News Flash

हृदय शस्त्रक्रियेनंतर.?

अ‍ॅजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास.. सध्या हे शब्द आपल्याला नवीन नाहीत. आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा तरी व्यक्ती या हृदयी धडकी भरविणाऱ्या प्रकारांना सामोरा गेलेला असतो. याचे कारण म्हणजे

| September 30, 2014 06:29 am

अ‍ॅजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास.. सध्या हे शब्द आपल्याला नवीन नाहीत. आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा तरी व्यक्ती या हृदयी धडकी भरविणाऱ्या प्रकारांना सामोरा गेलेला असतो. याचे कारण म्हणजे वाढते हृदयविकार. सध्या हृदयरोग्यांचे आणि पर्यायाने हृदयावरील शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र एकदा हृदयविकारावर प्रतिबंधक उपाय केल्यानंतर हा विकार आटोक्यात ठेवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

बायपासनंतर विशेष काळजी
अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर विशेष काळजी घेण्याची गरज नसते, मात्र हृदयाची झडप बदलण्याची किंवा बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिना- दीड महिना खबरदारी घ्यावी लागते, असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शेखर अंबर्डेकर सांगतात. बायपास होते त्या क्षणापासून हृदयाला रक्ताचा पुरवठा वाढत असल्यामुळे हृदय आधीपेक्षा जास्त कार्यक्षम होते. मात्र शस्त्रक्रियेच्या वेळी छातीचे हाड (स्टर्नम) कापल्यामुळे मध्यभागी जी उभी जखम झालेली असते, ती भरून येईपर्यंत फ्रॅक्चरच्या वेळेसारखीच काळजी घ्यावी लागते. हाडांचे दोन्ही तुकडे जुळून हाड एकसंध व्हायला ४ ते ६ आठवडे लागतात. या काळात वाकणे, जड सामान उचलणे टाळण्याचा सल्ला दिला जातो आणि छातीच्या संरक्षणासाठी तिच्याभोवती सुमारे ३ महिन्यांपर्यंत पट्टा बसवला जातो.
बायपास झालेल्या रुग्णाला संपूर्ण विश्रांतीची (बेड रेस्ट) गरज असल्याचा समज अगदी चुकीचा आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला २-३ दिवस अतिदक्षता विभागात आणि त्यानंतर ४ ते ५ दिवस वॉर्डात ठेवले जाते. पहिल्या दिवसापासूनच त्याच्याकडून काही हालचाली करून घेतल्या जातात. एका आठवडय़ाने जखमेचे टाके काढले जातात, तोवर कफ किंवा पाणी साचू नये यासाठी आंघोळीऐवजी स्पंजिंग करण्यात येते. रुग्णालयातून सुटी मिळाली की घरीही हालचाल करण्याचा सल्ला दिला जातो. हृदयविकाराचा तीव्र धक्का आला असेल, तर रुग्णाच्या हालचालीवर थोडे अधिक निर्बंध असतात. एरवी महिना- दीड महिन्यात रुग्ण पूर्वीसारखी कामे करू शकतो. किंबहुना, रुग्णाने डॉक्टरांच्या मदतीने जितक्या लवकर ‘नॉर्मल’ होता येईल, तितक्या लवकर होण्याचा प्रयत्न करायला हवा.

आहार
हृदय शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने तेल- तुपाचा वापर कमी करावा
सिगारेट, तंबाखू, दारू यांचे सेवन टाळावे.
आहारात कोशिंबिरी व भाज्या भरपूर खाव्यात.
मांसाहार करणाऱ्यांनी मटण, अंडय़ाचा पिवळा बलक, कवच असणारे मासे खाणे टाळावे. साधे मासे हृदरोग्यांसाठी सर्वात चांगले आहेत.
एकावेळी भरपूर खाण्यापेक्षा ३-४ तासांनी थोडे-थोडे खाणे अधिक उपयुक्त आहे.
औषधांच्या बाबतीतही काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला प्रामुख्याने ‘पेनकिलर’ औषधे दिली जातात. त्यानंतर हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी जी औषधे दिली जातात, ती रुग्णाने स्वत:हून अजिबात बंद करू नयेत. कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि मधुमेह आटोक्यात ठेवण्याकरता औषधे घेत राहणे व तपासण्या करणे तितकेच गरजेचे आहे.
तेलकट तवंग असलेल्या भाज्या  वज्र्य कराव्यात. बाहेरचे तळलेले पदार्थ तर अजिबात खाऊ नयेत. ते पदार्थ घरी केले तर चालतील.

