करोनाने जगभरात थैमान घातलंय. करोनामुळे एकीकडे मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर दुसरीकडे जे करोनातून बरे झालेत त्यांच्या शरीरावर करोनाचे वेगवेगळे दुष्परिणामही दिसून आलेत. यावर आधारीत अनेक संशोधन अहवाल देखील समोर आलेत. आता नुकताच एक संशोधन अहवाल समोर आलाय यात करोनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर मोठा काळ परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलंय. यामुळे अनेक पुरुषांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलच्या अभ्यासात बेल्जियममधील सरासरी ३५ वर्ष वयाच्या १२० पुरुषांचे नमुने घेण्यात आले होते. हे सर्व लोक करोनातून बरे होऊन कमीत कमी १ आठवडा आणि जास्तीत जास्त २ महिने झाले होते. या अभ्यासानुसार करोनामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm count) तर कमी होतेच, पण याशिवाय शुक्राणूंच्या गुणवत्तेवरही (Sperm Motility) परिणाम होत असल्याचं समोर आलंय.

करोनाचा शुक्राणुंची संख्या आणि गतीशिलतेवर किती परिणाम?

या संशोधन अभ्यासानुसार, “ज्या पुरुषांना करोना संसर्ग होऊन १ महिन्यापेक्षा कमी कालावधी झालाय त्यांच्या शुक्राणुंच्या संख्येत ३७ टक्के घट झालेली पाहायला मिळाली. तसेच शुक्राणूची गतीशिलता ६० टक्क्यांनी कमी झाली. याशिवाय ज्या पुरुषांना करोना संसर्ग होऊन १ ते २ महिने झालेत त्यांच्या शुक्राणुंच्या संख्येत २९ टक्के घट झालेली दिसली आणि शुक्राणुंच्या गतीशिलतेत ३७ टक्क्यांची घसरण झाली.

करोना संसर्ग होऊन २ महिने झालेल्या पुरुषांवर याचे तुलनेने कमी परिणाम झाल्याचं दिसलं. या पुरुषांच्या शुक्राणुंच्या संख्येत ६ टक्के घट आणि गतीशिलतेत २८ टक्के घट झाल्याचं समोर आलं.

करोनामुळे नपुंसकता येते का?

संशोधकांच्या म्हणण्यानुसार करोनामुळे नपुंसकता येते का किंवा प्रजननावर म्हणजे मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो की नाही यावर अद्याप पुरेसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळे सखोल संशोधनानंतरच याबाबतची वस्तूस्थिती स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशोधकांचा मुलाचं नियोजन करणाऱ्या जोडप्यांना इशारा

हा अभ्यास समोर आल्यानंतर संशोधकांनी मुलासाठी नियोजन करत असलेल्या जोडप्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. ज्या जोडप्यांना आत्ता मुल हवं आहे त्यांनी करोना संसर्गानंतर शुक्राणूंवर होणाऱ्या परिणामाचा विचार करावा, असं सांगण्यात आलंय. तसेच करोना संसर्गानंतर पुरेशा कालवधीनंतरच यावर विचार करण्याचा सूचक इशारा देण्यात आलाय.