* १९९९ मध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर झालेल्या ६५ वर्षांच्या कुसुमताईंचे शस्त्रकर्म झाले व त्यात कॅन्सरने ग्रस्त असलेला अन्ननलिकेचा भाग काढून टाकला होता. प्रयोगशाळेत या भागाची तपासणी केली असता अन्ननलिकेच्या आसमंतातील िलफ नोड्समध्येही कॅन्सरचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झाल्यावर त्यांना केमोथेरॅपी घेण्याचा सल्ला दिला. परंतु केमोथेरॅपी घेण्यास कुसुमताईंनी नकार दिला व आमच्या प्रकल्पात केवळ आयुर्वेदिक चिकित्सा १० वर्षे नियमितपणे घेतली. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत याची खात्री करून आम्ही त्यांची आयुर्वेदिक औषधेही थांबविण्याचा सल्ला दिला. गेली ५ वर्षे कुसुमताई वर्षांतून एकदा आमच्या दवाखान्यात तपासणीसाठी येतात. आज ८०व्या वर्षीही त्या स्वस्थ आयुष्य जगत आहेत.
* २००९ मध्ये श्रीयुत राणेंना पोळी, भाकरी असे घन अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होऊ लागला. आठवडाभर दुर्लक्ष केले खरे परंतु त्यानंतर वजनही झपाटय़ाने कमी होऊ लागले व चालताना धाप लागू लागली. डॉक्टरांचा सल्ला घेऊन सर्व तपासण्या केल्या तर त्यात अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान निश्चित झाले. कॅन्सर आजूबाजूच्या गाठींमध्ये (िलफ नोड्समध्ये) पसरला होता. शस्त्रकर्मानंतर आमच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात त्यांनी आयुर्वेदिक औषधे सुरू केली व त्यानंतर केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीही घेतली. राणेकाकांना त्यामुळे या चिकित्सा पद्धतींचे दुष्परिणाम कमी झाले. गेली ५ वष्रे कॅन्सरचा पुनरुद्भव झालेला नाही व वजन, भूक, काम करण्याची क्षमता यांतही लक्षणीय सुधारणा झाली आहे.
अन्ननलिकेचा कॅन्सर हा सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये ६व्या क्रमांकाचा मृत्यूचे कारण असलेला कॅन्सर आहे. तसेच आधुनिक चिकित्सा करूनही, केवळ १७ टक्के रुग्णच ५ वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकतात असे सांख्यिकी शास्त्रावरून आढळले आहे. या प्रकारच्या कॅन्सरचे निदान बहुतांशी रुग्णांत उशिरा होत असल्याने व आधुनिक चिकित्सा घेऊनही हा आजार दुर्धर असल्याने रुग्ण अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान झाल्यावर धास्तावलेले असतात.
कारणाशिवाय कार्य होत नाही हा आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळे कोणत्याही व्याधीची संभाव्य कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये दीर्घकाळ व अधिक प्रमाणात धूम्रपान व मद्यपान करणे, अतिशय गरम चहा पिणे, मांसाहार अधिक प्रमाणात सेवन करणे, फळे व भाज्या कमी प्रमाणात आहारात असणे, स्थौल्य, दीर्घकाळ अम्लपित्ताचा आजार असणे ही कारणे आढळून येतात. वयाच्या ६५ वर्षांनंतर व विशेषत: पुरुषांमध्ये या प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळते. याशिवाय आमच्या प्रकल्पातील रुग्णांचा अभ्यास करता दीर्घकाळ हिरवी मिरची, गरम मसाला अधिक प्रमाणात घातलेले तिखट पदार्थ, पाणीपुरी- पावभाजीसारखे जळजळ निर्माण करणारे विदाही पदार्थ, खारवलेले मासे- वेफर्स- फरसाण- लोणचे असे अधिक मीठ असलेले पदार्थ वारंवार व अधिक प्रमाणात सेवन करणे ही कारणेही अनेक रुग्णांत आढळली. याशिवाय भूक व तहान या नसíगक भावना निर्माण झाल्यावरही दीर्घकाळ उपाशी व तहानलेले राहणे, रात्री उशिरापर्यंत जागणे या सवयीही अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या अनेक रुग्णांत आढळल्या. सतत चिंता, संतापी स्वभाव, ताण-तणाव यांचाही विपरीत परिणाम आहाराच्या पचनावर होतो व कॅन्सरला कारणीभूत ठरतो.
अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान झाल्यास आधुनिक वैद्यकशास्त्रात अवस्थांनुसार शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी या चिकित्सांचा अवलंब केला जातो. यात प्राधान्याने अन्न सेवनावरच परिणाम होत असल्याने आणि रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपीचे दुष्परिणाम म्हणून अन्नपचनाची क्रिया त्या काळापुरती अधिकच मंदावत असल्याने रुग्णाला भूक वाढविणारी (दीपन), पचन सुधारणारी (पाचक), वाताचे अनुलोमन करणारी, पित्ताचे शमन करणारी व बलवर्धन करणारी औषधे व आहारीय चिकित्सा उपयुक्त ठरते.
यात आमलकी (आवळा), दाडिमबीज (अनारदाना), ज्येष्ठमध, अडुळसा, प्रवाळ अशी औषधी द्रव्ये तसेच सिद्ध घृत, अवलेह, कल्प अशा सेवन करण्यास सुलभ औषधकल्पनांचा उपयोग केला जातो. आहारात तांदूळ भाजून मऊ भात, भाताची पेज, मूगाचे वरण, भाज्यांचे सूप, गोड व ताज्या फळांचे रस, गोड ताजे ताक, दूध, तूप, लोणी यांचे अधिक सेवन करावे. तसेच रवा, िशगाडा, आरारुट अशा विविध प्रकारच्या दुधात शिजवलेल्या खीरी अधिक घेतल्यास त्या सेवन करण्यास सुलभ व पोषकही ठरतात.
रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपीनंतरही अशाच प्रकारच्या आहार व औषध योजनेस त्रिफळा, कुष्मांड (कोहळा), शतावरी अशा रसायन औषधांची जोड दिल्यास रुग्णांची प्रतिकारशक्ती सुधारून व्याधीचा पुनरुद्भव होण्याची शक्यता कमी होते. तसेच बलवर्धनानंतर बस्ती चिकित्सेसारखे पंचकर्म प्रतिवर्षी विशेषत: पावसाळ्यात वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास निश्चितच अपुनरुद्भव चिकित्सा म्हणून लाभदायी ठरते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
अन्ननलिकेचा कर्करोग
१९९९ मध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर झालेल्या ६५ वर्षांच्या कुसुमताईंचे शस्त्रकर्म झाले व त्यात कॅन्सरने ग्रस्त असलेला अन्ननलिकेचा भाग काढून टाकला होता.
First published on: 04-02-2014 at 06:37 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Esophagus cancer