परीक्षेचे निकाल व करिअर हे विषय मुले व पालक यांच्यातील वादाचे कारण ठरत असले तरी एकुलता एक- एकुलती एकच्या जमान्यात त्यांचा परिणाम थेट कुटुंबस्वास्थ्यावर होताना दिसत आहे. एकमेकांचे मन समजून एकमेकांना समजून घेणे खरेच एवढे अवघड आहे का?
बारावीचा निकाल नुकताच लागलाय. आता दहावीच्या निकालाची वाट पाहिली जातेय.. मुलांच्या मनात धाकधूक तर आहेच पण पालकही धास्तावले आहेत. मुलाचे गुण व त्याचे करिअर हा स्टेट्स सिम्बॉल असल्याने शिकवण्या, एक्स्ट्रा करिक्युलरसाठी घातलेल्या पशांचे हिशोबही बाजूला ठेवले गेले आहेत. परीक्षेचे निकाल व करिअर हे विषय मुले व पालक यांच्यातील वादाचे कारण ठरत असले तरी एकुलता एक- एकुलती एकच्या जमान्यात त्यांचा परिणाम थेट कुटुंबस्वास्थ्यावर होताना दिसत आहे.
मुलाचे बरे व्हावे म्हणूनच तर सर्व करतोय, त्याला या वयात संपूर्ण आयुष्याचा निर्णय कसा घेता येणार, आता थोडी चिडचिड करेल पण नंतर येईल मार्गावर.. आता डोक्यात वेड आहे, पण या छंदावर आयुष्य नाही काढता येणार.. असे विचार पालकांच्या मनात येतात. विरोधी बाजूही तेवढीच तगडी असते. लहानपणापासून लाडाकोडात वाढवल्याने, सर्व मागण्या पुरवल्या गेल्याने आता मुलांनाही हक्क चांगलेच माहीत झाले आहेत. त्यामुळे तीही हट्ट सोडत नाहीत. या सगळ्यात जर काही बिघडत असतील तर ती घरातील नाती. एकमेकांचे मन समजून एकमेकांना समजून घेणे खरेच एवढे अवघड आहे का?
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्कापेक्षा क्षमता जास्त आवश्यक असतात. प्रसिद्ध फॅशन छायाचित्रकार अतुल कसबेकर याच्याकडे क्षमता असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून त्याने यूडीसीटी या केमिकल टेक्नॉलॉजीतील नामांकित संस्थेत प्रवेश घेतला. पण दुसऱ्या वर्षी आपल्या छायाचित्रणाच्या आवडीसाठी त्याने ते शिक्षण सोडले. त्याला हे करू देणाऱ्या त्याच्या पालकांचेही कौतुक करायला हवे.
तर दुसरे टोकाचे उदाहरण- आवडता विषय घेऊन करिअर करू दिले नाही म्हणून घर सोडून नातेवाईकांकडे राहायला गेलेल्या मुलीची तक्रार घेऊन पालक आले होते. करिअरच्या निवडीवरून एकमेकांशी वाद घालण्यासाठी चर्चा करा.
शांत राहा – किशोरवयात मुले बंडखोरीकडे अधिक झुकणारी असतात. अशा वेळी पालकांनी थोडे शांत राहून त्यांचे विचार ऐकावेत. पालकांना ते पटले नाहीत तरी त्यामुळे रक्तदाब वाढणार नाही याची काळजी घ्या.
संवाद साधा – मुलांची मते मोकळेपणाने समजून घ्या. तुम्हाला या क्षेत्रासंबंधी वाटत असलेली अनिश्चितता, भविष्यातील संधी याची चर्चा करा. करिअरसंबधी अनेक कार्यशाळा होत असतात, इंटरनेटवरही मुबलक माहिती उपलब्ध आहे. मुलाच्या आवडत्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करा. मग निर्णय घ्या.
मुलांनीही समजूतदारपणा दाखवावा – टाळी एका हाताने वाजत नाही. मुलांनीही समजुतीने घ्यायला हवे. करिअर हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. मित्र करतात म्हणून किंवा तुम्हाला सध्या आवड आहे म्हणून करिअर निवडण्यापेक्षा दूरदृष्टीने विचार करा. पालकांनी चार पावसाळे अधिक पाहिलेले आहेत, त्यांच्या मताचा आदर करा.
मध्यममार्ग शोधा – भविष्याचा विचार करून स्थर्य आणि पसे असलेले करिअर निवडण्याकडे पालकांचा कल असतो. सध्या उपलब्ध झालेल्या नवनवीन क्षेत्रात धाडसाने पुढे जाण्याचा मुलांचा विचार असतो. या दोन्हीचा मध्यममार्ग शोधता येतो का ते पाहा.
कोणतीही ज्ञानशाखा ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते – प्रत्येक ज्ञानशाखेत आपण करू तितका अभ्यास व करू तितके कर्तृत्व. प्रत्येक शाखेत भरपूर संधी असतात. निव्वळ शिक्षण पूर्ण करून कुठेतरी चिकटण्यापेक्षा ज्या क्षेत्रात काम करायचे त्यात काय काय करण्याच्या संधी आहेत हे शोधायला शिकवायचे असते.
क्षमता विकसित करा – बोलता आले पाहिजे, मांडता आले पाहिजे, ज्ञान वापरून काम पूर्ण करता आले पहिजे. पदवीपेक्षा क्षमतेवर काम मिळते. क्षमता काम करून विकसित होते. काम करताना त्या अनुषंगाने शिक्षण घेता येते. ज्ञानाचा वापर करण्यासाठी ते मांडता यायला पाहिजे. पुढाकार घेता आला पाहिजे. प्रभाव टाकता आला पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2014 रोजी प्रकाशित
परीक्षा, करिअर आणि वाद..
परीक्षेचे निकाल व करिअर हे विषय मुले व पालक यांच्यातील वादाचे कारण ठरत असले तरी एकुलता एक- एकुलती एकच्या जमान्यात त्यांचा परिणाम थेट कुटुंबस्वास्थ्यावर होताना दिसत आहे.
First published on: 10-06-2014 at 06:54 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Examinationcareer and argument