तुम्ही कधी सकाळी उठल्या उठल्या स्वत:ची उंची मोजून पाहिली आहे? कधीतरी हा प्रयोग करून बघा. सकाळी उठल्यावर लगेच स्वत:ची उंची मोजा आणि संध्याकाळी ती पुन्हा मोजून पहा. उंचीत थोडासा फरक दिसतोय? सकाळी मोजलेली उंची संध्याकाळी मोजलेल्या उंचीपेक्षा किंचितशी जास्त आहे? असे कसे झाले बरे? याचा अर्थ सकाळी आपण संध्याकाळपेक्षा अधिक उंच असतो!
रात्रभर शरीराला विश्रांती मिळत असताना आपल्या मणक्यातील चकत्यांच्या मध्ये वंगण तयार होत असते. दिवसभराच्या दगदगीत सतत उभ्याने काम करावे लागल्यामुळे या चकत्या काहीशा आकुंचन पावतात आणि दोन चकत्यांच्या मध्ये असणारा द्रवपदार्थ थोडा बाजूला सरकतो. त्यामुळे संध्याकाळी शरीराची मोजलेली उंची सकाळी मोजलेल्या उंचीपेक्षा थोडी कमी भरू शकते.