सर्वसाधारणपणे वय वाढत जाताना आपली मज्जासंस्था कमजोर होत जाते. मेंदूची एखादी क्रिया किंवा मानसिक क्रिया यामध्ये अडथळा आला तर ‘आपण म्हातारे झालो की हे व्हायचंच’ या वर्गवारीत टाकून मोकळे होतो. वृद्धत्वासोबत वेदना, ठणके, नराश्य, चिडचिड हे सर्व ओघानेच येते असे आपण सर्रास गृहीत धरतो. ही लक्षणे वृद्धत्वाची आहेत असे मानून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो; वस्तुत: ही लक्षणे काही आजारांचीही असू शकतात. यातील एक अवस्था म्हणजे पार्किन्सन आजार होय. १८१७ मध्ये या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो. आयुर्वेदाला हा आजार पहिल्यापासून ज्ञात होता, त्याला कंपवात असे म्हटले जाते. या आजारामध्ये शरीराची थरथर होऊन स्नायूंची हालचाल अवघड होते. हात स्थिर ठेवलेले असताना कंप पावणे, अवयव आखडणे, हालचाली मंद होणे आणि शरीराची एखादी ठेवण अथवा स्थिती कायम राखणे मुश्कील होणे ही पार्किन्सनची काही लक्षणे होत. पार्किन्सन आजार असलेल्या व्यक्तीचा चेहरा भावनाविरहित अथवा चेहऱ्यावर एखादा मुखवटा लावावा तसा कठीण दिसतो.पार्किन्सन आजार बळावत जातो तशी ही लक्षणे अधिक गंभीर होतात आणि ही लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींना चालणे, बोलणे अथवा साध्यासुध्या क्रिया करणेदेखील अवघड होऊन बसते. त्यांना नराश्य येणे, झोपेचा त्रास किंवा चावताना, गिळताना अथवा बोलताना त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. या आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टर बहुतेक वेळा रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासतात आणि त्याच्या मज्जासंस्थेची तपासणी करतात. या आजाराचे निदान अचूक आणि वेळच्या वेळी झाले नाही तर हा आजार अधिक गुंतागुंतीचा होत जातो.पार्किन्सन आजार हा बहुतेक वेळा हालचालींमधील अनियमितता म्हणून ओळखला जातो. मेंदूमधील चेतापेशींद्वारा डोपामाइन नावाच्या रसायनाचे पुरेसे निर्माण होत नाही तेव्हा हा आजार होतो. पार्किन्सन आजार होण्याकरिता पर्यावरण आणि जनुके हे दोन्ही घटक कारणीभूत असतात. रुग्णाचे वय ५० हून कमी असेल तर या आजारामागे जनुकीय घटकांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्किन्सन आजार होण्यास पार्क १ पासून पार्क १४ पर्यंतची जनुके कारणीभूत असतात.सर्वसाधारणपणे, पार्किन्सन आजार वय वष्रे ६० व त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना होतो, पण तो त्याहून लहान वयाच्या व्यक्तींनाही होऊ शकतो. हा आजार होण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आढळून आले आहे. पार्किन्सन आजारावर आजमितीला कोणताही उपचार नाही.
पार्किन्सन्स आजार असलेल्या रुग्णांना खालील उपचारांचा लाभ होऊ शकतो.
औषधे / शस्त्रक्रिया – डोपामाइन अथवा डोपामाइन अॅगोनिस्टच्या (प्रचालक) साहाय्याने उपचार केल्यास पार्किन्सन्स आजार असलेल्या व्यक्तीला तुलनेत बरे आयुष्य जगता येते. हा आजार अगदी गंभीर अवस्थेत असेल तर डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारख्या शस्त्रक्रियांचा वापर करता येतो.
फिजियोथेरपी – फिजियोथेरपीचा भाग म्हणून केल्या जाणाऱ्या हालचाली आणि व्यायाम यामुळे स्नायूंचे आखडलेपण आणि सांध्यांमधील वेदना दूर होते. पार्किन्सन्स आजार असलेल्या व्यक्तींच्या हालचाली अधिक सोप्या व्हाव्यात आणि त्यांच्या चालण्यात व लवचीकतेत सुधारणा व्हावी अशा पद्धतीचे व्यायाम व हालचालींचा सल्ला दिला जातो.
ऑक्युपेशनल थेरपी – ऑक्युपेशनल थेरपिस्ट पार्किन्सन आजार असलेल्या व्यक्तीच्या नित्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ओळखून त्यावर व्यवहार्य उपाययोजना सुचवतात आणि त्या दृष्टीने त्यांचे घर लावून देतात व अधिक सुरक्षित करतात. त्यामुळे रुग्णाला इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही.
वाणी आणि भाषा उपचार – पार्किन्सन्स आजार असलेल्या व्यक्तींना गिळताना आणि बोलताना अडचणी येतात. स्पीच आणि लँग्वेज थेरपिस्ट या रुग्णांना बोलणे आणि गिळणे सोपे होण्याकरिता विविध व्यायाम शिकवू शकतो किंवा एखादे योग्य तंत्रज्ञानही सुचवू शकतो.
आहार – आहारामध्ये बदल केल्याने पार्किन्सन आजार असलेल्या काही व्यक्तींच्या प्रकृतीमध्ये उतार पडल्याचे दिसून आले आहे. आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त राखणे किंवा बद्धकोष्ठता टाळण्याकरिता जास्तीतजास्त पाणी पिणे, आहारातील मिठाचे प्रमाण वाढवणे, कमी रक्तदाबाची समस्या टाळण्याकरिता नियमित अंतराने थोडे थोडे खाणे, आणि वजन कमी होणार नाही अशा दृष्टीने आहारात बदल करणे या बदलांनी पार्किन्सन्स आजार असलेल्या काही व्यक्तींना आराम मिळू शकतो.