अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नुकतेच एक अनोखे स्नेहसंमेलन झाले. या रुग्णालया दोन वर्षांमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या १०० यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. त्यानिमित्ताने यकृतदान करणारे दाते आणि रुग्ण यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
वैद्यकीय जगतात आलेल्या आधुनिक तंत्राने अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अधिकाधिक यशस्वी होत असल्या तरी देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. देशात दरवर्षी अडीच लाखांहून अधिक रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते, मात्र त्याच्या तुलनेत प्रतिवर्षी केवळ ११०० प्रतिरोपण केले जातात. त्यातच प्रत्यारोपणासाठी लागणारी यंत्रणा व तज्ज्ञांचीही कमतरता भासते. या सर्व पाश्र्वभूमीवर अंबानी रुग्णालयात २०१३ मध्ये यकृत प्रत्यारोपण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रामधून आतापर्यंत १०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यातील ८५ प्रत्यारोपण जिवंत व्यक्तींमधील होती. या रुग्णालयातील पहिले प्रत्यारोपण तीन महिन्यांचे बाळ असलेल्या २७ वर्षीय महिलेवर केले गेले. तिच्या भावाने तिच्यासाठी यकृत दिले.
कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असलेल्या गंभीर आजारी रुग्णांवरही यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांवरही प्रत्यारोपण यशस्वी झाले आहे, अशी माहिती यकृत प्रत्यारोपण आणि शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विनय कुमारन यांनी दिली. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने वयाचा विचार न करता, जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही अवयवदान करायला हवे, असे कोकिलाबेन रुग्णालयाच्या अध्यक्ष टीना अंबानी म्हणाल्या.