्यातून सतत मिळणारा ओरडा आणि मार याने ती अधिकच चिडचीडी होतात.
एका जागी आवश्यक तेवढा वेळ स्थिर न बसू शकणे, सतत हालचाल करत राहणे, वस्तू हरवणे, दोन माणसे बोलत असताना मध्ये बोलणे, आपली पाळी येईपर्यंत धीर न धरता येणे, लक्ष केंद्रित करायला कठीण जाणे अशी इतर अनेक लक्षणे या चंचल मुलांमध्ये दिसून येतात. अर्थात यात मुलाचे वय आणि त्याच्या बुद्धीनुसार त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षाही लक्षात घ्यायला हव्यात. शिवाय महत्वाचे म्हणजे हे मूल सगळीकडेच जर असे वागत असेल तरच त्याला ही समस्या आहे, असे म्हणता येईल. काही वेळा मुले घरात धुमाकूळ घालतात पण शाळेत विश्वास बसणार नाही इतकी साधी आणि स्थिर असतात. अशा वेळी घरातली इतर परिस्थिती, संगोपनाच्या पद्धती, इतर व्यक्तींचे स्वभाव आणि वागण्याच्या पद्धती तपासून पाहायला हव्या कारण समस्येचे मूळ त्यात सापडण्याची अधिक शक्यता आहे. परंतु जर घर, शाळा, शिकवणी, खेळाचे मदान, मित्रांची घरे, लग्न-मुंजी सारखे प्रसंग अशा वेळीही जर मूल तसे वागत असेल तर समस्येचे कारण अटेंशन डेफिसिट हाइपरॅक्टिविटी डिसॉर्डर हे असू शकते.
समुपदेशन आवश्यक
या समस्येवर औषधी उपचार उपलब्ध आहेत. त्या शिवाय सायकोथेरपी किंवा समुपदेशनाचाही मुलांना आणि पालकांनी खूप उपयोग होतो. या मुलांना कसे हाताळायल हवे हे शाळांनाही माहीत होणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या असंवेदनशील वागणुकीमुळे मुलांचे खूप नुकसान होऊ शकते. समुपदेशनामध्ये हेच शिक्षण पालकांना देखील दिले जाते, नाहीतर मूल मुद्दाम त्रास देते किंवा त्याला अभ्यासात रसच नाही, असे समजून पालक खूप त्रागा करतात आणि स्वत:ची- मुलांची समस्या वाढीस लावतात. मुलांचा आधार बनायला शिकवत असताना पालकांनाही मानसिक आधार देणे, बळ देणे आवश्यक आहे हे विसरून चालणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 6:44 am

Web Title: variability in children
टॅग : Children,Health It
Next Stories
1 तरतरी.. टाळलेलीच बरी!
2 स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर)
3 दमा गैरसमजुतींचा आजार!
Just Now!
X