भाज्या, फळांचा अधिक वापर
शस्त्रक्रियेनंतर मलप्रवृत्ती होणे त्रासदायक ठरते. त्यासाठी काही औषधे घ्यावी लागतात. परंतु केवळ औषधांवरच अवलंबून राहावे लागू नये, म्हणून चोथायुक्त भाज्या व फळे यांचा अधिक वापर करावा. गहू आणि तांदळासोबतच अधूनमधून ज्वारी, नाचणी यासारखी धान्ये वापरावीत. आठवडय़ातून इतर दिवस पोळी खात असाल, तर २ दिवस ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी खावी. मलावरोध टाळण्यासाठी केळी उत्तम. त्याचप्रमाणे फळांचा रस घेण्यापेक्षा चोथा जास्त असलेली मोसंबीसारखी फळे खावीत. सफरचंद, चिकू यासारखी फळे सालीसकट खावीत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ते साखरेवर नियंत्रण ठेवून फळे खाऊ शकतात.

निराश होऊ नका!
हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांच्या मनात आपण पूर्वीसारखे जीवन जगू शकणार नाही म्हणून निराशेची भावना येते. खरेतर त्याच्या हृदयाच्या रक्तपुरवठय़ातील अडथळा दूर झाल्याने ते अधिक कार्यक्षम होते. त्यामुळे कुठल्याही बाबतीत ती व्यक्ती कमकुवत नसते. रुग्णाने व्यायाम सुरू ठेवणे आवश्यक आहे. तथापि, आपल्या क्षमतेपेक्षा जास्तीचा किंवा एखादा नवा व्यायाम सुरू करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रुग्णाने वस्तुस्थितीची जाणीव ठेवून पूर्ववत आपली कामे करण्याच्या दृष्टीने स्वत: प्रयत्न करणे उपयुक्त ठरते, असेही मत डॉ. अंबर्डेकर यांनी व्यक्त केले.

आसने करा नेमाने!
हृदयरोग्यांचे आरोग्य पुन्हा रुळावर येण्यासाठी तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे प्राणायाम. शस्त्रक्रियेनंतर टप्प्या-टप्प्याने आसने करायला हवीत. मनाच्या शांततेसाठी लगेच शवासन सुरू करता येते. पोट साफ राहावे यासाठी फार त्रास न घेता, छातीवर ताण येणार नाही अशारितीने केलेले अर्धपवनमुक्तासन उपयुक्त आहे. शस्त्रक्रिया झाली की हृदयाचा त्रास समूळ नष्ट झाला, असे नसून त्यात पुन्हा छोटे ब्लॉकेजेस होऊ शकतात. त्यामुळे योगतज्ज्ञांच्या सल्ल्याने काही आसने करता येतील. शस्त्रक्रियेनंतर फार चालणे शक्य होत नाही. अशावेळी प्राणायामामुळे फुफ्फुसांची हालचाल होऊन जादा प्राणवायू मिळतो. खबरदारी म्हणून भस्त्रिकासारखे प्राणायाम न करता दीर्घ श्वास घेणे, क्षमतेनुसार रोखणे व सोडणे या क्रिया कराव्यात आणि हळूहळू सवय झाली की त्यांचे प्रमाण वाढवावे, असा सल्ला वैद्य नितीन कामत यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 6:29 am

Web Title: what precaution you should take after heart surgery
टॅग : Health It
Next Stories
1 शहरातील नैराश्यास कारण की..
2 स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर)
3 लहान मुलांमधील चंचलता
Just Now!
X